मानवावर लसीचे धोकादायक प्रयोग

PTI
शुक्रवार, 17 जुलै 2020

जागतिक स्पर्धेमुळे परवानगी नसतानाही चीनमध्ये चाचणी

बीजिंग

कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी जागतिक पातळीवर अक्षरशः जीवघेणी स्पर्धा सुरू असल्याचे दिसून आले आहे. या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी चीनची सरकारी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांवरच लसीचे प्रयोग करत आहे. चीन सरकारने मानवावरील प्रयोगाला परवानगी देण्याआधीच हे प्रयोग झाले होते.
चीनमधील 'सायनोफार्म' या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची छायाचित्रे ऑनलाइन प्रसिद्ध करत, 'लसीच्या चाचणीत योगदान देत विजयश्री मिळविण्यासाठी हातभार लावणारे' असे त्यांचे कौतुक केले आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या आधी लस तयार करण्याच्या महत्त्वाकांकक्षेने चीन सरकार झपाटून गेले असल्याने या कर्मचाऱ्यांनी स्वतःवर चाचणी करवून घेणे हा महान त्याग समजावा की आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन समजावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने मानवी चाचणीला परवानगी देण्याआधीच ३० कर्मचाऱ्यांनी स्वतःवर प्रयोग करण्याची तयारी दर्शविली होती, असा कंपनीचा दावा आहे. सध्याच्या परिस्थितीत ज्या देशाकडे लस असेल तो इतरांवर शास्त्रीय आणि राजकीय कुरघोडी करेलच, शिवाय त्याच्याकडे जगाचा मुक्तीदाता म्हणून पाहिले जाणार आहे. हा मान मिळवण्यासाठीच अनेक देशांची धडपड सुरू आहे. या स्पर्धेत चीन आघाडीवर असून चाचणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या दोन डझन लसींपैकी आठ चीनमधील आहेत. त्यापैकी कॅनसायनो आणि काही कंपन्यांनी चाचणीचे काही महत्त्वाचे टप्पे वगळल्याचा संशय आहे. रशियामध्येही परवानगी नसतानाही मानवावर चाचणी झाल्याचा आरोप आहे.

लसीबाबतची चिनी पद्धत
कोरोना विषाणूच्या आवरणाला लक्ष्य करून त्याचा संसर्ग रोखण्यावर पाश्चिमात्य देशांमधील संशोधनाचा भर आहे. हे संशोधन तंत्रज्ञान अद्याप नवीन आहे. चीनने मात्र विषाणूची पूर्ण वाढ होऊ देऊन मगच तो मारून टाकण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. पोलिओचा डोस तयार करताना हीच पद्धत वापरली जाते. या लसीसाठी चीन सरकार आणि 'सायनोफार्मा'ने बरीच मोठी गुंतवणूक केली आहे.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या