बायडन यांचा चीनला दणका; अमेरिकी युद्धनौका थेट घुसली दक्षिण चिनी समुद्रात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

चीनने तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर अमेरिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, बीजिंगला तैपेई विरुद्ध सैन्य, मुत्सद्दी व आर्थिक दबाव रोखण्याचे आवाहन केले आहे.

चीनने तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर अमेरिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, बीजिंगला तैपेई विरुद्ध सैन्य, मुत्सद्दी व आर्थिक दबाव रोखण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने जारी केलेल्या निवेदनात, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सामायिक समृद्धी, सुरक्षा आणि मूल्ये वाढवण्यासाठी अमेरिका आपल्या मित्र देशांसोबत उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. जो बायडन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या काही तासांच्या अवधीनंतर चीनच्या हवाई दलाने तैवानच्या सीमेवरून उड्डाण केले होते. यानंतर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने, चीनच्या 13 विमानांनी हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे म्हटले होते. 

चीनने केलेल्या घुसखोरीत, वाय -8 अँटी-सबमरीन विमान, आठ झियान एच -6 के बॉम्बर आणि चार शेनयांग जे -16 लढाऊ विमानांचा समावेश असल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली होती. त्यानंतर तैवानसह इतर शेजारील देशांना धमकावण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनच्या धोरणाबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबाबत निवदेन दिले असून, यात बीजिंगला तैवानविरूद्ध सैन्य, मुत्सद्दी व आर्थिक दबाव थांबविण्याची विनंती केली आहे. याव्यतिरिक्त तैवानच्या लोकशाही पद्धतीने निवडलेल्या प्रतिनिधींशी अर्थपूर्ण संवाद साधण्याचा आग्रह अमेरिकेने चीनला या निवेदनात केला आहे. 

त्यानंतर अमेरिकेचे तैवानशी असलेले संबंध हे खंबीर असून, यामुळे संबंधित प्रदेशात शांतता व स्थिरता राखण्यास हातभार मिळत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सामायिक समृद्धी, सुरक्षा आणि मूल्ये वाढवण्यासाठी अमेरिका आपल्या मित्र देशांसोबत आणि त्यांच्या बाजूने उभी असल्याची ग्वाही अमेरिकेने या निदानातून दिली आहे. त्याशिवाय लोकशाही तैवानशी असलेले आपले संबंध आणखी मजबूत करणे देखील या धोरणाचा देखील समावेश आल्याचे अमेरिकेने निवेदनात अधोरेखित केले आहे. 

त्यानंतर आता, अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रातील आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. कारण तैवान आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन विमानवाहू नौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेच्या लष्कराने याची पुष्टी आज केली असून, सामुद्रिक सुरक्षिततेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे चीन आणि अमेरिका दक्षिण चीन समुद्रात समोरासमोर आले आहेत. 

संबंधित बातम्या