कोविड सत्य नेमके काय ते सांगा...

dainik gomantak
गुरुवार, 4 जून 2020
वास्कोच्या मांगोरहिल भागात कोरोनाचे रुग्ण पटापट सापडू लागले आहेत. त्यांचा नेमका आकडा वाढून कुठवर जाईल हे सांगता येणार नाही. तेथे नमुने घेतले म्हणून रुग्ण सापडले. ज्येष्ठ नागरीकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी इस्पितळाच्या पायऱ्या चढल्या म्हणून हे सारे पुढचे प्रकरण घडले आहे.

अखेर भीती खरी ठरली. ज्या पद्धतीने बिनधास्त वातावरण राज्यात कोविड महामारीच्या काळात होते त्यावरून कधी ना कधी राज्याला याची किंमत चुकवावी लागणार हे ठरून गेलेले होते. मांगोरहिल वास्कोच्या रुपाने त्याची सुरवात झाली आहे. यात चूक कोणाची हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. मात्र राज्य कोविडमुक्त ठेवण्याचे श्रेय ज्यांचे असेल त्यांनी आता कोविड महामारीच्या सावटाखाली गोवा आल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
ही जबाबदारी केवळ शंभर खाटांचे इस्पितळ १५० खाटांचे करून आणि कृत्रिम श्वसनयंत्रणेच्या उपलब्धतेत वाढ करून निभावता येणारी नाही. कोविड टाळेबंदीच्या काळात आयुष्य उध्वस्त झालेल्यांचे आयुष्य सावरण्यासाठी सरकार काय करणार हा प्रश्न आहे. सध्या तरी याचे उत्तर दृष्टीपथात नाही. कोविड १९ ची भीती मुले व ज्येष्ठ नागरीकांना आहे असे केंद्रीय आरोग्य खाते वारंवार सांगत आले आहे. त्यामुळे सरकारने या वर्गाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. सरकारने दहावीची परीक्षा घेण्याचे धाडस करून दाखवले. त्यातून सरकारने समाजाला आश्वस्त केले असले तरी समाजमनावरील भीती दूर झालेली नाही. राज्यात येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही चाचणी करतो, असे सरकार सांगत असले तरी पत्रादेवी येथून राज्यात आलेल्यांना कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी पकडले त्याचे काय याचेही उत्तर मिळाले पाहिजे.
वास्कोच्या मांगोरहिल भागात कोरोनाचे रुग्ण पटापट सापडू लागले आहेत. त्यांचा नेमका आकडा वाढून कुठवर जाईल हे सांगता येणार नाही. तेथे नमुने घेतले म्हणून रुग्ण सापडले. ज्येष्ठ नागरीकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी इस्पितळाच्या पायऱ्या चढल्या म्हणून हे सारे पुढचे प्रकरण घडले आहे. मात्र त्यांनी चाचणी करून घेतली नसती तर सारे काही गुलदस्त्यातच राहिले असते. सरकार अनेक ठिकाणी तपासणी करतो असे दाखवण्यासाठी शरीराचे तापमान नोंदवून घेते. कोरोनाची सुरवातीची लक्षणे आता सर्व नव्हे बहुतांश रुग्णांत दिसत नाहीत त्यामुळे शारीरिक तापमान तपासण्यातून काही साध्य होणार असे नाही.
कोणत्याही विषाणूचा प्रसार अधिक झाला की माणसाची रोग प्रतिकार शक्ती आपोआप त्‍या विषाणूला टक्कर देण्याइतकी सक्षम होत जाते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार समाजात होत जाईल तशी रोग प्रतिकारक शक्ती विकसित होत जाणार आहे. हे सरकार जनतेला सांगू शकत नाही कारण त्यातून भीतीच वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाची लक्षणे बहुतांश रुग्णांत दिसून येत नसल्याने आजच्या घडीला किती रुग्ण राज्यात असतील हे सांगता येणार नाही. सरकारही प्रत्येक घरात जाऊन चाचणी करू शकत नाही. मोठ्या संख्येने रुग्ण सापडले तर उपचार करण्यासाठी जागा तर हवी. मुंबईत आता घरीच उपचार करण्याची खासगी यंत्रणेला परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोरोनाचे एवढे रुग्ण हा आकडाही धडकी भरवणारा ठरू शकतो. लोकशाहीत सरकारने समाजात घबराट पसरणार नाही याची काळजी घेणे अभिप्रेत असते. त्यामुळे सरकार सर्वकाही माहित असूनही सांगू शकत नाही, अशी खरी स्थिती आहे.
कोरोनासह जगायला शिका! असे मोघम बोलून सरकारला बरेच काही सांगायचे असते. ते जनतेने समजून घेतले पाहिजे. खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात चाचण्या होत आहेत, मात्र या चाचण्या आणि तपासण्या नेमक्या कोणत्या आजाराच्या आहेत, असा सवाल करीत दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देश दीपक यांनी ‘कोविड १९’ आणि ‘कोरोनाविषाणू’ हे दोन भिन्न रोग असल्याचा खुलासा केला आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
चीनमधील वुहान येथे नोव्हेंबर २०१९ मध्ये आढळून आलेल्या विषाणूला ‘नोव्हेल कोरोना १९’ अर्थात कोविड १९’ हे नाव देण्यात आले. या विषाणूने संक्रमित होऊन जानेवारी २०२० मध्ये केरळमध्ये आलेले तीन रुग्ण सोडले, तर देशात अद्याप एकही ‘कोविड १९’चा रुग्ण नसल्याचा दावा डॉ. दीपक यांनी केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना डॉक्टरांनी ‘कोविड १९’ च्या आधीपासून मानवी शरीरात ‘२२९ ई अल्फा कोरोनाविषाणू’, ‘एनएल ६३ अल्फा कोरोनाविषाणू’, ‘ओसी ४३ बिटा कोरोनाविषाणू’ आणि ‘एचकेयू १ बिटा कोरोनाविषाणू’ हे चार विषाणू असतात. हे चार प्रकारचे विषाणू माणसाची प्रतिकार शक्ती कमकुवत झाली की उफाळून येतात. प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप हीच लक्षणे या चारही विषाणूंची आहेत. ‘कोविड १९’ च्या निमित्ताने मानवाच्या शरीरात लपून राहिलेल्या कोरोनाच्या या चार विषाणूंच्या तपासण्या सुरू आहेत, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याही पुढे जात त्यांनी भारतात ‘कोविड १९’ ची अधिकृत तपासणी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि ‘एनएलडीसी’ या दोनच ठिकाणच्या प्रयोगशाळेत होते. अन्यत्र होणाऱ्या चाचण्या आणि तपासणी या वर नमूद चार कोरोना विषाणूच्या होत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे याबाबतही जनतेला नेमकेपणाने माहिती देणे अनिवार्य झाले आहे.
शरीराचे तापमान मोजणाऱ्या थर्मल गनचा मोठा बोलबाला करण्यात आला. कारखान्यांना या थर्मल गनच्या खरेदीची सक्ती करण्यात आली. बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या तापमानाची नोंद करण्याची छायाचित्रे बऱ्यापैकी छापूनही आली. त्यामुळे कोरोनाची लागण आहे की नाही हे तपासणारे यंत्र अशी ओळख या थर्मल गनची समाजात निर्माण झाली. खरेतर कोरोनाची लागण झाली की नाही हे तपासण्यासाठी सरकारने ऑक्सीमीटरचा वापर केला पाहिजे असे कोकण रेल्वेचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. राजाराम यांचे म्हणणे आहे. त्यांनी समाज माध्यमातून हिरीरीने हा विषय मांडला. त्याचा पाठपुरावा केला. वेगवेगळ्या राज्यातील संपर्कात असलेल्यांपर्यंत हा विषय पोचवला त्यामुळे अनेक ठिकाणी या ऑक्सीमीटरचा वापर सुरू झाला आहे. या यंत्रणा बोट लावल्यानंतर रक्तातील प्राणवायूचे म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे हे नोंद होते. ते प्रमाण ८२ ते ७० पर्यंत खाली आले की त्याला कोरोनाची लागण झाली असे मानता येऊ शकते. त्यामुळे त्याची चाचणी करणे अनिवार्य ठरते. सरकारने अशा उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्यास त्यातून खरोखर वैद्यकीय मदतीची गरज असलेले रुग्ण सापडू शकतात. ताप येण्याची कारणे अनेक असल्याने केवळ शरीराचे तापमान नोंदवून तसे काही साध्य होणार नाही. त्याशिवाय सध्या कोरोनाने बाधीत असे म्हणतील म्हणून अनेक जण ताप येतो असे दिसल्यावर पॅरासिटामॉलची मात्रा घेतात ते वेगळेच.
सरकारने आरोग्य सर्वेक्षण केले. त्यातून श्वसनाचा आजार असलेले शेकडो समोर आले. त्यांच्या चाचण्यांतून निष्कर्ष काय आले हे सांगितले गेले पाहिजे. आरोग्य सचिव नीला मोहनन यांना पत्रकार परिषद घेण्यास सरकारने सांगितले हे उत्तमच. सरकारने माहिती केवळ एकाच व्यक्तीच्या माध्यमातून सर्वांसमोर येईल याची काळजी घेतली पाहिजे. तसे न करण्यातून दोन व्यक्तींच्या बोलण्यातील असलेल्या नैसर्गिक तफावतीतून समाजात अकारण गैरसमज पसरतो. मुख्य म्हणजे कोणतीही माहिती दडवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, समाजातील सर्व घटकांची मानसिकता लक्षात घेऊन सरकारने जास्तीत जास्त माहिती जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातूनच समाजमनातील भीती दूर करता येईल. मात्र मांगोरहिलमधून सरकारने धडा घेतला असेल काय हा सर्वात मोठा आजच्या घडीला समोर आला आहे.

संबंधित बातम्या