अमेरिकेकडून पाकिस्तानला दिला जाणारा निधी बंदच, पाकला मोठा धक्का

अमेरिकेकडून पाकिस्तानला दिला जाणारा निधी बंदच, पाकला मोठा धक्का
US funding to Pakistan cut off, big blow to Pakistan

वॉशिंग्टन: अमेरिकेकडून (America) पाकिस्तानला (Pakistan) मिळणारा सुरक्षा सहाय्यता निधी भारत विरोधी दहशतवादी (Terrorist) करवायांमध्ये वापरायचा या पाकिस्तानच्या कृतीला चाप बसविण्यात आला आहे. कारण अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारा हा सुरक्षा निधी बंदच ठेवण्याचा निर्णय बायडन प्रशासनाने कायम ठेवला आहे. या आधीच्या ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहाय्यता निधी (Fund) बंद केला होता. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

नुकतेच अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन (Lloyd Austin) यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत पाकिस्तानशी अमेरिका चांगले संबंध ठेवण्यावर भर देत आहे, तसेच अफगाणिस्तान प्रश्नामध्ये पाकिस्तानने अमेरिकेला मदत करावी. काहीदिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी जिनेव्हा येथे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली होती त्यामुळे अमेरिकेने आपली बंद केलेली आर्थिक रसद पाकिस्तानला पुन्हा सुरु करेल अशी आशा पाकिस्तानला होती. तरी देखील अमेरिकेने पाकिस्तानला निधी न देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. 

या आधी घेण्यात आलेल्या निर्णयात अमेरिकेने कोणताही बदल केलेला नसून, पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा निधी अद्याप बंदच आहे. या पुढे यामध्ये बदल होणार की नाही ते आत्ताच सांगू शकणार नाही. असे पेन्टॅगनचे माध्यम सचिव जीन किर्बी यांनी नमूद केले. पाकिस्तानची दहशतवादासंबंधीची भूमिका दुटप्पी असल्याने याआधीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 साली पाकिस्तानला देण्यात येणारा आर्थिक सुरक्षा सहाय्यता निधी बंद केला होता.

अमेरिकेकडून मिळणाऱ्या निधीचा वापर पाकिस्तान हा भारताविरोधात कारवायांमध्ये वापरत असल्याची तक्रार या आधी अनेकदा भारताने केली होती.  त्यामुळे आता पाकिस्तानला हा निधी मिळणार नसल्याने दहशतवादी कारवायांना आळा बसण्याची शक्यता आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com