सूंभ जळाला; पण पिळ काही जात नाही... खरी कुजबूज!

गिरीशचे ते वक्तव्य पाहता ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, असल्यातलेच वाटत नाही का? ∙∙∙
Goa Assembly 2022
Goa Assembly 2022 Dainik Gomantak

Goa Assembly Election Latest Discussion

क्लाफासने केले हातवर!

‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ ही म्हण कदाचित कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनी ऐकली नसणार. सध्या या म्हणीचा अर्थ क्लाफास समर्थकांना मात्र अचूक कळला असणार. कुंकळ्ळी मतदारसंघातील काही बेरोजगार तरुणांनी पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा दिली होती. भाजप समर्थक नगरसेवकांनी आपल्या समर्थकांची नावे पोलिस पदासाठी आमदाराकडे दिली होती. मात्र, आमदारांनी काम करतो म्हणून आश्वासन दिलेल्या एकाही उमेदवाराचे काम झाले नसल्यामुळे क्लाफास समर्थक नगरसेवक व समर्थक युवक संतप्त झाले आहेत. करामत म्हणजे काही भाजपा स्थानिक कार्यकर्त्यांच्या समर्थकांना शंभर गुण मिळाले. क्लाफासच्या लिस्टवर असलेल्यांना मिळाले फक्त दहा गुण. आता डायस समर्थक नगरसेवक म्हणायला लागले आहेत की, ‘हेचि फळ काय मम तपाला’. ∙∙∙

दोन पत्ते कापले?

आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी रविवारी प्रसिद्ध केली. यात दोन महत्त्वाचे चेहरे लापता आहेत. त्यात दयानंद नार्वेकर (हळदोणे) आणि वाल्मिकी नायक (पणजी) या दोघांचा समावेश आहे. या दोघांनाही उमेदवारी मिळेल का, याबाबत सध्या साशंकता निर्माण झाली आहे. दयानंद नार्वेकर यांच्याबद्दल काहींनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरे, भंडारी समाजाचे मुख्यमंत्री ही घोषणा दिल्यानंतर नार्वेकर स्वतःच नाराज झाले होते. दुसऱ्या बाजूला वाल्मिकी नायक यांना अद्याप उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला नाही. वाल्मिकी नायक यांना पक्षातूनच विरोध होतो आणि त्यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारे कार्यक्रम राबवले नाहीत, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. ∙∙∙

सूंभ जळाला पण...

सध्या गोव्यात काँग्रेसची (Congress) स्थिती सूंभ जळाला; पण पिळ काही जात नाही अशी झाली आहे. सध्या भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसने ठेवला आहे. अर्थातच गोव्यात आपली डाळ काही शिजू शकणार नाही याची जाणीव झाल्याने तृणमूलला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे हे सांगण्याची गरज नाही. तरीही आमचे जे तुम्ही घेऊन गेले आहेत ते पुन्हा परत करा आणि आमचे हात कणखर करा, असा सल्ला गिरीशने तृणमूलच्या नेत्यांना दिला आहे. गिरीशचे हे वक्तव्य पाहता ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, असल्यातलेच वाटत नाही का? ∙∙∙(Currently Congress in miserable condition in Goa)

Goa Assembly 2022
पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांच्या चेहऱ्याशिवाय भाजप मैदानात, काय आहे तयारी?

सर्वकाही आचारसंहितेसाठी!

सरकारी काम सहा महिने थांब अशी म्‍हण प्रचलित आहे. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर शासकीय यंत्रणेबरोबरच पालिकाही सक्रिय झाल्‍या आहेत. पण, त्‍या विकासकामांसाठी नव्‍हे, तर निवडणूक प्रचारफलक लपविण्‍यासाठी. युद्धपातळीवर जणू मोहिमच उघडली आहे. राष्‍ट्रीय महामार्गाचे संथगतीने चालणाऱ्या कामाला ‘आप’च्‍या झंझावाती एन्‍ट्रीने महामार्ग ठेकेदाराची तर झोपच उडाली. ‘आप’चे (AAP) बॅनर्स, पोस्‍टर्स लागणार म्‍हणून रंगरंगोटी रातोरात करण्‍यात आली. आता पालिका कर्मचारी पुलाच्‍या भिंतीवर चिकटवलेले व रंगविलेले फलक ते नीट दिसणार नाही, याची पूरेपूर दक्षता घेत आहेत. अतिउत्‍साही एका व्‍यक्तीने रंगरंगोटी करणाऱ्यांना विचारले, केवळ पोस्‍टरच का, संपूर्ण भिंतच रंगवा ना, चांगले दिसेल? त्‍यावर ते मिश्‍लिकपणे म्‍हणाले, पालिकेने तेवढेच काम आमच्‍यावर सोपविले आहे. केवळ पोस्‍टर्सच रंगवायची, बाकी आम्‍हाला काय लागत नाही. आचारसंहिता आहे ना, त्‍याने साळसूदमध्‍ये उत्तर दिले. त्‍यावर ती व्‍यक्तीही म्‍हणाली, आचारसंहितेचे केवळ निवडणुकीपुरतेच नव्‍हे, तर दररोजच पालन करा, जनकल्‍याण होईल आणि जनतेचा आशीर्वादही लाभेल! ∙∙∙

सरकारी काला अन् तरुणांना लागला भाला!

पूर्वी गावात काल्याला व जत्रेला मटमटकारांचा काला नाचायचा. रुपडी घालून कलाकार नाचायचे. असाच काला भाजपा (BJP) सरकारने खेळून येथील तरुणांच्या भावना दुखावण्याचे व स्वप्नभंग केल्याची भावना येथील बेरोजगार तरुणात झाली आहे. दहा हजार नोकऱ्या देण्याच्या बाता मारणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपा सरकार खोटे ठरले आहे. नोकऱ्यांचा जो बाजार मांडला व निवडणूक आचारसंहिता लागणार हे माहित असून नोकऱ्या होल्डवर ठेवणाऱ्या भाजपा सरकारातील मंत्री व आमदारांना तरुणाईच्या रोषाला बळी पडावेच लागणार. ज्यांना नोकरी मिळून होल्डवर राहिले ते ही दुःखी व ज्यांना नोकरी मिळाली नाही तेही दुःखी. ∙∙∙

लोबोंची खिल्ली

‘टूटेदर फॉर बार्देशच्या बॅनर’खाली राजकीय इप्सित साध्य करू पाहणाऱ्या मायकल लोबो यांची शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी खिल्ली उडवली आहे. लोबो यांचा उल्लेख दरूद्री म्हणून करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शिवोली मतदारसंघातील एका कार्यक्रमाच्या दरम्यान लोबो यांची खिल्ली उडवताना मांद्रेकर म्हणाले, की घाटी माणसांसमवेत लोबो पत्रकार परिषदा घेतात. परंतु, आमचा एकही कार्यकर्ता मतदारसंघाच्या अथवा गोव्याबाहेरचा नाही. मतदारसंघातील एखाद्या गावातही फिरतानाही आमचे जस्तीत जास्त कार्यकर्ते त्या गावातीलच असतात. आम्ही बाहेरची माणसे आणून शक्तिप्रदर्शन करीत नाही. लोकांना विकत घेण्याचीही आम्हाला आवश्यकता भासत नाही, आमच्या मागे जनता आहे. पाकिटात पैसे घालून व खिरापती वाटत गोळा करून आणलेल्या भाडोत्री माणसांना विकत घेण्याचीही आमची प्रवृत्ती नाही, असेही ते म्हणाले. लोबो यांच्या पत्नी खरोखरच भाजपच्या कार्यकर्त्या असतील तर त्या भाजपचा पट्टा अथवा कॅप परिधान करून का प्रचार करीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. ∙∙∙

बाबू नगरी

सध्या बाबू आजगावकर यांची मडगावची उमेदवारी भाजपने नक्की केली आहे. त्याचा पडताळा मडगावमध्ये नियुक्त झालेल्या पोलिस निरीक्षकावरून येऊ शकतो. बाबू आजगावकर यांना निकट असलेल्या पेडण्याचे पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर यांना सध्या मडगाव पोलिस स्टेशनचा ताबा देण्यात आला आहे. बाबू जेथे जातो तेथे नार्वेकर येतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचे म्हणजे मडगावमध्ये तिकीट देणार असेल तर नार्वेकरही द्या, अशी अट बाबूंनी मुख्यमंत्र्यांना घातली होती. ती मंजूर झाली आहे. आता निवडणुका होईपर्यंत तरी बाबूचेच राज्य मडगावमध्ये असेल. ∙∙∙

...तर विजयची पंचाईत

फातोर्डा मतदारसंघात अकस्मात शुक्रवारी मडगावचे कॉंग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत यांची प्रचारगाडी फिरायला लागली व त्या भागातील मतदार विस्मयचकित झाले. जर कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डमध्ये निवडणुकीसाठी समझोता झाला आहे तर मग या गाडीवर विजयबाबांचाही फोटो व गोवा फॉरवर्डचे नाव हवे होते ना? कॉंग्रेसची प्रचारगाडी फातोर्डात का? हा सुद्धाप्रश्र्न उपस्थित झालाच. त्यातच कॉंग्रेसचे राज्य अध्यक्ष गिरीशबाबने फातोर्डाचा निर्णय एक दोन दिवसांत घेतला जाईल, असे पत्रकारांना सांगून विजयबाबांना घाम काढला आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस व गोवा फॉर्वर्डमध्ये युती झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण, नंतर बोलणी फिसकटली व दोन्ही पक्षांमध्ये या विषयासंबंधी मौन पाळण्यात आले. जर कॉंग्रेसने फातोर्डात आपला उमेदवार ठेवलाच तर विजयबाबाची पंचाईत होणार नाही का? ∙∙∙

खेळ कोटींच्या उद्दिष्टांचा

सध्या राज्यप्रशासनातील एक ज्येष्ठ व्यक्ती निवृत्तीच्या उंबरठ्यावर आली आहे. ही व्यक्ती राजकीयदृष्ट्याही खूप मोठी वजनदार आहे. ती निवृत्त होण्यापूर्वीच तिला सरकारच्या एका खात्यातून दहा कोटींची थैली मिळावी असा सौदा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील एक संतोष नामक अभियंता या अधिकाऱ्यासाठी पैसे जमा करतो आहे. त्याचे उद्दिष्ट्यच दहा कोटींचे आहे. त्यानुसार राज्यातील बड्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे.∙∙∙

Goa Assembly 2022
गोव्यातील लोकांमध्ये भाजप सारकारबद्दल असंतोष: प्रसाद गावकर

सरकारी नोकऱ्यांवर ‘भायले’

हा सरकारी नोकऱ्यांचा नेमणुकांचा आदेश आहे. त्यातील बहुसंख्य नावे ही बिगरगोमंतकीयांची आहेत. या नावांवरून सध्या समाजमाध्यमांमध्ये जहाल चर्चा सुरू आहे. त्यानुसार आता यापुढे सरकारी नोकऱ्यांसाठी बिगर गोमंतकीयांचीच नावे दिसू लागणार आहेत. एक काळ असा होता पोलिस खात्यात कारवार आणि सावंतवाडीचे लोक दिसायचे. त्याशिवाय पीडब्ल्यूडीमध्ये केरळीयन माणसे दिसायची. सध्या गोव्यात बेकारी असल्याने शिवाय पगार भरमसाठ झाल्याने या सगळ्या सरकारी खात्यात गोव्याचे लोक दिसू लागले आहेत. आता बिगर गोमंतकीयांचा आकडा जास्त होऊ लागल्याने यापुढे सरकारी नोकऱ्यांवर भायल्यांची मोहर बसली तर नवल ते काय? ∙∙∙

बाबूंचे ‘कमळ’प्रेम आटले का?

निवडणूक म्‍हटली की आरोप-प्रत्‍यारोपाच्या फैरी आल्याच. दोन दिवसांपूर्वी बाबू आजगावकर यांनी तडिपार शिक्षा झालेल्‍याने आरोप करू नयेत, असे वक्तव्‍य केले. मतदारही चक्रावले. काल-परवापर्यंत ज्‍याच्‍या मांडीला मांडी लावून गुणगाण करत होते, ती व्‍यक्ती आपल्‍या पक्षाशी एकनिष्ठ राहिली, तर तो तडक गुन्‍हेगार असल्‍याचे लेबल बाबूंनी लावले. आपल्‍या मनासारखे झाले नाही, म्‍हणजे समोरचा दोषी, हे वागणं बरं नव्‍हे! नाहीतर बाबू यापूर्वी कोरगावकर यांना नवखे पाहुणे, आर्लेकर यांना ड्रग्‍स व्‍यावसायिक असल्‍याचा ठपका ठेवला. त्‍यानंतर तर मुख्‍यमंत्र्यांना नोकऱ्यांबाबत जाब विचारण्‍याबाबत मजल गेली. लोकप्रतिनिधी म्‍हणून त्‍यांनीच काय तो जाब विचारावा? आपली घुसमट व्‍यक्त करताना ते असफलताही चव्‍हाट्यावर आणत आहेत. त्‍यामुळे ‘कमळ’प्रेम आटले की काय? अशी मतदारांत चुळबूळ सुरू झाली त्‍यांना कोण आवरणार? ∙∙∙

पोलिसही धास्तावले!

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असून, त्याचा फटका पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही गेल्या काही दिवसापासून बसू लागला आहे. त्यामुळे पोलिस मुख्यालयात असलेली बहुतेक केबिन्स बंद आहेत. तीन आयपीएस अधिकारी कोरोना बाधित झाले असल्याने या मुख्यालयात दैनंदिन दस्तावेज घेऊन येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. या अधिकाऱ्यांचा ताबा इतर अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे त्यामुळे इतर अधिकारीही तणावाखाली आले आहेत. या ठिकाणी विविध विभागात काम करत असलेले कर्मचारीही भयभीत झाले आहेत. काहींनी रजेवर जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे नेहमी गजबजणारे पोलिस मुख्यालयात कामकाज दिवशीही वर्दळ कमी झाली आहे. काही अधिकाऱ्यांनी आपल्या केबिनच्या दरवाज्यावरच स्टँड उभे करून भेटण्यास मनाई केली आहे. जे काही तक्रार आहे ती तेथे ठेवलेल्या बॉक्समध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ∙∙∙

फतवा कुणासाठी?

निवडणूक आयोगाने फतवा काढल्यानुसार आता शंभर लोकांपेक्षा जास्त प्रचार घेऊन उमेदवारांना फिरता येणार नाही. ओरिसामध्ये एका उमेदवाराला एक हजार लोकांना घेऊन फिरल्याबद्दल काल अटक करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी उत्तर गोव्यात एक मंत्री दोन हजार अधिक प्रचारक घेऊन फिरत होता. ‘कोविड’चे संकट घोंगावत असताना ज्या प्रकारे मंत्री-संत्री सारे निकष जुगारून फिरू लागले आहेत. तो खरा चिंतेचा विषय आहे. परंतु सरकारपेक्षा ही चिंता लोकांनाच अधिक ग्रासू लागली आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com