'विद्यमान अध्यक्ष 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्यावर महाभियोग दाखल'...डेमोक्रॅट्‌सकडून जय्यत तयारी !

PTI
मंगळवार, 12 जानेवारी 2021

विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षांनी अखेर महाभियोगाचा ठराव लोकप्रतिनिधीगृहात दाखल केला.

वॉशिंग्टन :  विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षांनी अखेर महाभियोगाचा ठराव लोकप्रतिनिधीगृहात दाखल केला. कॅपिटॉल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या ठरावावर येत्या काही दिवसांत मतदान अपेक्षित आहे

 विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी तयारी पूर्ण केली आहे. आपल्या समर्थकांना चिथावणी देऊन कॅपिटॉल इमारतीत अराजकता निर्माण केल्याबद्दल ट्रम्प यांना जबाबदार ठरविलेच पाहिजे, असे सर्वच सदस्यांचे मत आहे. या प्रस्ताव सादर झाल्यास ट्रम्प यांच्याविरोधातील हा महाभियोगाचा दुसरा प्रस्ताव असेल. 

ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या तयारीला आज वेग आला होता. डेमोक्रॅटिक नेत्यांनी महाभियोगाच्या तरतूदीचा वापर करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना याबाबत पत्र लिहित पार्श्वभूमी तयार केली आणि त्यांनी राज्यघटनेतील २५ व्या घटनादुरुस्तीचा वापर करण्यासाठी उपाध्यक्ष माइक पेन्स यांना अखेरची चेतावणीही दिली. मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यांची मान्यता असल्यास उपाध्यक्ष हे या घटनादुरुस्ती कलमाचा आधार घेत अध्यक्षांची थेटपणे हकालपट्टी करू शकतात. दंगलीबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या पेन्स यांनी अद्यापपर्यंत या कलमाचा वापर करणे टाळले आहे. ट्रम्प यांच्यावर याआधी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आणि सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीत तो फेटाळला गेला होता. 

नॅन्सी पेलोसी यांनी लोकप्रतिनिधीगृहातील कामकाजाचे वेळापत्रकच जाहीर केले. सभागृहाचे कामकाज सुरु होताच सर्वप्रथमच पेन्स यांना त्यांच्या अधिकाराचा वापर करण्याची विनंती केली जाईल. ही विनंती एकमुखाने झाल्यास पेन्स हे सभागृहाचे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यवाही करतील. अशी विनंती करण्यात अपयश आल्यास दुसऱ्या दिवशी महाभियोगाचा प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाही केली जाईल. आपल्या देशाच्या राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन पेलोसी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या