माफी मागणार नाही; वादग्रस्त छायाचित्रावरून चीनची भूमिका

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

आमच्याकडून माफीची अपेक्षा करण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाला लाज वाटायला हवी, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

बीजिंग- ऑस्ट्रेलियाचा सैनिक अफगाणिस्तानमधील लहान मुलाचा गळा चिरत असल्याचे फेरफार केलेले छायाचित्र प्रसिद्ध केल्यावरुन चीनने ऑस्ट्रेलियाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आमच्याकडून माफीची अपेक्षा करण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाला लाज वाटायला हवी, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

अफगाणिस्तानमध्ये तैनात असताना अत्याचार केलेल्या काही सैनिकांवर ऑस्ट्रेलिया सरकारने स्वत:हून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यावरून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ऑस्ट्रेलियाचा एक सैनिक एका लहान मुलाचा गळा चिरत असल्याचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. यावरून संतापलेल्या ऑस्ट्रेलियाने चीनकडून माफीची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने माफी मागण्यास नकार दिला.

‘आमच्या ट्वीटवर ऑस्ट्रेलियाची फारच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. असे का? अफगाण नागरिकांची त्यांच्या सैनिकांनी क्रूरपणे केलेली हत्या त्यांना चालू शकते, पण त्यावर टीका केलेली झोंबते. अफगाणिस्तानमध्येही माणसेच राहतात. आम्ही माफी मागावी अशी मागणी करण्याऐवजी त्यांना आपल्या सैनिकांच्या कृत्यावर लाज वाटायला हवी,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले 
आहे. 

संबंधित बातम्या