अज्ञात न्यूमोनिया’चा कोरोनापेक्षाही अधिक धोका

PTI
शनिवार, 11 जुलै 2020

कझाखस्तानमध्ये अनेक बळी गेल्याचा चीनचा दावा; सावधगिरीचा इशारा जारी

बीजिंग

कझाखस्तानमध्ये न्यूमोनियासारख्या रोगाचा धोका असून याचा मृ्त्यूदर कोरोनापेक्षाही अधिक आहे, असा इशारा चीनने कझाखस्तानमधील आपल्या नागरिकांना दिला आहे. या ‘अज्ञात न्यूमोनिया’मुळे मागील सहा महिन्यांतच कझाखस्तानमध्ये १७७२ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील ६२८ जण केवळ जून महिन्यातच दगावले आहेत, असे चीनच्या दूतावासाने जाहीर केले आहे. मृतांमध्ये चिनी नागरिकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कझाखस्तान सरकारने मात्र हा दावा फेटाळला आहे.
चिनी दूतावासाच्या म्हणण्यानुसार, कझाखस्तानमधील ‘अज्ञात न्यूमोनिया’ कोरोना विषाणूपेक्षाही अधिक धोकादायक असून यावर अनेक आरोग्य संस्था त्यावर अभ्यास करत आहेत. या नव्या विषाणूचा कोरोनाशी काहीही संबंध नसल्याचे प्राथमिक संशोधनातून दिसून आले आहे. तरीही, कझाखस्तानमधील चिनी नागरिकांनी सावध रहावे, असे दूतावासाने निवेदनात सांगितले आहे. या न्यूमोनियाचा प्रसार चीनमध्येही होऊ शकतो, त्यामुळे वेळीच उपाययोजना करायला हव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. कझाखस्तानची सीमा चीनच्या शिनजिआंग प्रांताला मिळते. कझाखस्तानमधील तीन प्रांतांमध्ये किमान ५०० जणांना न्यूमोनियासारखा आजार झाला असल्याचे आणि या आजाराच्या रुग्णांची संख्या कोरोनापेक्षाही दुप्पट असल्याचे स्थानिक माध्यमांमध्ये सांगितल्याचा दावा चिनी दूतावासाने केला आहे. कझाखस्तानमध्ये राहणाऱ्या चिनी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना सार्वजनिक ठिकाणी सावधपणे वावरावे, अशी सूचना दूतावासाने दिली आहे. कझाखस्तानमध्ये कोरोनाचे ५१ हजार रुग्ण असून २६४ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

चीनची बातमी खोटी
चिनी दूतावासाने चुकीच्या बातमी प्रसिद्ध करून अकारण संशयाचे वातावरण निर्माण केले असल्याची टीका कझाखस्तान सरकारने केली आहे. तसेच, कझाखस्तानमध्ये न्यूमोनियासारखा कोणताही संसर्गजन्य रोग पसरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कझाख सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, विविध आजारांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकत्र केली होती, तीच चिनी दूतावासाने ‘अज्ञात न्यूमोनिया’चे बळी म्हणून प्रसारित केली, असा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या