
Australia Flood: ऑस्ट्रेलियाच्या किम्बर्ली प्रदेशाला 100 वर्षांतील सर्वात भीषण पुराचा सामना करावा लागत आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ एली मुळे या विस्तीर्ण भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांना चारही बाजूंनी पाण्याने वेढले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. किम्बर्लीचे क्षेत्रफळ ब्रिटनच्या तिप्पट आहे. येथे राहणारे निम्मे लोक आदिवासी आहेत. पुरामुळे कांगारूंनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कांगारूंना जीव वाचविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे, त्याचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
किम्बर्ली प्रदेश ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात स्थित आहे. येथे पुरात अडकलेल्या शेकडो लोकांना लष्करी हेलिकॉप्टरने विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. अनेक कांगारू, गाई यांनी छोट्या कळपाने पाणी नसलेल्या छोट्या जागेत कसाबसा आसरा घेतल्याचे दिसून येत आहे. हवाई छायाचित्रांतून या पुराच्या भीषणतेचे कल्पना येते.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल, असे म्हटले आहे. आपत्कालीन सेवा मंत्री स्टीफन डॉसन यांच्या माहितीनुसार काही भागात 50 किलोमीटरपर्यंत पाणी पसरले. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही महिने लागतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
किम्बर्लेचे फिट्झरॉय क्रॉसिंग शहर पुरामुळे आजूबाजूच्या भागांपासून तुटले आहे. फिट्झरॉय नदीतील पाण्याची पातळी 15.81 मीटर (52 फूट) वर पोहोचली आहे. त्यामुळे येथे हेलिकॉप्टरने जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत. 200 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. लोकांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन हवाई दलाची विमाने आणि चिनूक हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने आजूबाजूच्या अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात ला-निना या प्रवाहाच्या प्रभावामुळे गेल्या दोन वर्षांपासून सतत पूरपरिस्थिती उद्धभवत आहे. पूर्वेकडील काही भागात गेल्या वर्षभरात चार वेळा पूर आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.