कोरोनावर यूव्ही-एलईडी परिणामकारक

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

संशोधकांनी अल्ट्रा व्हायोलेट लाईट इमिटिंग डायोड्‌स (यूव्ही - एलईडी) कोरोना विषाणूला वेगाने मारू शकते, असा दावा केला आहे. 

न्यूयॉर्क : संपूर्ण जग कोरोनावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी, लशीसह इतरही अनेक उपाय शोधले जात आहेत. आता, इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठाच्या अमेरिकन फ्रेंडस केंद्रातील संशोधकांनी अल्ट्रा व्हायोलेट लाईट इमिटिंग डायोड्‌स (यूव्ही - एलईडी) कोरोना विषाणूला वेगाने मारू शकते, असा दावा केला आहे. 

एलईडीचा वापर कार्यक्षम, जलद आणि स्वस्त असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘फोटोकेमिस्ट्री ॲंड फोटोबायोलॉजी बी:बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

यूव्ही-एलईडीच्या विकिरणातून  कोरोना गटातील वेगवेगळ्या विषाणुंचे वेगवेगळ्या तरंगलांबीतून पुरेसे निर्जंतुकीकरण होऊ शकते, असा संशोधकांचा विश्वास आहे. संशोधक हॅडस मामेन म्हणाल्या, की रासायनिक फवारणीतून बस, रेल्वे, विमान किंवा एखादे सभागृहाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असते. त्याचप्रमाणे, संबंधित पृष्ठभागावर सक्रिय होण्यासाठीही रसायनाला वेळ द्यावा लागतो. मात्र, अतिनील किरणांचे विकिरण करणारे एलईडी बल्ब एसी, वायुजीवन (वेंटिलेशन) सारख्या यंत्रणेत बसविता येऊ शकतात. त्यानंतर या यंत्रणेद्वारे हवेचे निर्जंतुकीकरण होऊन शुद्ध हवा बाहेर सोडली जाईल.’’

संशोधकांच्या मते या संशोधनामुळे एलईडीच्या व्यापक वापरामुळे व्यावसायिक व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. एसी, जल प्रणालीसारख्या उपकरणात आवश्यक सुधारणा करून एलईडी बल्ब बसवता येऊ शकतात. त्यातून संबंधित खोलीतील पृष्ठभाग व अवकाशाचे निर्जंतुकीकरण करणे शक्य आहे. 

सावधानतेची गरज
कोरोना विषाणुवर यूव्ही-एलईडी बल्बमधील अतिनील किरणे प्रभावी असली तरी मनुष्यावर या किरणांचा अतिशय विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, घरातील पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी यूव्ही - एलईडीचा वापर धोकादायक ठरू शकतो, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. त्यासाठी, मनुष्यावर थेट प्रकाश पडणार नाही अशा प्रकारे हे एलईडी बल्ब बसविण्यासाठी संबंधित यंत्रणेत बदल करण्याचाही त्यांचा सल्ला आहे.

आणखी वाचा:

दक्षिण आफ्रिकेतील किनारे संसर्गामुळे बंद -

सध्या संबंध जग कोरोना विषाणुला नामोहरम करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. अतिनील प्रकाशाचे उत्सर्जन करणाऱ्या यूव्ही - एलईडी बल्बच्या माध्यमातून या विषाणुला संपवणे खूपच सोपे, स्वस्त, वेगवान असल्याचे आम्हाला आढळले. त्याचप्रमाणे, पारंपारिक बल्बपेक्षा एलईडीसाठी ऊर्जाही कमी लागते.
- हॅडस मामेन, 
संशोधक, तेल अवीव विद्यापीठ, अमेरिका
 

संबंधित बातम्या