कुरघोडी करून ध्येय साध्य करणे कितपत योग्य?

तुमचं एक मत किती मौल्यवान आहे, हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्याची जाणीव मते मागणाऱ्या नेत्यांना आहे.
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak

तुमचं एक मत किती मौल्यवान आहे, हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्याची जाणीव मते मागणाऱ्या नेत्यांना आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक मताचा विचार करीत ते स्वप्न रंगवत असतात.

तुम्हीही आपला नेता कोण असेल हा विचार करूनच मतदान करता. मात्र, निवडणुकीनंतर तुमचा नेता कोणत्या पक्षात असेल हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे तुमच्या मताची किंमत या नेत्याने केली का? तुमचा म्हणजे मतदाराचा विचार त्याने केला का? आपला स्वार्थ साधण्यासाठी तो पक्षांतर करतो आणि वर्षभर तुम्हाला आश्वासनांवर जगवतो, हे कितपत योग्य आहे.(Goa Voters should be aware in assembly election)

Goa Assembly Election 2022
'आगामी गोवा विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आयोगासमोर आव्हान'

गोव्यात आता एक दीड महिन्यांत निवडणुका (Goa Assembly Election) होत आहेत. आपल्याला तिकीट मिळावे म्हणून अनेक जण कोलांटउड्या मारत आहेत. हेच राजकारणी कधी काळी इतर पक्षांवर आरोप करतात, नंतर तेच त्याच पक्षाची चिन्हे घेऊन गावोगावी फिरतात. त्यामुळे अशा ‘घरबदूलंना’ धडा शिकवायचा असेल तर तो मतदारच शिकवू शकतो. गोव्यातील (Goa) विधानसभा निवडणूक नेत्यांपेक्षा मतदारांनीच अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे. आपल्या मताची किंमत जाणल्यास नेत्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवू शकता. परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे, असे आपण वांरवार म्हणतो पण ते परिवर्तन कृतीत उतरत नाही. त्यासाठी एकसंधपणे बदलाच्या निर्णयाची गरज असते. हा बदल घडवण्यासाठी प्रत्येक मतदारांना जागृत व्हायला हवे. सध्या प्रत्येक जण मी गोव्यासाठी काय केले आणि काय करू शकतो, हे दाखवत सुटला आहे. परंतु, वेळ आली की, हेच पळून जातात, हा अनुभव आपल्यासारख्यांच्या पाठीशी असेलच. गोव्यात तृणमूल (TMC) पक्षाबरोबरच इतरही राष्ट्रीय पक्षांनी पाळेमुळे घट्ट करण्याचे ठरविले आहे. कारण गोवा हे छोटे राज्य आहे. त्यामुळे गोमंतकीयांना योजनांची खैरात वाटल्यास आपणही गोमंतकीयांची मने जिंकू शकतो आणि गोव्यातही सत्ता मिळवणे शक्य आहे, अशा स्वप्नात ‘दीदी’ अन्‌ केजरीवाल आहेत. एखाद्या राजकारण्याने अशी स्वप्ने पाहणे गैर नाही मात्र जनतेच्या भावनांशी खेळून, कुरघोडी करून ध्येय साध्य करणे कितपत योग्य? याचा विचारही व्हायला हवा.

Goa Assembly Election 2022
पक्षाला विश्वासात न घेता चोडणकर घेतायेत निर्णय, माजी सदस्यांचा आरोप

सध्या राजकीय वातावरणात संभ्रमाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत मग मतदान करावे तरी कुणाला? या निमित्ताने मतदारांना व विशेषत: युवा पिढीला आवाहन करावेसे वाटते की, मतदान करताना जरा आपल्या भविष्याचा विचार करा. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षं उलटले तरीही जर तुमच्या गावात वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांच्या आश्वासनावरच निवडणुका लढवल्या जात असतील तर हे लोकशाहीत मतदार म्हणून आपलेच अपयश आहे. वर्षानुवर्षे गावची सत्ता उपभोगून जर गावात साध्या पायाभूत सुविधा देऊ न शकणाऱ्या लोकांना आपण मतदानच का करतो? केवळ पाचशे-हजारच्या नोटेपायी व दारू व मटणाच्या पार्ट्यांसाठी आपले बहुमूल्य मत गहाण टाकतो? हीच का आपली लोकशाही? अज्ञानी, असुशिक्षित लोकांचे सोडा परंतु आपण शिकलेले लोक स्वत:ला बुद्धिजीवी समजतो आणि मतदान करताना मात्र बुद्धी गहाण ठेवतो. याला काय म्हणावे? युवा पिढी तर कुठे भरकटत चालली समजत नाही. गावातील अनेक तरुण आपले करियर सोडून ‘पात्रांव पात्रांव’ करीत त्यांचा उदो उदो करताना दिसत आहेत.

युवकांनो! जरा आपल्या गावच्या विकासाचा विचार करा. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, परंतु जलसंधारणाची कामे होत नाहीत. आलेल्या योजना जिरवल्या जातात. सगळ्या योजना कागदावरच. गरीब व गरजू लोकांना वेळेवर मदत मिळत नाही. निवडून दिलेल्या पुढाऱ्यांनी पाच वर्षांत काय दिवे लावले याचा आम्ही जाब विचारत नाही. आम्ही आमचे अमूल्य मत विकतो. मग कसे सुधारेल आपले गाव, तालुका अन् संपूर्ण राज्य?

सचिन कोरडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com