गोव्‍याच्‍या सीमा ३० एप्रिलपर्यंत बंद

Dainik Gomantak
रविवार, 12 एप्रिल 2020

येत्या १४ एप्रिलनंतर टाळेबंदीबाबतचा निर्णय राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात येईल. ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी असावी, अशी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

पणजी,

येत्या १४ एप्रिलनंतर टाळेबंदीबाबतचा निर्णय राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात येईल. ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी असावी, अशी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. १४ एप्रिलनंतरचे पुढील १५ दिवस राज्याच्या सीमा बंद राहतील. राज्याबाहेरून कोणालाही गोव्यात येण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. १३ एप्रिलपासून राज्यव्यापी आरोग्य सर्वेक्षण केले जाणार असून कोणताही सर्वेक्षक कोणाच्या घरात न जाता, पाच प्रश्न विचारून त्याची माहिती अॅपवर नोंदवून घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आर्थिक व्यवहार लवकरात लवकर सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी १४ एप्रिलनंतर काही व्यवसायांना परवानगी दिली जाणार आहे. कोणते निर्बंध असतील, काय करता येईल? काय करता येणार नाही? याची माहिती नागरिकांना राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जारी झाल्यानंतर देण्यात येईल. राज्य यापुढेही सुरक्षित राहावे, यासाठी राज्यात काही कडक निर्णयांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. १४ एप्रिलनंतर काही उद्योग सुरू झाले तरी त्या उद्योगात काम करणाऱ्या राज्याबाहेरील कामगारांना येता येणार नाही, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या