बाबूश सुधारले हो! खरी कुजबूज..

मुख्यमंत्री सावंत यांचे स्पष्टीकरण
Goa Assembly Elections
Goa Assembly ElectionsDainik Gomantak

बाबूश सुधारले हो!

दिल्लीचे ‘इंडिया टुडे’चे पत्रकार राहुल कन्वर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मुलाखत घेतली. ती भलतीच व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत बाबूश मोन्सेरात यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेले उत्तर लोकांचे चांगलेच मनोरंजन करू लागले आहे. बाबूशला काही मी राजकारणात आणले नाही, येथवर त्यांनी सांगणे ठिक आहे. परंतु पुढे ते म्हणतात - ‘बाबूश आता सुधारलेही असतील.’ त्यावर कन्वरही चकीत होत म्हणतात - ‘सुधारले असतील, हाऽऽ हाऽऽ हाऽऽऽ’ ∙∙∙

पर्रीकरांचा वारसा असाही...

भाजपच्या नेत्यांनी जरी तारस्वरात पर्रीकर हा आमचाच वारसा आहे आणि तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही, असे ठासून सांगितले असले तरी पर्रीकरांचा वारसा सोडून देण्याकडेच या पक्षाच्या नेत्यांचा कल राहिला आहे. गुरुवारी ‘इंडिया टुडे’च्या पत्रकारांनी भाजप नेत्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा तरी हे प्रामुख्याने दिसून आले. मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी सांगून टाकले, बाबूश मोन्सेरात यांच्यासारख्या प्रवृत्ती या आधीपासून सक्रिय होत्या आणि भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांनी त्यांना उपकृत करून महत्त्वाची पदेही दिली. त्यांनी जरी पर्रीकरांचे नाव घेतले नसले तरी हा टोमणा कुणाला होता? हे चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येईल. पर्रीकरांनी बाबूशना भाजपमध्ये घेतले, एवढेच नव्हे, तर आपल्या शेवटच्या कारकिर्दीत बाबूशना पीडीएही दिली होती. आता जेव्हा मोन्सेरात पती-पत्नीला उमेदवारी दिली जाते आणि मोन्सेरात यांच्यावरील गुन्ह्यांचा पाढा वाचला जातो, तेव्हा स्वाभाविकच मुख्यमंत्र्यांना सांगावे लागते की, मी नाही, आमच्या तत्कालीन नेत्यांनी (म्हणजे पर्रीकरांनी) त्यांचा असा मानमरातब ठेवला. ∙∙∙(Babush Monserrat has changed, he has become a good person says Cm Pramod Sawant)

Goa Assembly Elections
सासष्टी तालुक्यातील मतदारसंघात भाजपची मात्रा चालली नाही

उत्पलचा सूत्रबद्ध प्रचार

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजीतील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानून ते सर्वांना भेटताहेत. इतकेच नव्हे, तर वडिलांबरोबर राजकीयदृष्ट्या वितुष्ट असलेल्यांनाही त्यांनी भेटायला कुचराई केलेली नाही. त्यांना शिवसेनेसह मगोपने पाठिंबा दिला आहे. तृणमूलने येथे उमेदवारी दाखल केलेली नाही. केवळ वडिलांच्या पाठीराख्यांवर अवलंबून न राहता उत्पल पर्रीकरांनी आता भाजपच्या एकूणच हिंदू मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्याशी बोलताना ते भाजपने केवळ आपलाच नव्हे, तर मतदारांचाही विश्वासघात केला आहे, असे आवर्जून सांगतात. ते वडिलांच्या वारशाबद्दल बोलतात आणि भाजपने तो वारसा संपविण्यास सुरवात केली आहे, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा येते. परंतु ते चुकूनही भाजपला पाठिंबा देणार नाही, असे सांगत नाहीत. त्यांचा एकूण भर भाजपामध्ये सुधारणा झाली पाहिजे, हा पक्ष चांगल्या लोकांच्या हाती गेला पाहिजे, यावर असतो. ∙∙∙

गोव्यात येतेय राजकीय वादळ

राहुल गांधी (Rahul Gandhi) गोव्यात आल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये एक विलक्षण उत्साह संचारला असल्याचे दृश्य निर्माण झाले आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तर भलतेच फॉर्मात आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत कॉंग्रेसचा वाढलेला ग्राफ. गेल्या आठवडाभरात कॉंग्रेस पक्षाने भाजपशी बरोबरी साध्य केली आहे. सध्या दोघेही 13 ते 15 जागांवर येऊन थडकले असून, कॉंग्रेसची धाव कमी न होता तिला वेग येत असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. कॉंग्रेस पक्षाकडे यापूर्वीच २९ टक्के मते होती. शिवाय भाजप गेली दहा वर्षे सत्तेत असल्याने तसेच त्या पक्षाने अनेक चुका आणि घोडचुका केल्या. त्यामुळे प्रस्थापितविरोधी लाट राज्यात तीव्र स्वरूप धारण करू लागली आहे. त्यात आम आदमी पार्टीचाही बोलबाला आहे. भाजपच्या एकूण एक उमेदवारांना या लाटेचा फटका बसला असून, जिंकण्यासाठी सर्वांनाच प्रचंड धडपड करावी लागत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास हळदोणे. तेथे कॉंग्रेस उमेदवार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे. उत्तर गोव्यात भाजप विरोधातील वातावरण गडद होत असल्याचा अनुभव येतोय. मुख्यमंत्र्यांनाही आपल्याच मतदारसंघात सध्या अडकून पडावे लागते. ∙∙∙

Goa Assembly Elections
सावर्डे मतदारसंघात अपक्षांच्या ‘कात्रीत’ अडकले भाजप !

वडापाव आणि बिर्याणी

बदलत्या काळाप्रमाणे सध्या निवडणूक (Goa Assembly Election) लढविणे महाग झाले आहे, त्याचप्रमाणे कार्यकर्तेदेखील मिळणे मुश्‍किल झाले आहे. मिळाले तरी त्यांचे चोचले पुरवणे उमेदवारांना महाग पडू लागले आहे. पूर्वीच्या काळी निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना वडापाव आणि चहा दिला म्हणजे पुरे होत असे. ते दिवसभर प्रचारात मग्न असायचे. मात्र, आता काळाप्रमाणे सर्व काही बदलले आहे. आता कार्यकर्त्यांना वडापावऐवजी चक्क बिर्याणी लागते आणि चहाऐवजी..... सूज्ञास अधिक सांगणे न लगे.∙∙∙

पालथ्या घड्यावर पाणी

पक्षांतरामुळे भयभीत झालेल्या कॉंग्रेस पक्षाने निवडून आल्यानंतर आमदारांनी पक्षांतर करून इतर पक्षांचा आसरा घेऊ नये, यासाठी पराकोटीची धडपड सुरू केली आहे. आज कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा पार पडला. यावेळी मडगावच्या विशाल पै काकोडे यांनी महत्त्वपूर्ण अशी मास्तराची भूमिका निभावली. काकोडे यांनी या उमेदवारांकडून चक्क चार वेळा उमेदवारांकडून शपथपत्राचा सराव करून घेतला आणि त्यांना उच्चारशास्त्रही शिकवले. प्रत्यक्षात शपथग्रहण सोहळ्यात उमेदवारांनी नको होत्या, त्या चुका केल्याच. त्यामुळे काकोडे सरांची मास्तरकी चुकली, की उमेदवारांनाच या शपथग्रहण सोहळ्यात रस नव्हता, हे काही कोडे उलगडले नाही. ∙∙∙

भ्रष्टाचार त्याचा आणि नोकऱ्या भाजपच्या?

सावर्डे मतदारसंघात मावळते आमदार दीपक पाऊसकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले असले तरी त्यांना तसा लोकांचा पाठिंबा बराच मिळत आहे. हा पाठिंबा मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी या नवीन नोकर भरतीत आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या नोकऱ्या. त्यामुळे भाजपच्या पोटात दुखत आहे. यावर उपाय म्हणून भाजप नेत्यांनी या मतदारसंघात कुणाला नोकरी मिळाली आहे, त्यांच्या पालकांची बैठक मोले येथे घेऊन या नोकऱ्या तुम्हाला भाजप पक्षाने दिल्या आहेत पाऊसकरांनी नव्हे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. या नोकऱ्या देताना भ्रष्टाचार झाला, असा विरोधकांनी आरोप केला. त्यावेळी भाजपने पाऊसकर यांना बिनदिक्कतपणे तोफेच्या तोंडी दिले. पण आता त्यांनी दिलेल्या नोकऱ्यांचे श्रेय मात्र स्वतः घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो, याला काय बरे म्हणावे? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com