ट्रम्प यांना जाता-जाता झटका ; संरक्षण धोरण निधीवरील नकाराधिकार फेटाळला

PTI
रविवार, 3 जानेवारी 2021

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यास काही दिवसांचाच अवधी उरला असताना अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने मोठा झटका दिला आहे. देशाच्या संरक्षण धोरण निधी म्हणजेच ‘नॅशनल डिफेंस ॲथोरायझेशन ॲक्ट’वरील ट्रम्प यांचा व्हेटो (नकाराधिकार) फेटाळला आहे.

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यास काही दिवसांचाच अवधी उरला असताना अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने मोठा झटका दिला आहे. देशाच्या संरक्षण धोरण निधी म्हणजेच ‘नॅशनल डिफेंस ॲथोरायझेशन ॲक्ट’वरील ट्रम्प यांचा व्हेटो (नकाराधिकार) फेटाळला आहे. विशेष म्हणजे व्हेटो नाकारण्यात त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्याच सदस्यांची महत्त्वाची भूमिका होती.

ट्रम्प यांनी बुधवारी (ता.३०) यांनी नकाराधिराचा वापर करीत संरक्षणावरील ७४० अब्ज डॉलरच्या निधीवर हरकत घेतली होती.  त्यांच्या कामकाजावरून दीर्घकाळ नाराजी व्यक्त होत होती.चार वर्षांच्या काळात ट्रम्प यांनी आठ विधेयकांवर नकाराधिकार वापरला आहे. यामुळे या विधेयकांचे रूपांतर कायद्यात होऊ शकलेले नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सत्रात सिनेटमधील सदस्यांनी एकजूट दाखवत ट्रम्प यांचा नकाराधिकार ८१ विरुद्ध १३ अशा बहुमताने फेटाळला. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कालावधीच प्रथम सदस्यांनी त्यांना अधिकार डावलला आहे. यात रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांचे प्रमाण मोठे आहे. ‘नॅशनल डिफेंस ॲथोरायझेशन ॲक्ट’वर नकाराधिकाराचा वापर करू नये, असा सल्ला ट्रम्प यांच्या सल्लागारांनी दिला होता.  

राष्ट्रीय सुरक्षेला धोका
विधेयकावरील नकाराधिकारामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. ट्रम्प यांच्या निर्णयाने देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप  प्रतिनिधीगृहातील प्रवक्त्या नॅन्सी पेलोसी केला आहे.
 

संरक्षण धोरण निधीवर आक्षेप
अमेरिकेच्या सिनेटने संरक्षण धोरणासंबंधी पुढील वर्षासाठी ७४० अब्ज डॉलरच्या अर्थसंकल्पास, मंजुरी दिली आहे. यातील काही तरतुदींवर ट्रम्प यांनी हरकत घेत नकाराधिकार बजावत विधेयकावर स्वाक्षरी करण्यास विरोध केला होता. अफगाणिस्तान आणि युरोपमधून अमेरिकी सैन्य माघारी बोलवण्यासंबंधीच्या तरतुदींवर ट्रम्प नाराज होते. 

 

 

संबंधित बातम्या