माउथवॉशने गुळणी करा, कोरोनाचे विषाणू नष्ट करा

PTI
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

जर्मनीतील संशोधन; संसर्गाच्या प्रसाराचा धोका कमी राहतो

बर्लिन

कोरोनावर रशियाने लस शोधल्याचा दावा केला असून दुसरीकडे माउथवॉशनचा वापर करुन कोरोनाचे विषाणू नष्ट करता येऊ शकते, असे एका अभ्यासात म्हटले आहे. माऊथवॉशने गुळण्या केल्यास घशातील आणि तोंडातील संसंर्गाचे विषाणू कमी होऊ शकतात आणि काही काळासाठी कोविड-१९ ची जोखीम कमी करता येऊ शकते, असे म्हटले आहे. अर्थात माउथवॉश हा पूर्णपणे कोरोना संसर्गावरील उपचारासाठी उपयुक्त नाही पण कोरोना संसर्गापासून बचाव करण्यास मदत करते, असे म्हटले आहे.
माउथवॉशसंदर्भातील संशोधन ‘जर्नल ऑफ इंफेशियस डिसिज’ मध्ये प्रकाशित झाले आहे. जर्मनीतील रुह्य यूनिर्व्हर्सिटी बोचमच्या संशोधकांसह अन्य तज्ञांच्या मते, कोविड-१९ बाधित रुग्णांच्या घशात आणि तोंडात कोरोना संसर्गाचे विषाणू काही वेळा अधिक प्रमाणात असू शकतात. परिणामी अशा व्यक्तींपासून प्रसाराचा धोका अधिक असतो. संसर्ग पसरण्याचे मुख्य कारण बाधित व्यक्तीचे शिंकणे, खोकला किंवा बोलताना तोंडातील थुंकीशी संपर्क येणे आणि नंतर तो व्यक्ती सुदृढ व्यक्तीच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा प्रसार होतो. ढोबळमानाने बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास कोरोना होऊ शकतो. परंतु माउथवॉशमुळे कोरोना प्रसाराची साखळी काही प्रमाणात तोडता येऊ शकते. माउथवॉशचा वापर केल्यास तोंडातील आणि घशातील किटाणू निष्क्रिय होतील. संशोधकांच्या मते, हे संशोधन दंतरोगावरील उपचारासाठी किंवा कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रोटोकॉल म्हणून विकसित करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. माउथवॉशने गुळणी केल्यास लाळग्रंथीतील संसर्गाचे विषाणू कमी होतात. त्यानुसार सार्स-सीओव्ही-२ चा प्रसार कमी होऊ शकतो. संशोधकांनी म्हटले की, एका प्रयोगातून संपर्काच्या शक्यतेने संबंधित व्यक्तीने माऊथवॉशचा तीनदा वापर केला आणि पहिल्या तीस सेंकदात कोरोनाचा विषाणू आढळून आला नाही. अर्थात त्याचा प्रभाव आणि कालावधी किती काळ राहतो, हे निश्‍चित होणे बाकी आहे.

कोरिया विद्यापीठाचेही संशोधन
दोन महिन्यांपूर्वी कोरियन यूनिव्हर्सिंटी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी देखील माउथवॉशच्या उपयुक्ततेबाबतचे संशोधन केले होते. क्लोरेहेक्सिडाइनने तयार करण्यात आलेले माउथवॉश संसर्गाला काही वेळ रोखण्यासाठी मदत करु शकतात, असे म्हटले होते. दंतव्यंगोपचार घेणाऱ्या व्यक्तीने आणि डॉक्टरांनी माउथवॉशचा वापर केल्यास संसर्गाचा धोका कमी राहिल, असे सांगितले गेले.माउथवॉशमुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव दोन तासासाठी रोखणे शक्य असल्याचे म्हटले होते. संसर्गमुक्तीसाठी १० मिलीलीटर माउथवॉश घेऊन त्याच्या गुळण्या कराव्या लागतील. (औषधाच्या बाटलीचे टोपन) त्यात ०.२ टक्के क्लोरहेक्सिडाइनचा समावेश असणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना माऊथवॉश केल्यास संसर्गाची बाधा होण्यापासून त्याचा बचाव होऊ शकतो.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या