गोव्याला भासते पर्रीकरांची उणीव!

आजही पर्रीकर असते तर?,गोवा राज्यात कोरोनाचे संकट थैमान घालत होते, तेव्हाही जनतेला पर्रीकरांची (Manohar Parrikar) ‘याद’ येत होती. पर्रीकर असते तर अशाप्रकारे कोरोनाचा (Covid 19) विस्फोट झाला नसता, असे अनेकजण त्यावेळी बोलत होते.
गोव्याला भासते पर्रीकरांची उणीव!
Manohar ParrikarDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

पर्रीकरांचा मोठा गुण म्हणजे त्यांचा जबर आत्मविश्वास. अति आत्मविश्वास हा कधी कधी घातक कारणीभूत ठरत असतो, असे म्हटले जाते. पण पर्रीकरांचा आत्मविश्वासच त्यांची कवच कुंडली ठरली. ‘मी सांगतो ते तू ऐक’ ही त्यांची वृत्ती काहींना त्यावेळी मुजोरी वाटत होती. पण हीच वृत्ती त्यांचा एक अलंकार बनली. यामुळेच भाजपच्या (BJP) आमदारांचे सोडा, विरोधी पक्षाचे आमदारसुध्दा त्यांना टरकून असायचे. त्यांच्यावर टीका करण्याची शामत त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांत नसायची.

परवा देशाचे माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे (Goa) माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांना जाहीर झालेला मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan Award) त्यांचे पुत्र उत्पल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते स्वीकारला. पर्रीकरांना जाऊन आता अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण तरीही आजसुध्दा पर्रीकरांची उणीव भासते आहे. गोवा राज्यात कोरोनाचे संकट थैमान घालत होते, तेव्हाही जनतेला पर्रीकरांची ‘याद’ येत होती. पर्रीकर असते तर अशाप्रकारे कोरोनाचा विस्फोट झाला नसता, असे अनेकजण त्यावेळी बोलत होते. पर्रीकरांवर असलेला लोकांचा विश्वासच यातून प्रतीत होतो.

Manohar Parrikar
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर

तसे पाहायला गेल्यास मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात पर्रीकरांत जी तडफ होती, ती नंतरच्या काळात कमी झाल्याचे दिसून आले होते. 2004 सालचेच उदाहरण घ्या, केंद्रात सत्ताबदल होऊन भाजप पदच्युत झाल्यामुळे गोव्यात ठरल्याप्रमाणे इफ्फी होणार नाही, असे वाटत होते. परिस्थितीही तशीच होती. पण पर्रीकरांनी जिवाचे रान करून व राज्यात इफ्फीला पूरक अशा साधनसुविधांचा अभाव असूनसुध्दा गोव्यात इफ्फी आणलाच. केवळ आणलाच नव्हे, तर दणक्यात आयोजित करूनही दाखवला. म्हणूनच पहिल्या इफ्फीच्या आठवणी अठरा वर्षानंतरसुध्दा आमच्यासारख्या चित्रपटनिर्मात्यांच्या मनावर मोरपिसासारखे फिरताना दिसतात. त्यानंतर 2005 साली पर्रीकरांना सत्ताउतार व्हावे लागले. 2012 पर्यंत कॉंग्रेसची कारकीर्द होती. पण तेव्हाही त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून आपली छाप सोडलीच. त्यावेळची विधानसभेतील त्यांची ‘भाषणे’ तुफान लोकप्रिय झाली होती. त्यामुळेच 2012 साली पर्रीकर हवेत, अशी हवा निर्माण झाली होती. खरे तर त्यावेळी भाजपची लाट नव्हती, तर पर्रीकरांची ‘लाट’ होती. आणि या लाटेवर स्वार होऊन अनेक हौशे-नवशे -गवशे विधानसभेत आमदार म्हणून पोहचले. अल्पसंख्याकांनीसुध्दा त्यावेळी पर्रीकरांकरिता भाजपला मते दिली होती. यामुळेच अपेक्षा नसतानासुध्दा भाजपला पूर्ण बहुमत मिळू शकले आणि पर्रीकर हे खऱ्या अर्थी राज्याचे अनभिषिक्त सम्राट बनले.

तरीदेखील नंतरच्या अडीच वर्षातील त्यांच्या कार्याचा आलेख बघितल्यास तो 2002 ते 2005 या अडीच वर्षाच्या त्यांच्या कार्याच्या तुलनेने बराच अंकुचित झालेला वाटतो. बरेच ‘युटर्न’ ही त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीत आढळून येतात. पण तरीही त्यांची लोकप्रियता अभेद्य राहिली. याचा प्रत्यय 2017 साली आला. तेव्हा निवडणुकीत भाजपची अक्षरशः दुर्दशा झाली होती. अवघ्या तेरा जागा भाजपच्या पदरात पडल्या होत्या. कॉँग्रेस सत्तेच्या सिंहासनाकडे कूच करणार असाच सर्वांचा होरा होता. अशा वेळी विधानसभेत आमदारसुध्दा नसताना पर्रीकरांनी आपल्या संरक्षणमंत्रिपदाचा त्याग करून राज्यातील भाजपची नौका किनाऱ्याला लावून दाखवली. खरे तर त्यावेळी ते मोठे आव्हान होते. विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकरसारख्या अति महत्त्वाकांक्षी नेत्यांना एका माळेत गुंफणे हे खायचे काम नव्हते. पण ते पर्रीकरांनी करून दाखविले. वास्तविक ती एक न पटणारी अशी तडजोड होती. जनमत कौलाविरुध्द केलेली ती कृती होती. पण पर्रीकरांना म्हणून ती पचली. एवढेच नव्हे तर पुढील अडीच वर्षे त्यांनी ही ‘तारेवरची कसरत’ यशस्वीपणे करून दाखविली. अगदी मरणासन्न अवस्थेत असतानासुध्दा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे विरोधी पक्षातील आमदारांचा पर्रीकरांवर असलेला विश्वास. या विश्वासापोटीच त्याचे काही ‘युटर्नही’ झाकले गेले. राज्यातील भाजपाचे तर ते सर्वेसर्वाच होते. पर्रीकर असताना केंद्रातील भाजप श्रेष्ठींना गोव्याच्या राजकारणात लक्ष घालण्यात पाळी कधीच आली नाही. पर्रीकरांच्या निर्णयांना ‘मम’ म्हणणे एवढेच काम केंद्रीय नेते - मग ते पंतप्रधान मोदी असो वा गृहमंत्री अमित शहा - करीत राहिले. याचे एक कारण म्हणजे गोव्यात भाजप रुजविण्यात व नंतर भाजपला सत्तास्थानी नेण्यात पर्रीकरांचा सिंहाचा वाटा होता हे केंद्रीय नेते जाणून होते. म्हणूनच तर गोव्यात भाजप त्या काळी पर्रीकरांचाच ‘मुखवटा’ घेऊनच वावरत होता.

Manohar Parrikar
गोव्याचे शिल्पकार मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळाचा सरकारला विसर?

पर्रीकरांचा मोठा गुण म्हणजे त्यांचा जबर आत्मविश्वास. अति आत्मविश्वास हा कधी कधी घातला कारणीभूत ठरत असतो, असे म्हटले जाते. पण पर्रीकरांचा आत्मविश्वासच त्यांची कवच कुंडली ठरली. ‘मी सांगतो ते तू ऐक’ ही त्यांची वृत्ती काहींना त्यावेळी मुजोरी वाटत होती. पण हीच वृत्ती त्यांचा एक अलंकार बनली. यामुळेच भाजपच्या आमदारांचे सोडा, विरोधी पक्षाचे आमदार सुध्दा त्यांना टरकून असायचे. त्यांच्यावर टीका करण्याची शामत त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारात नसायची. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतावर टीका करणारे, हल्ला करणारे त्यावेळी आपल्या तलवारी म्यान करून बसल्यासारखे वाटत होते. पर्रीकरांनी यशाबरोबर अपयशाचे कडू घोटही पचवले. 2002 साली ऐन निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन उपमुख्यमंत्री रवी नाईक यांनी भाजप सोडून कॉंग्रेसीत उडी मारणे, हा पर्रीकरांना बसलेला एक जबर धक्का होता. त्याचप्रमाणे 2005 साली अनपेक्षितपणे काही आमदारांच्या पक्षत्यागामुळे सत्ता गमावावी लागणे, हाही घाव त्यांच्या जिव्हारी लागला होता. खासकरून त्यावेळी भाजपचे मोठे नेते व पर्रीकरांचा उजवा हात असे समजले जाणारे दिगंबर कामत यांनी मोक्याच्या क्षणी आमदारकीचा त्याग करून कॉंग्रेसला जवळ केल्यामुळे पर्रीकर बरेच हवालदिलही झाले होते. त्याचबरोबर 2007 साली जंग जंग पछाडूनसुध्दा भाजपाला फक्त चौदा जागाच मिळाल्यामुळे ‘आम्ही लोकांना का नको हेच कळत नाही’ असे नैराश्‍यपूर्ण उद्‍गार काढणारे पर्रीकर त्यावेळी बरेच भावनाविवशही झाले होते. पण त्यांच्या जबरदस्त आत्मविश्वासाच्या प्रकाशाने या संकटाच्या अंधारात वाट दाखविण्याचे काम केले. आणि त्या वाटेवरूनच सत्तास्थानी पोहोचून ते शेवटपर्यंत तेथे कायम राहिले.

Manohar Parrikar
'मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांनी पक्षाचे भरीव काम करून दाखवावे'

यामुळेच पर्रीकरांच्या गमनानंतरच्या अडीच वर्षाचा आढावा घेतल्यास पर्रीकरांची कमी ठायी ठायी भासते आहे. भाजपला तर ती प्रकर्षाने जाणवते आहे. मायकल लोबोसारख्या आपल्याच नेत्यावर शरसंधान करणाऱ्या आमदाराचे ‘सोनाराने टोचले कान’ या उक्तीप्रमाणे कान टोचण्याचे धैर्य फक्त पर्रीकरांकडेच होते. आज अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांविरोधातच आवाज उठविताना दिसत आहेत. यामुळेच विश्वजित राणे, मायकल लोबो, माविन गुदिन्हो हे मंत्री अस्तनीतल्या निखाऱ्यांसारखे’ वाटायला लागले आहेत. पर्रीकरांची जशी प्रशासनावर व केंद्रात पकड होती, तशी पकड अजून तरी डॉ. प्रमोद सावंत यांना बसवता आलेली नाही. ती लवकर बसणेही शक्य नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे पर्रीकर म्हणजे गोव्याचा भाजप असे जे समीकरण दृढ झालेले होते. ते डॉ. सावंतांच्या बाबतीत अजूनतरी तयार झालेले नाही. त्यामुळे त्यांना सरकार चालविताना बऱ्याच तडजोडी कराव्या लागत आहेत. पर्रीकरांच्या बाबतीत असे कधीच झाले नाही. त्यांनी 2017 साली सरकार बनविताना तडजोड केली असली, तरी आपल्या मंत्र्यांना आमदारांना सांभाळताना तशी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही. त्यांचा निर्णय हाच अखेरचा शब्द असायचा. म्हणूनच पर्रीकर हे जनतेच्या तसेच भाजप कार्यकर्त्याच्या दृष्टीने ‘दीपस्तंभ’ सारखे होते आता निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपजवळ असा ‘दीपस्तंभ’ नाही. त्यामुळे पक्षाशी अवस्था बिकट झाल्याचे दिसत आहे. पक्षात दुही पसरल्याचे स्पष्टपणे प्रतीत होत आहे. या हेलकावणाऱ्या नौकेला तडीपार लावू शकणारा असा स्थानिक नेताच दिसेनासा झाला आहे. याचकरिता केंद्रीय नेत्यांना इथे येऊन परिस्थितीचे अवलोकन करावे लागत आहे. यामुळेच जनतेबरोबर भाजप कार्यकर्तेही आज पर्रीकर वा ‘भाई’ असायला हवे होते, असे बोलताना आढळतात. आता यात पर्रीकरांची जीत आहे का? विद्यमान सरकारची हार, याचा कौल जनतेनेच द्यायला हवा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com