अमेरिकनही चीनला कोर्टात खेचणार

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांचे विधेयक

वॉशिंग्टन

कोरोना विषाणू संसर्गाची जागतिक साथ पसरविण्यास कारणीभूत ठरल्यावरून चीनला न्यायालयात खेचणे अमेरिकी नागरिकांना लवकरच शक्य होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर एकत्र आले असून त्यांनी सोमवारी विधेयक सादर केले.
मार्था मॅक््सॅली, मार्शा ब्लॅकबर्न, टॉम कॉटन, जॉश हॉली, माईक राऊंड््स आणि थॉम टिलीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना बळींसाठी नागरी न्याय कायदा (द सिव्हिल जस्टीस फॉर व्हिक्टीम्स ऑफ कोव्हिड अॅक्ट) असे विधेयकाचे नाव आहे. त्याद्वारे कोविडमुळे झालेल्या नुकसानास किंवा त्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरल्याचा दावा चीनविरुद्ध करता येईल. या दाव्याची सुनावणी करण्याचा अधिकार राष्ट्रीय न्यायालयांना मिळेल. मंजूर झाल्यास या कायद्यामुळे चीनशी संबंधित मालमत्ता गोठविणेही शक्य होईल.
9-11 चा संदर्भ
दहशतवादाचा फटका बसलेल्यांना कायदेशीर कारवाईचे जास्त मार्ग उपलब्ध व्हावेत म्हणून 2016 मध्ये दहशतवाद पुरस्कर्त्यांविरुद्ध न्याय कायदा (जस्टीस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररीझम) लागू करण्यात आला. प्रामुख्याने न्यूयॉर्कवर 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी याचा संदर्भ होता. त्याच धर्तीवर हे विधेयक आणण्यात आले आहे.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या खोटारडेपणा आणि लबाडीमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेले, व्यवसायाचे नुकसान झालेले किंवा संसर्गामुळे वैयक्तिक इजा पोहोचलेल्या नागरीकांना आता चीनला जबाबदार ठरवून न्याय्य भरपाई मागता येईल.
- मार्था मॅक््सॅली

अमेरिकी जनतेच्या नुकसानास कारणीभूत ठरल्याची भरपाई देण्यास चीनला भाग पाडलेच पाहिजे. कोरोना साथीची माहिती लपविणाऱ्या आणि आता त्यापासून फायदा उकळणाऱ्या चीनी कम्युनिस्ट पक्षाला परिणामांची फळे भोगायलाच लावले पाहिजे.
मार्शा ब्लॅकबर्न

कोरोना विषाणूबद्दल जगाला इशारा देण्याचा प्रयत्न केलेलले डॉक्टर आणि पत्रकार यांची तोंडे चीनने गप्प केली. परिणामी जगभर साथ पसरून पाच लाख बळी गेले आणि हा आकडा अजून वाढतोच आहे.
टॉम कॉटन

कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात चीनला अपयश आहे. हा केवळ हलगर्जीपणाच नव्हे तर गुन्हेगारी स्वरूपाचा अपराध आहे.
- माईक राऊंड््स

चीनला जबाबदार धरण्याचा अधिकार मिळण्याची पात्रता अमेरिकी नागरिकांकडे आहे. या विधेयकासाठी सहकाऱ्यांबरोबर सहभागी होण्याचा मला अभिमान वाटतो.
- थॉम टिलीस

संबंधित बातम्या