असमानतेमुळे जग फुटीच्या उंबरठ्यावर

PTI
सोमवार, 20 जुलै 2020

‘यूएन’ सरचिटणीस गुटेरेस यांची खंत
 

जोहान्सबर्ग

जगभरात सर्वत्र असलेल्या असमानतेमुळेच वर्णद्वेषाविरोधातील आंदोलने होत असून कोरोनाच्या जागतिक साथीच्या या काळात ही असमानता अधिक स्पष्टपणे समोर आली आहे. हे पाहता जग फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शंका येते, असे विधान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी केले आहे.
नेल्सन मंडेला व्याख्यानमालेत बोलताना गुटेरेस म्हणाले की, कोरोना संसर्गाने आपल्या समाजाची क्ष-किरण चाचणी करत आपल्यातील दोष दाखवून दिले आहेत. हे दोष जगभरात सर्वत्र आहेत. खुल्या बाजारामुळे सर्वांना आरोग्य सुविधा मिळतील, बेरोजगारांना काम मिळेल, जगात आता भेदाभेद नाही या सर्व खोट्या समजुती असल्याचे सिद्ध झाले आहे. विकसीत देशांनी केवळ स्वार्थ पाहिला असून या संकटाच्या काळात विकसनशील देशांना मदत करण्यात ते साफ अयशस्वी ठरले आहेत. आपल्या भाषणात गुटेरेस यांनी कोरोना संसर्ग वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. गुटेरेस यांनी सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर टीका केली.

गुटेरेस म्हणाले...
- जगातील निम्म्या लोकसंख्येकडे असलेल्या संपत्तीइतकी संपत्ती केवळ २६ श्रीमंत लोकांकडे
- जगात वंश, लिंग, वर्ग आणि जन्मठिकाण यावरून प्रचंड असमानता
- या असमानतेमुळे लाखो नागरिकांना त्रास
- वसाहतवादी मानसिकता अद्यापही कायम
- गरीब देशांना जागतिक पातळीवर पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नाही

गुटेरेस यांनी सांगितलेले उपाय
- जागतिक संस्थांमधील असमानता आधी दूर करावी
- सामाजिक सुरक्षिततेची नवी यंत्रणा उभारावी
- किमान वेतन जगात सर्वत्र समान असावे
- मध्यम आणि अल्प उत्पन्न गटांतील मुला-मुलींवर शिक्षणाचा खर्च दुप्पट करावा
- लोकांऐवजी कार्बन उत्पादनावर कर लावावा

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या