यूजर्सच्या नाराजीनंतर व्हॉट्सॲपची माघार ; 'मे' पर्यंत बदल नाही

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

नेटीझन्स आणि टेक्नोक्रॅट यांच्या विरोधासमोर झुकत अखेर व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपने नव्या प्रायव्हसी धोरणाची अंमलबजावणी आणखी तीन महिन्यांनी पुढे ढकलली आहे.

ह्युस्टन :  जगभरातील नेटीझन्स आणि टेक्नोक्रॅट यांच्या विरोधासमोर झुकत अखेर व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपने नव्या प्रायव्हसी धोरणाची अंमलबजावणी आणखी तीन महिन्यांनी पुढे ढकलली आहे. या नव्या धोरणान्वये व्हॉट्सॲपचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार होता तसेच हे नवे धोरण यूजर्संसाठी बंधनकारक करण्यात आले होते.

या बदलांना अनेकांनी आक्षेप घेत व्हॉट्सॲपवरून एक्झिट घेताना सिग्नल आणि टेलिग्रामचा पर्याय स्वीकारायला सुरुवात केली होती. जगभरातील तब्बल दहा कोटींपेक्षाही अधिक लोकांनी व्हॉट्सॲपला कायमस्वरूपी सोडचिठ्ठी दिल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापन जागे झाले.

या नव्या प्रायव्हसी धोरणाची अंमलबजावणी ८ फेब्रुवारीपासून होणार होती, खुद्द फेसबुककडूनच तशी घोषणा करण्यात आली होती. यूजर्संच्या आक्षेपानंतर व्हॉट्सॲपने स्पष्टीकरण देताना सर्वांची खासगी माहिती गोपनीयच राहील असे आश्‍वासन दिले होते. हे नवे धोरण व्यावसायिक चॅटला लागू असेल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीच्या या स्पष्टीकरणानंतर देखील यूजर्संचे समाधान झाले नव्हते.

लोकांमध्ये संभ्रम कायम

व्हॉट्सॲपने प्रसिद्ध केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ‘‘ या धोरणाबाबत लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. अनेक लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचली आहे. आमची मूल्ये आणि खरी माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत. तुमचे मित्र आणि कुटुंबीयांसोबतचे संभाषण गोपनीयच राहायला हवे. या मूल्यावरच व्हॉट्सॲपची उभारणी झाली आहे. तुमच्या वैयक्तिक संभाषणाचे आम्ही नेहमी संरक्षण करू. त्यामुळेच व्हॉट्सॲप आणि फेसबुक यूजर्संचे खासगी संदेश पाहू शकत नाही. यूजर्संचे लोकेशन आणि संपर्काची माहिती देखील फेसबुकवर शेअर केली जात नाही.’’

संबंधित बातम्या