गोमंतकीयांचा निवाडा खट्टा-मिठा

राज्य विधानसभेच्या निवडणूक निकालाने अनेकांना धक्का दिलाय. विखुरलेल्या विरोधकांमुळे भाजपाला मिळालेले अनपेक्षित बहुमत हेच ह्या निवडणुकीचे वैशिष्ट्य.
Goa Assembly Election Result 2022
Goa Assembly Election Result 2022Dainik Gomantak

डॉ. मनोज कामत-

शेवटच्या क्षणापर्यंत श्र्वास रोखून ठेवणाऱ्या निकाल प्रक्रियेच्या शेवटी २० जागा मिळवत भाजपने ४० सदस्यीय विधानसभेत काठावरले बहुमत मिळवण्याचा समीप पाऊल टाकले. तीन अपक्षांच्या साहाय्याने भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार घडवण्याच्या राजमार्गावरून जाण्यास सज्ज झालेला आहे.

जेमतेम १२ जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या शिडातील हवाच निघाल्यासारखी झालेय. या १२ पैकी १ जागा गोवा फॉरवर्ड पक्षाची आहे. गोव्यात नशिब आजमावण्यासाठी आलेल्या तृणमूल काँग्रेसची स्वप्ने धुळीस मिळालेली आहेत, तर किंगमेकर बनून सरकार स्थापनेचे दिशादर्शन करू पाहणारा मगो पक्षही तोंडघशी पडला आहे. तृणमूल काँग्रेसची कथित व्यूव्हरचना हाय व्होल्टेजची प्रचार मोहीम आणि कुजबुज मोहीमही सपशेल अपयशी ठरली. आम आदमी पक्षाने मूलस्तरावर घेतलेले परिश्रम त्यांना दोन जागांसह विधानसभेत प्रवेश देते झाले. उग्रवादी प्रादेशिकतेचे राजकारण करत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने मिळवलेली एक जागा राजकीय निरीक्षकांनाही अपेक्षित नव्हती. निसटत्या मताधिक्याने मिळवलेला हा विजय त्या पक्षासाठी अविस्मरणीय ठरावा.

Goa Assembly Election Result 2022
गोव्यात भाजपची हॅट्‌ट्रिक: काँग्रेसचे सत्तासंधान सलग तिसऱ्यांदा हुकले

यावेळच्या बहुतेक लढती अटीतटीच्या झाल्या. कारण बहुतेक ठिकाणी पंचरंगी सामने होते. तीस-पस्तीस हजार मतदारांचे मतदारसंघ आणि काँग्रेस, भाजप या नेहमीच्या यशस्वी कलाकारांबरोबर संसाधने आणि संघटन शक्तीचे दर्शन घडवत आलेले तृणमूल व आपसारखे नवखे कलावंत तसेच मगोप, गोवा फॉरवर्ड आणि आरजी असे स्थानिक रंगकर्मी यांच्या भाऊगर्दीमुळे एकूणच राजकीय रंगमंच अत्यंत गोंधळाचा बनला होता.

अमर्याद साधनसंपदा, केंद्रीय निरीक्षकांचे अव्याहत पाठबळ या जोरावर भाजपाने या अस्थैर्याच्या वातावरणावरही मांड बसवली. गेल्या १० वर्षात चार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता भोगणाऱ्या या पक्षासमोर आपली पत राखण्याचे आव्हान होते. काँग्रेससाठी ही अस्तित्वाची निवडणूक होती. गेल्या निवडणुकीत १७ आमदार निवडून आलेल्या या पक्षाला आपला नेता वेळेत निवडणे जमले नाही आणि नंतर झालेल्या वाताहतीत १५ आमदार गमवावे लागले. भाजपने घडवून आणलेल्या या पक्षांतराने पक्षाच्या संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा तेजोभग झाला. लुइझिन फालेरो यांच्यानंतर प्रतापसिंह राणेंनी निवृती पत्करली. त्यामुळे तिसरे माजी मुख्यमंत्री दिंगबर कामत यांच्यावर एकहाती लढत देण्याची वेळ आली.

भाजपच्या संघटन शक्तीने आपले कर्तव्य बजावले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मतप्रवाह असतानाही पक्षाने आपली ३३ टक्के मते अबाधित राखली आहेत. गेल्या निवडणुकीत तितकीच मते मिळाली, पण भाजपचे केवळ १३ उमेदवार विजयी झाले होते. अंतर्गत कलहामुळे गांजलेल्या या पक्षाचा हा विजय म्हणूनच नेत्रदीपक वाटतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांचे महत्वाकाक्षी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, कोविडकालीन अपयशी हाताळणी, नोकरभरतीतला कथित भ्रष्टाचार, अर्थव्यवस्थेला लागलेली घरघर आणि तिची व्याप्ती वाढवणारी खाणबंदी यांनी भाजपपुढे कठीण आव्हान उभे केले होते. यात भर पडली ती मनोहर पर्रीकर या दिग्गज नेत्याच्या गैरहजेरीची.

भाजपने आपली मतपेढी राखल्याचे हा निकाल सांगतो. नव्या चेहऱ्यांनिशी मतदारांना सामोरे गेलेल्या काँग्रेसला भाजपने मतदारसंघ सुक्ष्मस्तरीय नियोजनास निकामी केले. जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला जायचा पक्षाचा निर्धार कामी आला. घाऊक आयात करण्याची क्षमताही पक्षाच्या मदतीला आली.

भाजपने या निवडणुकात पक्षांतर केलेल्या १२ जणांना उमेदवारी दिली आणि जिंकण्याची क्षमता या निकषांवर ५ जणांची आयत्यावेळी आयात केली. ४० पैकी ३३ जागांवर गांभिर्यपूर्वक लढत देणाऱ्या भाजपचे १७ ठिकाणचे चेहरे हे अन्य पक्षातून आणले होते. यातील काँग्रेसमधून केलेली आयात पक्षाला लाभदायी ठरल्याचे दिसते. तिच्यामुळे भाजपकडे ६०,००० मते वळल्याचे आकडेवारी सांगते. प्रस्थापित विरोधी जनमताची धार त्यामुळे बोथट करणे भाजपला शक्य झाले व तो पक्ष अंतिम फेरीत अव्वल ठरला. भाजपच्या उमेदवारांत ३ नवे चेहरे होते आणि ते सर्व विजयी झाले. २०१२ साली निवडून आलेल्या, पण २०१७ सालच्या निवडणुकांत पराभूत झालेल्या ५ माजी आमदारांना त्यांची तिकीट दिली होती. यातले दयानंद मांद्रेकर वगळता इतर चौघे विजयी झाले. काँग्रेसमधून पक्षांतर करून आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि माजी विरोधी पक्षनेत्यांसह १२ जणांना भाजपची उमेदवारी मिळाली आणि त्यातले ५ जण पराभूत झाले. मात्र, त्यांनी आपली मतपेढी भाजपकडे वळवत पक्षाची टक्केवारी अभंग राखली.

Goa Assembly Election Result 2022
बदलत्या गोव्याचा निर्णायक कौल

‘नवी काँग्रेस’चे कथानक मतदाराला प्रभावित करू शकले नाही. विरोधी मतांचे ध्रृवीकरण करण्यात पक्ष अपयशी ठरला. काँग्रेसने मगोपशी संधान तर बांधले नाहीच, तृणमूलच्या युतीच्या विनंतीलाही अव्हेरले. गोवा फॉरवर्डशी युती केली ती बराच काळ टंगळमंगळ झाल्यानंतर शेवटच्या क्षणी झालेली युती फलदायी ठरली नाही. भाजप आणि आपल्यातच थेट लढत होईल हा अतिआत्मविश्‍वास काँग्रेसला नडला. गेल्या निवडणुकीत २३ टक्के मते मिळवणाऱ्या या पक्षाला ५ टक्क्यांचा तोटा झाला, तरी एकूण ६ जागा हातच्या गेल्या. भाजपाविरोधात संघटीत विरोध उभे करण्यातले अपयश हेच काँग्रेसच्या पराभवाचे प्रमुख कारण. भाजपाच्या पारड्यात पडलेल्या या कौलाला तरी गोमंतकीयांना गेल्या पांच वर्षांपेक्षा वेगळा अनुभव मिळावा अशी अपेक्षा.

(आयआयटी मुंबईतून वित्त विभागातून पीएचडी प्राप्त असून अर्थधोरण विषयाचे पोस्ट डॉक्टरल)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com