संयुक्त राष्ट्रांनी जगाला काय दिले?

पीटीआय
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

‘यूएन’मध्ये घुमले कमजोरांचे आवाज; सुधारणांसाठी हाक

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महासभेने या जागतिक संस्थेला अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. केवळ मोठ्या देशांच्या प्रश्‍नांनाच महत्त्व आणि प्रसिद्धी दिली जात असून जगात चीन, अमेरिका, रशिया, युरोपशिवाय इतरही अनेक देश असून त्यांच्यासमोरही गहन समस्या आहेत. 

बड्या देशांनी या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्यास जगात शांतता नांदण्यास मोठी मदत होईल. तसेच, वास्तव जगाचे प्रतिनिधीत्व संयुक्त राष्ट्रांमध्ये येण्यासाठी या संस्थेत तत्काळ सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणीही पुन्हा एकदा करण्यात आली. कझाकस्तान, घाना या देशांनी कोरोना काळात मदत करण्याचे आवाहन केले. तर, सौदी अरेबिया या श्रीमंत देशाने इतरांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

ही संस्था म्हातारी : केनिया
संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याची ठसठशीत जाणीव केनियाने महासभेला करून दिली. ही जागतिक संस्था जगभरातील ९६ टक्के लोकसंख्येपेक्षा अधिक वयस्कर आहे, असे केनियाचे अध्यक्ष उहुरु केनियट्टा यांनी निदर्शनास आणून दिले. ‘दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांनी जगाला एकत्र आणले होते. मात्र, आताच्या परिस्थितीत ही संस्था जगाला काय देत आहे?,’ असा सवाल त्यांनी विचारला. आफ्रिका खंडात जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असून अधिक पटींनी वय असणाऱ्या नेत्यांवर हे तरुण नाराज आहेत. जगातील एक षष्ठांश लोकसंख्या आफ्रिका खंडात असताना आम्हाला संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमस्वरुपी सदस्यत्व नाही, हे चुकीचे आहे, असे केनियट्टा यांनी ठणकावून सांगितले.  
दरम्यान, आधीच कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे आणि अंतर्गत संघर्षामुळे त्रस्त झालेल्या लेबनॉनला बैरुतमध्ये झालेल्या विनाशकारी स्फोटामुळे धक्का बसल्याने घायकुतीला आलेल्या सरकारने जगाकडे मदतीची याचना केली आहे. 

संबंधित बातम्या