गोव्याच्या मुक्तिलढयात नेहरूंची भूमिका..!

बळाचा वापर करून गोव्याला मुक्त करायची हीच योग्य संधी होती पण..
गोव्याच्या मुक्तिलढयात नेहरूंची भूमिका..!
Goa Politics : Jawaharlal NehruDainik Gomantak

नेहरू झाले लक्ष्य

Goa Politics :गोव्यांत 15 ऑगस्ट 1955 रोजी निःशस्त्र सत्याग्रहींची हत्या झाली आणि तिचे हिंसक पडसाद भारतात उमटू लागले. देशभर हरताळांचे आयोजन करण्यात आले. ज्यानी गोव्याचे नाव सुद्धा कधी ऐकलेले नाही असे गावगुंड ही संधी साधून रस्त्यावर उतरून हिंसा करू लागले आणि ती थोपवताना आणखीन काही बळी पडले. मुंबई आणि कलकत्त्यात जमावाने पोर्तुगीज, ब्रिटीश व पाकिस्तानी वकालतींवर हल्ले केले. याची नोंद घेताना स्वीस पत्रकार एरीक स्त्रीफ म्हणाले की भारताच्या भूमीवर जे काही घडलेय ते नेहरूप्रणीत पंचशीलाचे अक्षम्य उल्लंघनच आहे. टिकेमुळे वरमलेल्या नेहरूंनी नुकसानभरपाईची तयारी दर्शवली.

Goa Politics : Jawaharlal Nehru
शेतकरीविरोधी कायदे संसदेमध्येही मागे घ्या: गोवा काँग्रेस

आंतरराष्ट्रीय मतभेदांचे शांततापूर्ण मार्गाने निराकारण करण्याऐववजी भारताने नव्या, अनावश्यक मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप करीत पोर्तुगालने भारतालाच घडल्या घटनेस जबाबदार धरले. खरे तर पोर्तुगाली सैनिकांनीच भारतीय सत्याग्रहींवर गोळ्या झाडून त्याना मारले होते. पण टिकेचे धनी झाले ते नेहरू. त्यांच्यावर सर्वच बाजूनी प्रहार होऊ लागले. वकालतींवर हल्ला झाला म्हणून पश्चिमी जगत क्षुब्ध झाले तर सत्याग्रहींना पाठिंबा देत नसल्यामुळे देशातून कडवट टीका होऊ लागली. त्यांतच मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई- ज्याना पोर्तुगीजांविषयी ममत्व होते- यानी सचिवालयाच्या दिशेने निघालेल्या नागरिकांच्या मोर्चावर लाठीमार आणि अश्रुधूर सोडण्याचे आदेश दिले.

बळाचा वापर करून गोव्याला मुक्त करायची हीच योग्य संधी होती. पण नेहरूंना हिंसेचा तिटकारा होता, शांततेच्या मार्गानेच त्याना हा प्रश्न सोडवायचा होता. आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकारण शांततेच्या माध्यमातून करणारा मुत्सद्दी अशी त्यांची जागतिक प्रतिमा बनली होती. अहिंसेच्या पुरस्कारासाठी त्यांना दोषी धरता येणार नाही. इंग्लंडमध्ये अध्ययन करताना त्याना शांततापूर्ण सहजीवनाची प्रेरणा मिळाली होती. हिंदु, बौद्ध आणि जैन धर्मासह गांधींचे तत्त्वज्ञानही शांततेचाच पुरस्कार करणारे होते.

Goa Politics : Jawaharlal Nehru
‘सरकार तुमच्या दारी’वर उधळपट्टी: आप

नेहरूंनी तात्काळ भारतीयांच्या गोव्यातील सत्याग्रहातल्या सहभागावर बंदी आणली. त्याचवेळी त्यानी पोर्तुगालकडील राजनैतीक संबंध तोडले व पोर्तुगालच्या मुंबई व कलकत्त्यातील मानद वकालती बंद करण्याच्या सूचना पोर्तुगालला दिल्या. भारताचे पणजीतले राजनैतिक अधिकारी पीआरएस मणी याना माघारी बोलावण्यात आले. आता भारताच्या गोव्यातील हितसंबंधांची जबाबदारी इजिप्त देशाने स्वीकारली तर पोर्तुगालचे भारतातील हितसंबंध ब्राझील हा देश पाहाणार होता. गोव्याशी जोडलेल्या सीमा नेहरूंनी बंद केल्या आणि भारत- गोवा दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. त्याआधी परमीट काढून दोन्ही भूभागांदरम्यान माणसे येजा करायची.

गोव्याचा मुक्तिलढा गोमंतकीयांनीच लढावा, असे आपल्याला वाटते असे नेहरू म्हणू लागले. त्यावर न्यू एज ह्या कम्युनिस्ट नियतकालिकाने टिपण्णी केली की जेव्हा काश्मीरवर हल्ला झाला तेव्हा काश्मिरींनीच त्याचा प्रतिकार करावा अशी भूमिका काही भारताने घेतली नव्हती! (नेहरू काश्मिरी पंडित घराण्यातले होते.)

आता क्रांतिकारी उर्मी उफाळून आल्या. 30 सप्टें. 1955 रोजी बेळगावात 'गोवा मुक्तिसेने'ची स्थापना झाली. सेनेचे सहा विभाग ऑगस्टो आल्वारीस, बाळकृष्ण भोसले, उर्सेलीन आल्मेदा, शिवाजी देसाई, जयसिंगराव राणे व माधवराव राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाले. सशस्त्र लढ्यात विश्वनाथ लवंदे यांचे 'आझाद गोमंतक दल' व त्या संघटनेपासून विभक्त झालेली प्रभाकर सिनारी यांची 'रांकौर पात्रियोतिका' योगदान देऊ लागली. (सिनारी पुढे आयपीएस अधिकारी झाले.) 'युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स' (फ्रान्सीस मास्कारेन्हास, वामन देसाई) 'गोवन पिपल्स पार्टी' ( जॉर्ज व्हाज आणि दिवाकर काकोडकर) व 'छोडो गोवा संघटना' (जनार्दन शिंक्रे) यादेखील शस्त्र मार्ग अनुसरू लागल्या.

प्रत्येकाची कार्यपद्धती स्वतंत्र होती पण त्यानी अनेक धाडसी कारवाया फत्ते केल्या. 1955 ते 1959 या चार वर्षांत वसाहतवाद्यांच्या दप्तरांत 179 हल्ले. घातपाताच्या 152 कारवाया आणि असंख्य अपयशी कारवायांची नोंद आढळते, ज्यांत 30 पोर्तुगीज व 73 गोमंतकीय सैनिक, किंवा पोलीस शिपायांचा मृत्यू झाला. 1954 ते 1956 दरम्यान वसाहत सरकारने 3000 हून अधिक गोमंतकीयांना तुरुंगात टाकलें.

19 सप्टेंबर 1965 रोजी पोलिसांनी पर्तगाळ- काणकोण येथील वैष्णवांच्या मठावर धाड घातली आणि 30 पुजारी व विद्यार्थ्याना ताब्यांत घेतले. जेरोनिमो बार्रेटो या पोलिसाची आदल्या दिवशी अर्धफोंड येथे आझाद गोमंतक दलाच्या माणसांनी हत्या केली होती आणि ताब्यात घेतलेल्या मठानुयायांनी त्याना मदत केल्याचा वहिम होता. त्याच दिवशी पुजारी परशुराम श्रीनिवास आचार्य व केशव सदाशीव टेंगसे यांचा अमानुष छळ करण्यात आला व त्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यांच्या कलेवरांना घाईगडबडींत, पोलीस बंदोबस्तांत अग्नी दिला गेला. यादरम्यान गोव्याच्या समस्येवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचे यत्नही चालूच होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com