पारंपरिक विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात गरूडझेप घेणाऱ्या चीनने बनविला लाइट बेस्ड क्वांटम कॉम्प्युटर

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

पारंपरिक विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात गरूडझेप घेणाऱ्या चीनने आता संगणकीय संशोधनामध्ये पुन्हा एकदा अचाट कामगिरी करून दाखविली आहे

बीजिंग: पारंपरिक विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात गरूडझेप घेणाऱ्या चीनने आता संगणकीय संशोधनामध्ये पुन्हा एकदा अचाट कामगिरी करून दाखविली आहे. चिनी संशोधकांनी जगातील पहिला लाइट बेस्ड क्वांटम कॉम्प्युटर तयार केला आहे. पारंपरिक सुपर कॉम्प्युटरपेक्षा त्याचा वेग कित्येकपटीने अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संगणकीय संशोधन क्षेत्रामध्ये चीनची ही कामगिरी सर्वार्थाने मोठी असून त्यामुळे या महायंत्राच्या उभारणीच्या पारंपरिक पद्धतींमध्ये मोठा बदल होणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

‘जिऊझहँग’ असे या क्वांटम कॉम्प्युटरचे नाव असून नवतंत्रज्ञानाच्या बाबतीत तो खूप पुढे असल्याचे चिनी माध्यमांनी म्हटले आहे. ‘जर्नल सायन्स’मध्ये हे नवे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध करण्यात आले या क्वांटम संगणकाचा वेग खूप अधिक असेल तो पारंपरिक सुपर कॉम्प्युटरला गाठणे शक्य होणार नाही. या संशोधनाचा सर्वांत मोठा फायदा पदार्थ विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वैद्यकीय संशोधन या क्षेत्रामध्ये होणार आहे. ‘जिऊझहँग’ हे या क्वांटम संगणकाचे नाव देखील प्राचीन चिनी गणितशास्त्रातून घेण्यात आले आहे.

 दोनशे सेकंदांत प्रक्रिया
अत्यंत गूढ समजल्या जाणाऱ्या किचकट अशा गणिती प्रक्रिया या संगणकाच्या माध्यमातून अवघ्या दोनशे सेकंदांमध्ये होऊ शकतात. आता हीच प्रक्रिया करण्यासाठी ‘फुगाकू’सारख्या क्लासिकल सुपर कॉम्प्युटरला सहाशे दशलक्ष एवढी वर्षे लागतील, असे यासंबंधीच्या अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी गुगलने ५३- क्युबिट क्वांटम कॉम्प्युटरची घोषणा केली होती, त्यानंतरचा हा दुसरा मोठा प्रयोग असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या क्वांटम कॉम्प्युटरमध्ये गणनेसाठी ७६ फोटोन्सचा वापर केला जातो तर गुगल सुपर कॉम्प्युटर हे याच प्रक्रियेसाठी सुपर कंटक्टिव्ह मटेरिअलचा वापर करते. या प्रयोगामुळे फोटोनिक क्वांटम कॉम्प्युटेशनची लवचिकता सिद्ध झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

क्वांटम संदेशवहनावर भर
याआधी २०१७ मध्ये चीनने क्वांटम कम्युनिकेशन उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. हा सर्वांत आधुनिक उपग्रह असल्याचे चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे. क्वांटम संदेशवहनामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नसल्याने ते अधिक सुरक्षित समजले जाते. चीनने सध्या बीजिंग ते शांघाय हॅकप्रुफ क्वांटम कम्युनिकेशन वाहिनी  उभारली आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या