‘सनबर्न’ रद्दचा निर्णय योग्यच, पण..!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

सनबर्नमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. कोरोनाचा संसर्ग वाढला, तर राज्यापुढे आणखी किती मोठे संकट उभे ठाकेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनचा काळ संपल्याने सध्या राज्याच्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत. कसिनो सुरू झाला आहे.

 

राज्यात सनबर्न पार्टीच्या आयोजनास विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला आणि तूर्त तो रद्द झाला हे बरेच झाले. एकीकडे राज्यातील युवा पिढी अमलीपदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र असताना, राज्यावर कोरोनारूपी राक्षस आ वासून उभा ठाकलेला असताना अशा पार्ट्या आयोजित करण्यास परवानगी देणे म्हणजे अमलीपदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांना रान मोकळे करून देणे आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वाट मोकळी करून देणे असे होऊ शकत नाही का? किंवा कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठीच्या एसओपीचा फज्जा उडवणे असा होत नाही का? राज्याच्या समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी अमलीपदार्थांचे अनेक व्यवहार होत आहेत. काहीजण पकडलेही जात आहेत. जिवबा दळवी यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अमलीपदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत आहेत. त्यांच्या कारवाईचे कौतुक होत असतानाच सनबर्नसारख्या पार्टीचे आयोजन करणे कितपत योग्य आहे. अशा पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांची देवाण घेवाण होत नाही किंवा होणार नाही असे कोण छातीठोकपणे सांगू शकतो? त्याचप्रमाणे सनबर्न पार्टी आयोजकांनी एसओपी नियमांचे काटेकोर पालन करून पार्टीचे आयोजन करणार असल्याचे कितीही सांगितले, तरी गर्दीवर नियंत्रण राहू शकेल का? कोरोना संकटाचे काळेकुट्ट ढग हळूहळू सरकत आशेचा किरण दिसत असताना अशा पार्ट्या सध्या तरी आयोजित करणे योग्य नाही. 

सनबर्नमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. कोरोनाचा संसर्ग वाढला, तर राज्यापुढे आणखी किती मोठे संकट उभे ठाकेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनचा काळ संपल्याने सध्या राज्याच्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत. कसिनो सुरू झाला आहे. अशा स्थितीत सनबर्न पार्टीची आणि कसिनोची मजा लुटण्यासाठी राज्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांची गर्दी रोखणे केवळ अशक्यच आहे. त्यादृष्टीने विरोधी पक्षांनी सनबर्नविरुद्ध एकवट दाखवत सनबर्नच्या आयोजनाविरुद्ध जोरदार आवाज उठवला, निदर्शने केली. सनबर्न महोत्सव आयोजनाचा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा दिला हे योग्यच झाले. 
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारच्या काळात गोव्यात सनबर्न पार्टी होऊच द्यायची नाही, असा पवित्रा घेऊन विरोधी पक्षांबरोबरच अनेक नागरिकांनी सनबर्न पार्टी आयोजनास विरोध केला. लोकांचा आणि विरोधी पक्षांचा वाढता विरोध लक्षात घेऊन त्यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी लोकाग्रहास्तव ‘सनबर्न’ आयोजनाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे सनबर्न आयोजकांना कर्नाटकात जावे लागले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सनबर्न कर्नाटकात पिटाळून लावण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. आताही सनबर्नविरुद्ध सर्व थरातून जोरदार विरोध झाल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सनबर्नचे आयोजन रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे, पण सनबर्न आयोजकांना दिलेला तात्पुरता परवाना सरकारने मागे घेतला आहे का? नसेल, तर तो त्वरित मागे घेणे आवश्यक आहे.

सध्या राज्याच्या उत्पन्नात घट होत आहे, तिजोरीत खडखडाट आहे, राजशकट हाकणे अवघड आहे ही वस्तुस्थिती आहे, ती कोणीही नाकारू शकणार नाही, पण ‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीप्रमाणे उद्या कोविडचे संकट टळल्यानंतर पर्यटन व्यवसायातून उत्पन्न मिळेलही. त्यासाठी कोरोनाचे संकट असताना धोका पत्करणे योग्य नाही. राज्याच्या नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणे हे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे सध्या सनबर्नसारख्या पार्ट्यांना रोख लावणे योग्यच आहे.

-यशवंत पाटील

संबंधित बातम्या