पत्रकारांवर घसरण्याचे कारण काय? खरी कुजबूज..

म्हार्दोळ येथील गोविंद गावडे यांच्या कालच्या सभेवेळी गर्दी पाहून तर सूत्रसंचालकाने थेट चार भिंतीच्या आड बसून पत्रकारांनी याचे पारडे जड, त्याचे पारडे कमी असे लिहू नये, प्रत्यक्ष मैदानावर येऊन पहावे असे सांगितले.
Goa Assembly Election 2022

Goa Assembly Election 2022

Dainik Gomantak

Goa Assembly Election 2022

रडीचा डाव फसला

सावित्री कवळेकर यांची सांगेतील जाहीर सभा रेकॉर्ड ब्रेक झाली. सावित्रीसह कार्यकर्ते खूष झाले. व्यासपीठावर स्थानिक कार्यकर्ते वगळता कोणीच मोठा नेता, वक्ता नव्हता. सभेत बोलणारे प्रत्येकजण पोटतिडकीने बोलत होते. सहा हजाराच्या आसपास उपस्थिती लाभली. सर्व काही व्यवस्थित झाले. मात्र, अचानक सभा संपल्यानंतर चार युवक खुर्च्या मोडतोड करू लागले. कारण विचारले असता सभेचे पैसे दिले नाहीत हे कारण सांगू लागले. पण, कार्यकर्त्यांनी चोप देताच नावेली मतदारसंघातून आल्याचे त्यांनी सांगितले. दोघांना चोप देताच दोघेजण पळाले. मजेशीर गोष्ट म्हणजे घटना घडण्याआधी पोलिसांनी कॉल करून सावित्रींना भांडण झाले काय म्हणून चौकशी केली होती. तसे काही घडले नाही हे सांगून चारजण मोडतोड करीत आले. चोप देताच पळून गेले ही गोष्ट वेगळी. पण भांडण होण्याआधीच कॉल कुणी केला त्याचे नाव पोलिसांनी सावित्रींना सांगितले. शिवाय भांडण होणार म्हणून चार ठिकाणी चारजण उभे केले होते, तेही मार पडताच पळाले. आता सावित्री म्हणते, तोंड उघडाच नाव जाहीर करते. एक मात्र खरे रडीचा डाव फसला. ∙∙∙

सेकंड गियर नसलेली गाडी

सध्या गोव्यात काँग्रेस (Congress) पक्षाची स्थिती पाहता लोकांची सहानुभूती आहे. पण त्या सहानुभूतीचा फायदा घेणारे नेतेच या पक्षाकडे नाहीत, अशी एकंदर अवस्था आहे. बाकीचे पक्ष भरारी मारत असताना काँग्रेस मात्र अजूनही निर्णय लकव्याच्या आपल्या धोरणातून बाहेर येत नाही. त्यामुळे मतदारांनी या पक्षाला सेकंड गियरही नसलेली गाडी असे म्हणण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसची गाडी फक्त फस्ट आणि रिव्हर्स अशा दोनच गियरमध्ये चालू आहे, असे मतदार विनोदाने म्हणू लागले आहेत. तृणमूल आणि आप या दोन्ही पक्षांची गाडी सातव्या गियरमध्ये चालू असताना काँग्रेसची गाडी ही गती घेणार कधी? असा सवाल लोक करू लागले आहेत. ∙∙∙

मायकलची सिद्धता!

साळगाव मतदारसंघात आपला संभाव्य उमेदवार म्हणून जयेश साळगावकर यांना भाजपने जाहीर केले आहे. मात्र, जुना भाजप गट अद्यापही तीव्र असंतोषात असून, भाजपच्या उमेदवाराला पराभूत करायचे या इराद्याने वावरत आहे. ‘टुगेदर फॉर साळगाव’ या बॅनरखाली त्यांनी आता केदार नाईक यांना पुढे केले आहे. त्याला रुपेशचीही मदत आहे. मात्र, केदार नाईक यांना कॉंग्रेसच्या तिकिटाचे आमिष मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे साळगावमध्ये भाजप विरुद्ध भाजप असा सामना सध्या रंगत आहे. या साऱ्या नाट्यमय घडामोडींच्या मागे कळंगुटचे आमदार मायकल लोबो असल्याचे बाेलले जात आहे. काहीही म्हटले तरी मायकल साळगावचा वेगळा उमेदवार निवडून आणू शकतील, हे आता पुन्हा सिद्ध होण्याची शक्यता आहे. ∙∙∙

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022 </p></div>
पहिली आणि सर्वात कमी समुद्राची 'भरतीओहोटी'

श्रेय जरुर लाटा, पण...

केलेल्‍या कामाचे श्रेय खुलेआम लाटणे हा राजकीय नियमच आहे. त्‍याचा प्रत्‍यय जनतेला वेळोवेळी येतो. काहीवेळा विरोधकांना त्‍याबाबत बरेच काही खुपते, पण तो राजकीय डावपेचाचा भाग! जनतेचा थेट संबंध असलेले विकासकाम म्‍हणजे पत्रादेवी ते काणकोणपर्यंतच्‍या (Canacona) महामार्ग विस्‍तारीकरणाचे काम. हे काम आता अंतिम टप्‍प्‍यात आहे. मग, निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर त्‍याचे श्रेय न लाटून कसे होणार? महामार्गाचे लवकरच लोकार्पण होणार असल्‍याचे संकेत रविवारी पहाटेपासून बॅनर्सद्वारे मिळाले. पक्षश्रेष्ठींचेही फोटो झळकले आणि स्‍वागत आशयाचे मजकूरही झळकले. महामार्गावर नव्‍यानेच उभारलेल्‍या प्रत्‍येक पथदीपावर श्रेय लाटणारे बॅनर्स झळकत होते. ज्‍यांना सदोष कामाचा फटका बसला, त्‍यांना ते खटकत होते. महामार्गाचे श्रेय लाटण्‍यापूर्वी सदोष कामामुळे तब्‍बल ३० जणांचे बळी गेले, शेकडोजण जायबंदी झाले, त्‍यांची कधी जबाबदारी स्‍वीकारली का? ठेकेदाराच्‍या मनमानीला वेळोवेळी आशीर्वादच दिला. महनीय व्‍यक्तींच्‍या स्‍वागतासाठी खड्डे बुजविले. लोक पोटतिडकीने खड्ड्यांबाबत ओरडत होते, त्‍याकडे दुर्लक्ष. मग, आता कुठल्‍या तोंडाने श्रेय लाटू पाहताहेत? ∙∙∙

गोविंदाचे शक्तिप्रदर्शन

म्हार्दोळ येथील आझाद मैदानावर गोविंद गावडे (Minister Govind Gawade) यांच्या पहिल्याच प्रचार सभेला प्रचंड गर्दी झालेली पाहून त्यांच्या विरोधकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. गोविंद गावडे यांच्या 2017 च्या निवडणुकीत महालसा देवीला नारळ ठेवण्याच्या कार्यक्रमावेळीही अशीच गर्दी जमली होती. मात्र यावेळेला त्या गर्दीचा विक्रम मोडल्याचे दृष्टीस पडले. ही गर्दी पाहून गोविंद समर्थक सध्या जाम खूष झाले आहेत. गोविंद गावडे यांनीही लोकांचे एवढे मोठे समर्थन लाभल्याचे पाहून मतदारांचा हा आपल्यावरील विश्‍वास असल्याचे नमूद केले आणि सभेला उपस्थित लोकांनी एकच जल्लोष केला. ∙∙∙

अस्नोडकरांची बोलतीच बंद!

रोहन खंवटे यांना भाजपमध्ये (BJP) प्रवेश दिल्याच्या दिवसापासून पर्वरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांची बोलतीच बंद झाली आहे. इतके दिवस ते खंवटे यांच्या विरोधात पत्रकार परिषदांत आक्रमकतेने बोलत होते. परंतु, खंवटे यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर त्यांनी साधा नाराजीचा शब्दही स्वत:च्या मुखावाटे काढलेला नाही. याबाबत ‘सुज्ञांस अधिक सांगणे न लगे’ हे तर ओघाने आलेच. सध्या त्यांनी पक्षाच्या बैठकांना तसेच अन्य कार्यक्रमांत सहभागी होण्याचे जवळजवळ सोडूनच दिले आहे. खंवटे यांना भाजपमध्ये सन्मानाने घेतल्यानंतर पर्वरी भाजप मंडळातील अन्य कुणीही खंवटे यांना जाहीरपणे आजपर्यंत विरोध केला नाही. भाजप प्रवेशामुळे खंवटे आता पवित्र झाले की भाजपच्या दबावामुळे हे घडले, याबाबत काहीच सांगता येत नाही. कुंदाताई चोडणकरही मूग गिळून गप्पच आहेत. याबाबत एकमेव घटना घडली ती म्हणजे संदीप वझरकर यांनी मंडळ उपाध्यक्षपदाचा मुकाटपणे राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरच त्यांना कोमुनिदाद जमीन घोटाळाप्रकरणी अटक झाली, हाही सध्या जनमानसात चर्चेचा विषय बनलेला आहे. ∙∙∙

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022 </p></div>
पहिली आणि सर्वात कमी समुद्राची 'भरतीओहोटी'

एकाच कुटुंबात चार नोकऱ्या?

सांगे मतदारसंघातील एका राजकीय नेत्याने एकाच कुटुंबातील चार जणांना शासकीय नोकऱ्या दिल्याने सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. आपल्याला नोकरी मिळेल या आशेवर अनेक बेरोजगार युवक या राजकारणी नेत्याबरोबर फिरत होते. परंतु त्यांना ही बातमी समजताच या युवकांच्या आनंदावर विरजण पडलेे. यामुळे हे बेरोजगार युवक राजकारणापासून दूर चालले आहेत. या राजकारण्याने एका सधन घरातील चार जणांना शासकीय नोकरी देऊन आमच्यावर अन्याय केल्याची भावना या बेरोजगार युवकांमध्ये झाली आहे. चार गरीब बेरोजगार युवकांना शासकीय नोकरी दिली असती तर कदाचित निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये भर पडली असती अशी कुजबूज सध्या सांगे परिसरात सुरू आहे. ∙∙∙

तळ्यात ना मळ्यात!

तळ्यात ना मळ्यात, अशी सध्या काणकोणमधील परिस्थिती आहे. काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. तर माजी मंत्री रमेश तवडकर यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसल्याने इच्छुक उमेदवार चेतन देसाई, महादेव देसाई व जनार्दन भंडारी सध्या संभ्रमात आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ∙∙∙

लोबोंचा फटका थांबेना

सध्या सरकारमधील मंत्री असलेले मायकल लोबो आपल्या सडतोड विधानांनी चर्चेत आहेत. कदाचित, मनातील रागही ते आपल्या या विधानातून व्यक्त करीत असतील मात्र त्यांच्या विधानांना मात्र तितकेच गांभिर्याने घेतले जात आहे. कळंगुटमध्ये रविवारी झालेल्या एका सभेत त्यांनी गोव्यावर किती रुपयांचे कर्ज आहेत हेच सांगून टाकले. सरकारमधील मंत्री जेव्हा ‘सरकारच कर्जबाजारी’ असल्याचे सांगतो तेव्हा त्यांची सरकारमधील अस्वस्थता स्पष्ट दिसून येते. आप, तृणमूल सारखे पक्ष सध्या योजंनाच्या घोषणांचा सपाटा लावत आहेत. मात्र ह्या योजना केवळ घोषणाच उरतील, असे लोबोंचे म्हणने आहे. २४ हजार कोटींचे कर्ज डोक्यावर असताना सत्तेवर येणारे सरकार योजना कशा राबविणार असा प्रश्न लोबोंचा आहे. असे असले तरी प्रश्न एक अनुत्तरीत राहतो तो म्हणजे, आतापर्यंत लोबोंना हे कर्ज का आठवले नाही. ∙∙∙

पत्रकारांवर घसरण्याचे कारण काय?

जो तो येतो आणि पत्रकारांवर का घसरतो तेच कळायला मार्ग नाही. म्हार्दोळ येथील गोविंद गावडे यांच्या कालच्या सभेवेळी गर्दी पाहून तर सूत्रसंचालकाने थेट चार भिंतीच्या आड बसून पत्रकारांनी याचे पारडे जड, त्याचे पारडे कमी असे लिहू नये, प्रत्यक्ष मैदानावर येऊन पहावे असे सांगितले. आता पत्रकार थेट ‘फिल्ड''वर येऊनच बातमी करणार ना. मात्र या ठिकाणी सूत्रसंचालकाने पारड्याचा संबंध का लावला ते शेवटपर्यंत कुणाला काही कळले नाही. गर्दीचा आणि पारड्याचा तसा संबंधच नाही कारण उमेदवाराच्या संपर्कावर मोठी भिस्त असते, हे आधी कळायला हवे, नाही का... ∙∙∙

क्रांतिकारी फुटबॉल

फुटबॉल हा गोव्याचा लोकप्रिय आणि राज्य खेळ आहे. राज्यातील प्रत्येक ठिकाणी मोकळ्या जागी हा खेळ खेळताना मुलं-युवक दिसतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील चळवळ असलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्सला राजकीय पक्ष या नात्याने मान्यता दिली आहे. कित्येक दिवस त्यांचे मान्यतेसाठी प्रयत्न होते. ते साध्य करताना गोमंतकीयांसाठी आपुलकीचा असलेला फुटबॉल हे चिन्ह त्यांना लाभले आहे. अर्थातच रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते आता खूष होतील. पक्षाच्या चिन्हास लोकमान्यता मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. सध्या गोव्यात फुटबॉल मोसम सुरू आहे. आयएसएल, प्रोफेशनल लीग या स्पर्धा सुरू आहे. निवडणुकीच्या कालावधीतही या स्पर्धा सुरू असतील, साहजिकच रिव्होल्युशनरी गोवन्सला दुहेरी लाभ होण्याचा संभव आहे. ∙∙∙

मायकलला मुहूर्त मिळणार कधी?

कळंगुटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज आहेत. ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून नुसती चर्चाच आहे. आता भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शांत केल्याचे बोलले जाते. लोबो यांचा राग भाजपच्या संघटनमंत्र्यांवर आहे. हा राग दिल्लीपर्यंत पोचल्याची माहिती आहे. मात्र, या संघटनमंत्र्यांवर दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असल्याने मायकलला फार हालचाली करता येत नाहीत. परंतु मनात असलेली खदखद त्यांना भाजपमध्ये अस्वस्थ करीत आहे. ते कॉंग्रेसमध्ये जाणार यावर ठाम आहेत. पण, त्यांना मुहूर्त कधी मिळणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. ∙∙∙

गोविंदचा निर्णय कार्यकर्त्यांवर

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी अखेर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना पक्ष प्रवेशचे निमंत्रण दिले खरे, पण गोविंद गावडे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला आहे. आताच नव्हे तर मागच्या काळातही गोविंद गावडे यांना पत्रकारांनी भाजप प्रवेशासंबंधी छेडले असता कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. आताही तीच री गोविंदरावांनी ओढली आहे. गोविंद गावडे यांनी भाजपकडून पक्ष प्रवेशाचे निमंत्रण म्हणजे केवळ आपलाच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांचा हा गौरव असल्याचे नमूद करून एकप्रकारे कार्यकर्त्यांच्या शक्तीवरच आपली भीस्त ठेवली आहे, हेही तेवढेच खरे. ∙∙∙

कोलमरड नाल्याचे गौडबंगाल

मडगावातील विकासकामांवरून या दिवसांत बरीच चर्चा सुरू आहे. निवडणूक हे त्यामागील कारण आहे. झालेल्या कामांचे श्रेय घेणे व होऊ न शकलेल्या कामांचा दोष सरकारवर ढकलणे हेही ओघानेच आले. पण, मुद्दा तो नाही. कोलमरड येथील सुस्थितीतील नाला पाडून काही अंतरावर काही कोटी खर्चून नवा नाला बांधण्यावरून नगरसेवक व इतरांनी जलश्रोत खाते व संबधित नेत्यांना तर लक्ष केले आहेच शिवाय बिल्डरच्या फायद्यासाठी हे काम होत असल्याचा दावा केला आहे. मडगावात हल्लीच्या काळात जलश्रोत खात्याची बरीच कृपा झालेली आहे. त्यामागेही अशीच कारणे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाणी कुठे मुरतेय बरे..! ∙∙∙

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022 </p></div>
गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांवर पोहचला; आज कृती दलाची बैठक

बाबू आजगावकर यांचा राग

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर भाजपा तितकीशी खूष नाही. भाजपच्या सर्वेत म्हणे, बाबू मागे आहेत. म्हणून त्यांनी मगोच्या प्रवीण आर्लेकर यांना पायघड्या घातल्या आहेत. सोमवारी आर्लेकर भाजपमध्ये ‘कमळा’चा भगवा हातात घेणार आहेत. त्यामुळे बाबू आजगावकर यांचा राग काळ्या पट्टीवर गेला आहे. त्यातच मांद्रेचे जीत आरोलकर यांनी आजगावकर यांनी निवृत्ती घ्यावी, असा खोचक सल्ला दिल्याने बाबू संतापले आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण अनेक सरकारे घडवली असल्याचा दाखला देत ते आरोलकर यांच्या सल्ल्याची आपल्याला गरज नसून, आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा आर्लेकर यांनीच घ्यावा, असे ते सांगत सुटले आहेत. ∙∙∙

तिघे इच्छुक!

‘आप’चे प्रदेश निमंत्रक राहुल म्हांब्रे, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे असे तीन विविधांगी पक्षांचे नेते म्हापसा विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्टच आहे. उमेदवारीसाठी अन्य कुणीच स्पर्धक नसल्याने त्यापैकी म्हांब्रे व कामत यांची उमेदवारी तर जवळजवळ निश्चित झाली आहे. परंतु, दुसऱ्या बाजूने काँग्रेस अथवा तृणमूल काँग्रेसशी राष्ट्रवादीची युती होईल व आपल्या पदरात उमेदवारी पडेल या आशेने संजय बर्डे कामाला लागलेले आहेत. स्वत:कडे ‘व्हिटॅमीन-एम’ अर्थांत निधीचा अभाव असल्याने अशी युती न झाल्यास आपण केवळ राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून स्वत:च्या गाठीशी असलेला थोडाफार पैसा वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही, असा शहाणपणा त्यांना सुचना नसावा ना. ∙∙∙

भाजपातील गट

मडगाव भाजपमधील राजकारणाला पक्षनेते गांभीर्याने घेत नाहीत हे आता सर्वांनाच कळून चुकले आहे. आता तर ते स्वतः मनोहर पर्रीकर यांना या लोकांना एकत्र आणणे शक्य झाले नाही ते आपणाला कसे जमणार अशी विचारणा आपसात करताना दिसत आहेत. खरे तर त्या काळात मडगाव भाजपात दोनच गट होते. पण, आता ती संख्या चारवर गेली आहे. आता या नेत्यांबरोबर लोक किती आहेत तो प्रश्न वेगळा. काहींना तर नगरपालिकेवरही निवडून येता आलेले नाही तर उरलेल्यांना ती निवडणूक लढविण्याचेही धाडस झालेले नाही. अशांच्या गमजा किती चालवू द्यायच्या ते भाजपाने ठरवावयाचे. ∙∙∙

अनुभवातून शहाणे होताना!

2017 च्‍या निवडणुकीनंतर गोमंतकीयांनी बरेच काही अनुभवले. काँग्रेसला जनमत कौल असूनदेखील अखेर ‘कमळ’ फुललेच! आता ‘कमळ’ फुलविण्‍याचे लक्ष्‍य ठेवताना कुठलीही जोखीम नको म्‍हणून संभाव्‍य विजयी उमेदवारांच्‍या हाती ‘कमळ’ देण्‍याची जणू मोहीम आखली आहे. रवी नाईक, रोहन खंवटे, जयेश साळगावकर, प्रेमेंद्र शेट यांना प्रवेश दिला, तर गोविंद गावडे, विनोद पालयेकर, प्रवीण आर्लेकर यांच्‍या प्रवेशासाठी भाजपने पायघड्या घातल्‍या आहेत. मागील निवडणुकीनंतर सत्ता स्‍थापनेसाठी उत्तररात्रीपर्यंत बऱ्याच काही घडामोडी घडल्‍या होत्‍या. त्‍यातून बोध घेऊन आता रात्रीस खेळ नव्‍हे, तर दिवसा उजेडी ‘कमळ’ फुलविण्‍यासाठी निवडणुकीपूर्वीच सावध पावले टाकली आहेत. त्‍यात भाजपचे ‘तारणहार’ पुढील दोन दिवसांत गोवा दौऱ्यावर असल्‍याने ‘डावपेच’ आणखीच रंगतील, हे अनुभवातून आलेच! काहीही झाले तरी ‘सत्ता’ मिळालीच पाहिजे, असा पक्षश्रेष्ठींचा व्‍होरा आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com