वय उलटलेल्यांना भाजपकडून नारळ

श्रीपाद, पार्सेकर यांच्याकडे दुर्लक्ष करून तिकीट वाटप
Shripad Naik and Laxmikant Parsekar
Shripad Naik and Laxmikant ParsekarDainik Gomantak

पणजी : विधानसभा निवडणुकीसाठीच्या तिकीट वाटपातून भाजपने पक्षातल्या जुन्या नेतृत्वाचा संधिकाल सुरू झाल्याच्या तथ्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाकडून अव्हेरल्या गेलेल्या ‘जाणत्या’ नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांचा समावेश आहे, तर उत्पल पर्रीकर यांना त्यांच्या पसंतीचा पणजी मतदारसंघ नाकारत भाजप पर्रीकर पर्वालाही विस्मृतीत ढकलण्यासाठी सज्ज झाला आहे. (Goa News)

भाजपने गोव्यात राजकारण करण्याचे ठरवले, तेव्हा संघ परिवाराकडून लक्ष्मीकांत पार्सेकर, श्रीपाद नाईक आणि राजेंद्र आर्लेकर यांना पक्षकार्यासाठी हस्तांतरित करण्यात आले होते. कालांतराने मनोहर पर्रीकरही या त्रिकुटाला येऊन मिळाले होते. या चौघांनाही एकेकाळी भाजप संघटनेत मानाचे स्थान होते. पर्रीकर मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्रीही झाले. श्रीपाद नाईकांना भाजपच्या प्रत्येक सरकारात मंत्रिपद दिले गेले. पार्सेकरांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली तर आर्लेकर सभापती-मंत्री असा प्रवास करून आता एका महत्त्वाच्या राज्याचे राज्यपाल झाले आहेत. पर्रीकरांच्या निधनाने त्यांच्या राजकारणाला विराम मिळाला असला तरी पार्सेकर आणि नाईक यांना त्यांचे राजकारणाचे दिवस संपल्याची जाणीव पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने करून दिल्याचे वृत्त असून आर्लेकरांना राजभवनमध्ये पाठवत त्यांच्या राजकारणाचा अंतिम चरण सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत.

Shripad Naik and Laxmikant Parsekar
उत्पल पर्रीकरांना उमेदवारी का नाकारली?

पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीसाठी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मांद्रे मतदारसंघातून तिकीट नाकारून ते दयानंद सोपटे यांना दिले. जिंकून येणे, या निकषावर सोपटे पार्सेकरांना भारी ठरले आणि पार्सेकरांनी नव्वदीच्या दशकापासून पक्षासाठी खाल्लेल्या खस्ता इतिहासजमा झाल्या. आता पार्सेकरांसमोर तीनच पर्याय आहेत. ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असे म्हणत संघटनेत मिळेल ती जबाबदारी स्वीकारायची. पक्षाच्या विरोधात बंड करायचे किंवा आपले शैक्षणिक संस्थान सांभाळत बसायचे. बंड केले तर त्याची फलश्रुती त्यांना अनुकूल नसेल, असे मांद्रे मतदारसंघाचा कानोसा घेता दिसून येते.

श्रीपाद नाईक यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याची नोंद पक्षाने घेतली असून त्यांच्या मुलाला कुंभारजुवेतून तिकीट मिळवताना सायास पडत आहेत. पक्षाने अद्यापही कुंभारजुवेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण सिद्धेश नाईकांचा विचारही झाला नसल्याचे वृत्त आहे. श्रीपाद नाईक यांना राज्यात पाठवण्याचीही पक्षाची तयारी नाही. २०२४ साली पक्षाचा लोकसभेसाठीचा उमेदवारही वेगळाच असेल. भाजपच्या सुरुवातीच्या गोवा मोहिमेचे शिलेदार असलेले दुसऱ्या फळीतले गोविंद पर्वतकर, सुभाष साळकर हे नेते वयपरत्वे आधीच बाजूला झाले आहेत.

...तर श्रीपाद नाईकांनाही दाखवणार राजभवनचा मार्ग

श्रीपाद नाईक यांना राजभवनच्या मार्गाने निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला जाण्याची शक्यता गडद झाली आहे. भंडारी समाजाच्या अस्मितेला राजकारणात खेचून आणण्याच्या अन्य राजकीय पक्षांच्या प्रयत्नांनंतर भाजपमध्ये त्या समाजातले नवे नेतृत्व पुढे आणण्याचा विचार गतिमान झाला आहे. मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांचा पणजी मतदारसंघावरला दावा पक्षाने निकाली काढताना बाबूश मोन्सेरात यांना तर तिकीट दिलेच, शिवाय शेजारच्या ताळगावातून मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर यांना तिकीट देत मनोहर पर्रीकरांच्या घराणेशाहीच्या विरोधातील भूमिकेलाही मूठमाती दिली आहे.

उत्पलना कळंगुटचे ‘लॉलीपॉप’

उत्पल यांनी कळंगुट मतदारसंघातून उभे राहावे, असे प्रयत्न आता सुरू झाल्याचे वृत्त असले तरी त्यांची वाट तितकी सोपी नाही. शेजाऱ्याच्या काठीने साप ठेचून भाजप हातून निसटलेल्या कळंगुट मतदारसंघात उत्पल यांची गेम करू पाहात असल्याचीच चर्चा पर्रीकरांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. उत्पल यांनी पक्षत्याग करून वेगळी वाट धरली तर भाजपमधील पर्रीकर पर्वावर ती शेवटची मोहर ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com