बाबू आणि भाजपची ‘थिंक टँक’; खरी कुजबूज!

पेडण्‍यातून बाजूला काढून बाबूंना मडगावात पाठवण्‍यामागे भाजपची ‘थिंक टँक’ आहे. कामत आणि भाजपचे आतून ‘फिक्‍सिंग’ झाल्‍याचीही चर्चा आहे. त्‍यामुळे बाबूंचा ‘गेम’ झाल्‍यातच जमा आहे
बाबू आणि भाजपची ‘थिंक टँक’; खरी कुजबूज!
Goa Assembly 2022 Dainik Gomantak

Goa Assembly 2022

काँग्रेसतर्फे पणजीत ‘त्रिदेव’

पणजी मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) सुरेंद्र फुर्तादो व माजी महापौर उदय मडकईकर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असताना कुंकळ्ळीचे एल्विस गोम्स यांचे घोडे पुढे दामटण्यात येत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या फुर्तादो व मडकईकर यांचा या मतदारसंघात सुरू केलेला प्रचाराचा धडाका मंदावला आहे. काँग्रेस या मतदासंघात कोणत्या उमेदवाराचे नाव घोषित करते याकडे फुर्तादो व मडकईकर यांचे लक्ष आहे. या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास चालेल. मात्र, एल्विस गोम्सला त्यांचा विरोध आहे. या दोघांनी इतर पक्षाकडे संपर्क सुरू केला आहे. एल्विस गोम्स यांना कुंकळ्ळीतून उमेदवारी न दिल्याने त्यांनी पणजीतून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे. फुर्तादो व मडकईकर यांच्यापेक्षा त्यांचे वजन काँग्रेसमध्ये अधिक असल्याने ते उमेदवारी मिळण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ∙∙∙

त्यांना प्रस्थापित केले कुणी?

बाबूश मोन्सरात (MLA Babush Monsera) यांच्या विरोधात पणजी मतदारसंघात शड्डू ठोकू पाहणारे मनोहर पर्रीकर पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पर्रीकरांच्या मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला भाजपकडून उमेदवारी कशी असा नैतिक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न ऐकून पणजीकर मतदारांची प्रतिक्रिया काय झाली आहे ते माहीत नाही. मात्र, राहिलेल्या इतर मतदारसंघातील मतदार पोट धरून खदाखदा हसत आहेत. या बाबूशला मंत्रिपद देऊन राजकारणात प्रस्थापित कुणी केले हो? उत्पलला कुणीतरी हा प्रश्न विचारला पाहिजे बुवा! ∙∙∙

काब्रालचे नेमके टर्म किती?

कुडचडे मतदारसंघात आतापर्यंत एकाही आमदाराने दोन टर्मच्यावर कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. त्यामुळे मागचे दोन टर्म पूर्ण केलेल्या वीजमंत्री नीलेश काब्राल यांचा यावेळी पराभव नक्की असे मांडे विरोधक खाऊ लागले आहेत. मात्र, काब्राल यांचे समर्थक वेगळाच हिशेब मांडत आहेत. ते म्हणतात काब्राल यांनी दोन टर्म पूर्ण करून त्यांची अडीजावी टर्म चालू आहे. हे कसे? यावर काब्राल समर्थकांचा युक्तिवाद असा, श्याम सातार्डेकर आमदार असताना अर्ध्यापेक्षा जास्त टर्म आमदार म्हणून काब्राल यांनीच तर काम पाहिले. त्यावेळी श्याम केवळ नामधारी आमदार होते ना! ∙∙∙ (gossip about bjp in Goa)

Goa Assembly 2022
'या' दोन ख्रिश्चनबहुल मतदारसंघामधून भाजपची माघार!

म्हापशातील काँग्रेसजनांत लोबोंमुळे नवचैतन्य!

गेल्या काही वर्षांपासून म्हापसा शहरात काँग्रेस पक्षाच्या गोटात तशी मरगळच आलेली होती. याचे कारण म्हणजे पक्षशिस्तीबाबत स्वयंघोषित नेत्यांवर कुणाचाही वचक नव्हता. स्वत:चे राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रत्येक राजकीय नेता वेगळी चूल मांडून स्वत:च्या गोतावळ्यासह कार्यरत राहून विजयी होण्याच्या दृष्टीने आपणच कसा मातब्बर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत होता. अलीकडेच सुधीर कांदोळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने, उमेदवारीवर डोळा ठेवून असलेल्या विजय भिके, गुरुदास नाटेकर इत्यादी प्रामाणिक(?) कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या प्रचारातून अंगच काढून घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते. असे असले तरी कांदोळकर यांच्या प्रचारात मायकल लोबो सक्रियपणे सहभागी होत असल्याने फळाची कोणतीही अपेक्षा न बाळगता दीर्घकाल स्वपक्षाशी निष्ठा ठेवून असलेल्या म्हापशातील प्रामाणिक काँग्रेसजनांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे, त्यांच्यातील मरगळही दूर झालेली आहे, एवढे मात्र नक्की. ∙∙∙

बाबू आणि भाजपची ‘थिंक टँक’

मडगाव मतदारसंघातून बाबू आजगावकर यांचे नाव भाजपने (BJP) जवळजवळ जाहीर करूनच टाकले आहे. आता दिगंबर कामत यांच्‍यासमोर त्‍यांचा निभाव किती लागणार, हे सर्वांनाच ज्ञात आहे. पेडण्‍यातून बाजूला काढून बाबूंना मडगावात पाठवण्‍यामागे भाजपची ‘थिंक टँक’ आहे. कामत आणि भाजपचे आतून ‘फिक्‍सिंग’ झाल्‍याचीही चर्चा आहे. त्‍यामुळे बाबूंचा ‘गेम’ झाल्‍यातच जमा आहे आणि बाबूंनाही कल्‍पना आली आहे की, निवडणुकीनंतर आपल्‍याला घरीच बसावे लागणार आहे. तरीसुद्धा ‘तू मारल्‍यासारखे कर, मी रडल्‍यासारखे करतो’ असाच काहीसा प्रकार सुरू आहे. काय मिळेल त्‍यावर हात मारून घ्‍यायचा तेवढे बाकी आहे. ∙∙∙

तिसऱ्या जिल्ह्याचे पिल्लू

फोंड्याचे पात्रांव गणल्या जाणाऱ्या रवीबाब यांनी तिसऱ्या जिल्ह्याचे पिल्लू सोडून निवडणुकीच्या दिवसात धमाल उडवून तर दिली आहेच, शिवाय दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव उचलून धरल्याचे सांगून टाकले आहे. नव्या जिल्ह्यामुळे प्रशासन लोकांच्या दारांत पोचो वा न पोचो पण नोकरभरतीचा मार्ग मोकळा होणार खरा, त्यासाठीच तर हा सारा खटाटोप नसावा ना?∙∙∙

कळते पण वळत नाही

काणकोणात भाजप कार्यकर्त्यांत उमेदवारी प्रश्नावरून दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आलेली एकही संधी सोडत नाहीत याचे प्रत्यंतर आज बुथ सक्रिय करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत आले. त्यापैकी काहींनी तुम्ही का भांडता शेवटी नेते एकच होणार आहेत कार्यकर्त्यांनी भांडून पर्दाफाश का करायचा असा पोक्त विचार व्यक्त केला. मात्र, भांडणे चालूच राहिली. म्हणतात ना कळते पण वळत नाही याची प्रचिती आज आली. ∙∙∙

Goa Assembly 2022
TMC: गोव्यात भाजपसमोर विरोधकांची मोट!

कार्यकर्त्यांची मनधरणी

फोंड्यात सध्या कार्यकर्त्यांच्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारणे सुरूच आहे. काल मगो पक्षात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यापूर्वी मगोचे काँग्रेसमध्ये असे हे सत्र सुरूच आहे. आता हे कार्यकर्ते कुणाशी निष्ठा ठेवतात ते मतदानावेळी स्पष्ट होईलच, पण कार्यकर्त्यांच्या या अंदर बाहर प्रकारामुळे सध्या मतदार गोंधळून गेले आहेत. ही निवडणूक भाजपला बरीच जड जाणार आहे. कारण नोकऱ्या आणि इतर बाबतीत कार्यकर्त्यांतच खदखद आहे. कार्यकर्त्यांमधील हा असंतोष मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आता गंभीर बनले आहेत. त्यामुळेच नाराज कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी त्यांची मनधरणी सुरू आहे. कार्यकर्त्यांना तुम्ही समजवाल हो, पण मतदारांचे काय..? त्यांना कसे समजावणार! ∙∙∙

मंत्री फिलिप यांना मुहूर्त सापडला!

झाकली मूठ सव्वालाखाची या म्हणीचा खरा अर्थ मंत्री फिलिप नेरी यांना माहीत असायला हवा. जलस्रोतमंत्री फिलिप नेरी रॉड्रीगीस निवडणुकीत उतरणार का? फिलिपबाब वेळ्ळी मतदारसंघात कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरणार? फिलिप तृणमूलची दोन पाने स्वीकारून नवी सकाळ आणणार की काँग्रेसचा हात पुन्हा हातात घेणार? फिलिप बाब अपक्ष म्हणून रिगणात उतरणार की राष्ट्रवादीचे घड्याळ याची वाट फिलिप विरोधक व वेळ्ळीची जनता पाहत आहे. मात्र, फिलिप कोणतेही काम देवाच्या आशीर्वादाशिवाय व योग्य मुहूर्त असल्याशिवाय हाती घेत नसून सोमवारच्या शुभ मुहूर्तावर म्हणे फिलिपजी आपली राजकीय वाटचाल जाहीर करणार आहेत. ∙∙∙

मांद्रेत भाजपला झटका

मांद्रे मतदारसंघात भाजपला जोरदार झटका बसल्याचे दिसून आले. गोवा फलोत्पादन महामंडळाचे संचालक तथा युवा मोर्चाचे सरचिटणीस, पालयेचे पंच सागर तिळवे यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. वास्तविक महिन्यात निवडणूक व वैयक्तिक कारण वरवर साधं वाटत नाही. तशी परिस्थिती का उद्‍भवली हे कोडे आहे. परंतु थेट मगो - तृणमूल पक्षात उडी ही मोठी बाब निश्चित आहे. त्यांच्यावर अन्याय झाला वा डावलले गेले हा भाग वेगळा. मात्र, दुसऱ्याच दिवशी अन्य पक्षातील प्रवेश खूप काही सांगून जातो. एवढे दिवस भाजपचे कार्य व आता परिस्थिती बदलली. शेवटी लोकशाहीत स्वातंत्र्य असून सागर यांनी भाजपच्या सागरात न राहता, बंगालच्या महासागराशी जुळवून घेतले. पाहूया पुढे काय आघाडी मिळते ते. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com