जपानच्या पंतप्रधानपदी योशिहिदे सुगा

पीटीआय
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

ॲबे यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा; कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे आव्हान

टोकियो: जपानच्या संसदेने पंतप्रधानपदासाठी योशिहिदे सुगा यांची बुधवारी अधिकृत निवड केली. आठ वर्षानंतर सुगा हे जपानचे नवे पंतप्रधान बनले आहेत. याआधी पंतप्रधान शिंजो ॲबे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. सुगो हे ॲबे यांचे खंदे समर्थक मानले जातात.

संसदेच्‍या कनिष्ठ सभागृहात सोमवारी (ता.१४) मतदान घेऊन सुगा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली. यानंतर ॲबे यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या मार्ग खुला झाला. ॲबे यांनी प्रकृतीच्या कारणावरून गेल्या महिन्यात राजीनामा  देण्याची घोषणा केली होती. सुगा हे ॲबे यांचे उजवे हात मानले जातात. आधीच्या मंत्रिमंडळात ते मुख्य सचिव होते.
 
ॲबे यांचे निष्ठावंत
सुगा यांना कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. जपानमधील अकिता राज्यातील उत्तर भागात त्यांचे वडील स्ट्रॉबेरीची शेती करीत होते. राजकारणात त्यांनी त्यांचा मार्ग तयार केला. शिंजो ॲबे हे २००६ ते २००७ या काळात पहिल्यांदाच जपानचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून सुगा त्यांचे निष्ठावंत आहेत. ॲबे यांची ही कारकीर्द प्रकृती अस्वास्थामुळे संपुष्टात आली. त्यानंतर २०१२मध्ये पंतप्रधानपदी पुन्हा निवडून येण्यास ॲबे यांना सुगा यांनी मदत
केली होती.

अर्थव्यवस्था सुदृढ करणार ः सुगा
सुगा यांनी शिंजो ॲबे यांची मुत्सद्देगिरी आणि आर्थिक धोरणांचे कौतुक केले. नव्या मंत्रिमंडळात कठोर परिश्रम करणाऱ्यांची गरज असल्याचेही त्यांनी सांगत ॲबे यांच्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्याची ग्वाही दिली. कोरोनाविरोधातील लढा आणि या साथीमुळे देशाची घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करण्यास प्राधान्य असल्याचे सुगा म्हणाले.

मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुगा यांचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने योशिहिदे सुगा यांचे अभिनंदन. जपानबरोबरील विशेष राजनैतिक संबंध आणि जागतिक भागीदारी एका नव्या उंचीवर नेण्याची आशा करतो.

संबंधित बातम्या