राष्ट्रीय स्पर्धेबाबत गोव्याची मेअखेरपर्यंत ‘डेडलाईन’

dainik gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

राष्ट्रीय स्पर्धेबाबत गोव्याची मेअखेरपर्यंत ‘डेडलाईन’   

पणजी,

कोरोना विषाणू महामारीच्या अनुषंगाने ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत गोवा सरकारने ३१ मेपर्यंत डेडलाईन पाळण्याचे ठरविले आहे. त्यानंतर कोविड-१९ परिस्थितीचे आकलन आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेशी (आयओए) सल्लामसलत करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव जे. अशोक कुमार यांनी पत्राद्वारे ‘आयओए’चे सचिव राजीव मेहता यांना कळविले आहे.
जे. अशोक कुमार गोव्याचे क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे सचिवही आहेत. गोव्यात यावर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा नियोजित आहे. स्पर्धेच्या आयोजनाविषयी अशोक कुमार यांनी २७ एप्रिलच्या तारखेने मेहता यांना पत्र पाठविले आहे. त्यात कोविड-१९ महामारीचा जागतिक क्रीडा क्षेत्रावर प्रतिकुल परिणाम झाल्याचे आणि टोकियो ऑलिंपिकसह प्रमुख स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत याकडे लक्ष वेधले आहे.
जे. अशोक कुमार यांनी पत्रात म्हटले आहे, की ‘‘परिस्थिती भीषण असूनही, मी आश्वस्त करू इच्छितो, की गोवा सरकार आणि आयोजन समिती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने वचनबद्धतेसाठी काम करत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली असून त्याअंतर्गत ३१-५-२०२० पर्यंत सर्व आवश्यक तयारीबाबत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कोविड-१९ परिस्थितीचे आकलन आणि आयओएशी सल्लामसलत करून स्पर्धेच्या आयोजनाविषयी योग्य निर्णय घेतला जाईल, यासाठी पात्र संघांच्या सहभागाची खात्री करणे महत्त्वाचा मुद्दा राहील.’’
कोविड-१९ची देशव्यापी परिस्थिती अजून पूर्ण नियंत्रणाखाली नाही. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत आहे. त्यानंतरही लॉकडाऊन लांबण्याचे संकेत आहे. गोव्यात कोरोना विषाणू संसर्ग असलेला एकही रुग्ण नाही, पण देशातील अन्य राज्यातील काही जिल्हे महामारीचे हॉटस्पॉट आहेत.
‘‘आशा राखण्याव्यतिरिक्त या कठीण परिस्थितीत अधिक आश्वासन देऊ शकत नाही आणि भविष्यातील कृतीबाबत मी आपले मत ऐकण्यासाठी इच्छुक आहे,`` असे पत्राची सांगता करताना अशोक कुमार यांनी मेहता यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे ठरलेल्या वेळेत आयोजन किंवा स्पर्धा पुढे ढकलण्याविषयी निर्णयाबाबत राज्य सरकारने चेंडू आयओएच्या कोर्टमध्ये टाकला आहे हे या पत्रावरून स्पष्ट होत आहे.

 

संबंधित बातम्या