...तर गोमंतकीयांना गाढवाचे जिणे जगावे लागेल

कॉंग्रेसच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षाने काही नेत्यांच्या सोबतीने एका तारांकित हॉटेलांत जाऊन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्या पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
it will have to prove that Gomantakiy voters are not for sale in upcoming Goa Assembly elections
it will have to prove that Gomantakiy voters are not for sale in upcoming Goa Assembly elections Dainik Gomantak

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कॉंग्रेसच्या (Congress) या कार्यकारी प्रदेशाध्यक्षाने काही नेत्यांच्या सोबतीने एका तारांकित हॉटेलांत जाऊन भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि त्या पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची भेट घेतली. तीही दिवसा ढवळ्या नव्हे तर चक्क मध्यरात्री. हॉटेलमधून बाहेर पडताना त्याना काही पत्रकारानी हटकले तर या महाशयांनी काहीही प्रतिसाद न देता तेथून काढता पाय घेतला.

रेजिनाल्ड यानी अपरात्री घेतलेली भाजपा नेत्यांची भेट दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांतून गाजली. राज्यांत काही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दर्शवणारी ती भेट होती. पण रेजिनाल्डच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सारवासारव करीत त्यांच्या मदतीला धावले. निवडणुकीचे नियोजन करणाऱ्या एका 'स्ट्रेटेजिस्ट'ला भेटण्यासाठी रेजिनाल्ड त्या हॉटेलांत गेले होते आणि त्याना आपणच पाठवले होते, अशी सफाई चोडणकरांनी पेश केली. आम्ही प्रत्येक हॉटेलांत भाजपा नेते आहेत का याची तपासणी करून तेथे जायचे की काय, असा साळसूद उलटप्रश्न पत्रकाराना करायलाही चोडणकर विसरले नाहीत. नंतर रेजिनाल्ड यानी ही 'स्ट्रेटेजिस्ट' भेट आपल्या परीने रंगवली व भाजपा नेत्यांचे हॉटेलांत दर्शन झाल्यामुळे आपण आल्या पावली परतलो असे सांगत आपल्या कॉंग्रेसनिष्ठेची ग्वाही दिली. मात्र रेजिनाल्ड यांची कॉंग्रेसनिष्ठा गेली अडीच- तीन वर्षे संशयाच्या धुक्यातून जाते आहे!

गेले काही महिने त्यानी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी घसट वाढवली आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसालादेखील साखळी मतदारसंघात जाऊन आले आणि त्यांच्या वाढदिवसाला डॉ. सावंत यानी उपस्थिती लावली होती. सावंत यांच्या सहकार्यामुळे रेजिनाल्ड यांच्या मतदारसंघातली बरीच कामे मार्गी लागली आहेत. सावंत यांच्याशी सूर जुळण्याआधी रेजिनाल्ड आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विश्वासातले म्हणून ओळखले जायचे. दोनेक महिन्यांपूर्वी ते आम आदमी पक्षात जायची तयारी करत होते आणि काही कळीच्या मुद्द्यावर अडले नसते तर एव्हाना त्यानी झाडू हातातही घेतला असता! रेजिनाल्ड यांच्या या अस्थिर राजकारणाचा दोष केवळ त्यांनाच देता येणार नाही. त्यांचा कॉंग्रेस पक्ष त्याना सद्यस्थितीत उमेदवारी वगळतां काहीच देऊ शकणार नाही. निवडणूक ही आजकाल कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असते. ती गुंतवणूक पदरमोडीतून जमत नसेल तर तशी दमदार व्यक्ती पाठीशी हवी. गोव्यांत असा कुणी कॉंग्रेसमन नाही, अशीही स्थिती नाही. मी किमान एका बड्या नेत्याकडे बोट दाखवू शकेन की ज्याने खाणमालाच्या निर्यातीतल्या सावळागोंधळाचा लाभ उठवत किमान पंचवीस हजार कोटींची माया जमवली आहे. मात्र हा नेता रेजिनाल्ड याना मदत करणार नाही, कारण रेजिनाल्ड यांचे राजकारण त्याच्या पचनी पडणारे नाही. उलट कळीविणे रेजिनाल्डचा काटा निघत असेल तर त्याला आनंदच वाटेल. कॉंग्रेसमध्ये अशा प्रकारचे अनेक भूमिगत सुरुंग पेरलेले आहेत, त्यामुळे रेजिनाल्ड यांच्यासारख्या लक्षवेधी अशी राजकीय पोच नसलेल्या राजकारण्याने दाणावैरण शोधत इतस्ततः भरकटणे स्वाभाविक आहे आणि त्यांचे भाजपा नेत्यांची भेट घेणेही समजण्यासारखे आहे.

भाजपाला ख्रिस्तीबहुल कुडतरीत तूर्तास तरी विजयाची आशा नाही. पण मतदारसंघ फेररचनेत अशी काही हिंदुबहुल पॉकेट्स कुडतरीत समाविष्ट झालेली आहेत, जेथे एकगठ्ठा मतदान झाले तर निकालाचे चित्र पालटू शकते. भाजपाने ही मतपेढी विचारपूर्वक विकसित केलेली आहे आणि तिच्या आधारे रेजिनाल्डना कॉंग्रेसपासून विलग करून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची प्रेरणा दिली जाऊ शकते. रेजिनाल्ड याना सतावत असलेल्या नगदनारायणाच्या समस्येचेही उत्तर भाजपाकडे आहे. एरवीही रेजिनाल्ड- फडणवीस भेटीविषयीची सारवासारव कुणालाच पटणारी नाही. भाजपाचे महत्त्वाचे नेते कोणत्या हॉटेलांत उतरले आहेत याची माहिती जर निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाना नसेल तर त्यानी राजकारण सोडणेच इश्ट. हॉटेलमध्ये भाजपा नेत्याना पाहून आपण माघारी फिरलो, हे रेजिनाल्ड यांचे स्पष्टीकरण तर करमणूक करणारे. मध्यरात्रीच्या सुमारास रेजिनाल्डना 'दिसलेले' भाजपा नेते हॉटेलच्या लॉबीत बसून होते की बागेत भरल्या पोटी ढेकर देत फेरफटका मारत होते? ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा यत्न कधी कधी अंगलट येतो तो असा!

it will have to prove that Gomantakiy voters are not for sale in upcoming Goa Assembly elections
'गोमंतकीयांच्या स्वाभिमानासाठी, ‘आरजी’चा पुढाकार'

रोहन खंवटे यांचे राजकारण थोडेसे दबावतंत्राला जवळ करणारे आहे. त्याना आपल्या बंधूना सांताक्रुझ मतदारसंघात उभे करायचे आहे. ह्या मतदारसंघाला पैशांची चटक लागल्याचा समज किंवा गैरसमज सर्वत्र पसरलाय, (बाबुश मोन्सेरात विरुद्ध दिनार तारकर लढत आठवा.) रोहन खंवटेंची हात सढळ सोडण्याची तयारी आहे. त्याचे भय दाखवून कॉंग्रेसला आणि झालेच तर भाजपाला आपल्या अटी मान्य करायला लावायचे, या इराद्याने ते पावले टाकताहेत.

या दरम्यान आणखीन एक घटना घडली, ट्रोजन डिमेलो या प्रवक्त्याला कॉंग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. ट्रोजनांची कॉंग्रेसमधून गच्छंती होण्याची ही कितवी वेळ हे त्यानाही सांगता येणार नाही आणि पुढे कधीतरी त्याना पुन्हा पक्षांत घेतले जाणार नाही अशी हमी गिरीश चोडणकर धरून कोणत्याच कॉंग्रेस नेत्याला देता येणार नाही. ट्रोजनांचा तोंडाळपणा चोडणकरांवर उलटला हे, त्यांच्या ताज्या गच्छंतीमागचे कारण. त्यानी चोडणकरांवर भडास काढली, चोडणकरांनी वाद मिटवण्यासाठी सारवासारव करून ट्रोजन याना सांभाळून घेण्याचा यत्न केला. पण ट्रोजन यानी पुन्हा शिव्याशाप दिल्यानंतर कारवाई करणे क्रमप्राप्त बनले. भविष्यांत कधीतरी ट्रोजनांचा वाल्याचा वाल्मिकी होईलच. कॉंग्रेसला अशा प्रकारची रक्तपिती बांडगुळे अंगावर घेण्याची सवय आहे. सन्याशाश्रमांत जाऊन निरवानिरवीची तयारी करणाऱ्या फ्रान्सिस सार्दिन याना नाही का त्या पक्षाने लोकसभेची तिकीट देत मुख्य प्रवाहात आणले! आज तेच सार्दिन कॉंग्रेसला सोडून जा असे खुले आवाहन कार्यकर्त्यांना करतात आणि त्यांच्या खास विश्वासातली माणसे पक्षत्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये जातात. कारण स्पष्ट आहे, सार्दिन याना आपली 'गेम' करायची आहे, आणि त्यासाठी ही कदाचित शेवटची संधी असेल. राज्यसभेच्या खासदारपदाची बक्षिसी मिळालेले लुइझिन फालेरो यांचेही तेच. भाजपाने आणि मनोहर पर्रीकरांनी जेरीस आणलेल्या या माणसाचे राजकारण जिवंत राहिले ते गांधी घराण्यामुळे. सोनिया- राहुल यांची अनुकंपा नसती तर लुईझिन आज विस्मृतीत ढकलले गेले असते. कॉंग्रेसमधले आपले राजकारण संपल्याचे दिसू लागताच त्यानी कोणताही विचार न करता गांधीकृपा विसरून तृणमूलचा पर्याय निवडला. आता पक्षांत राहिलेत एक दिगंबर कामत आणि दुसरे गिरीश चोडणकर. त्यात चोडणकरांना विजयाची खात्री देणारा मतदारसंघच नाही. पण त्यांचे स्वतःचे असे काही राजकीय फंडे आहेत आणि राहुल गांधींच्या वळचणीला राहून ते हे फंडे पक्षावर लादताहेत. राहुल गांधीविषयी तर बोलायलाच नको, त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे क्षणिक विरंगुळा ठरतो आहे! गिरीश यांना वैचारिक कुमक पुरवणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे दोन कथित विचारवंत. दोघांचेही दरबारी राजकारण, प्रत्यक्ष मतदारांत वावरण्याचा अनुभव शून्य!

कॉंग्रेस नामक विस्कळित पक्षाच्या निवडणूकपूर्व तयारीची गोळाबेरीज ही अशी आहे! कॉंग्रेसमधून माणसे फुटून जावीत ह्या दिशेने भाजपाचे राजकारण रेटले जात आहे. सावंत सरकारच्या कार्यकुशलतेच्या बळावर आपण पुन्हा सत्तेत येऊ, याची खात्री भाजपाच्या नेत्याना आणि आमदारानाही नाही. लोकांची कामे केली की सत्ता मिळते, असे भाजपा नेत्याना का वाटू नये? मनोहर पर्रीकरांच्या सत्तारोहणास कॉंग्रेसमधल्या बेदिलीने खतपाणी पुरवले. पर्रीकरांचे राजकारण विरोधकांत साप सोडून त्यांची दाणादाण उडवणारे होते. त्यांचे वारसदार आजही तोच कित्ता गिरवू पाहात आहेत. भाजपाची सदस्यसंख्या कित्येक लाख असल्याचे सांगतात, तरीही जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. त्यामुळेच 'रेजिनाल्ड' शोधावे लागतात!

अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्याही आता विरत चालल्या आहेत. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे स्वतःचे असे फंडे आहेत, निवडणुकांवर आपली मोहर उमटवणारच ह्या जिद्दीने झपाटलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षाचे उदाहरण घेऊ. त्यानी उमेदवार जाहीर करण्यातही आघाडी घेतली आहे. 'पोगो बील' हा निव्वळ प्रादेशिकतेला वाहिलेला एकमेव कार्यक्रम पक्षासमोर आहे. स्थानिकांतला रोजगाराचा अभाव ह्या एकमेव मुद्द्यावर निवडणूक हाकण्याची ही तयारी अंगलट येण्याची शक्यताच अधिक. गोमंतकीयाना कोणते काम करायला आवडते आणि त्या प्रकारच्या रोजगारांतला गोमंतकीयांचा टक्का काय याचा अभ्यास पक्षाकडे नाही. कष्टाची कामे करण्यासाठी गोमंतकीयाना लागणाऱ्या मजुरांना भय दाखवून स्थानिकांची मते मिळतील हा भ्रम मात्र आहे. ज्या मतदाराला ते लक्ष्य करताहेत, त्यांतल्या कितींचे लक्ष आखातातील नोकऱ्यांकडे आहे, याचीही चाचपणी त्यानी करायला हवी.

आम आदमी पक्षाकडून असलेल्या अपेक्षाना मूठमाती द्यायला एकट्या दयानंद नार्वेकरांचा प्रवेश फार झाला. त्यावर फोडणी पडली ती भंडारी समाजाचा मुख्यमंत्री देण्याच्या घोषणेने. मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आणि अनुभव असलेल्या आपल्या चारच भंडारी नेत्यांची नावे पक्षाने सांगावीत! 'आप'ने ही विचित्र घोषणा केल्यानंतर मी माझे मित्र उल्हास नाईक याना फोन लावला आणि विचारलं की गोव्याला सक्षम नेतृत्व देऊ शकतील असे किती भंडारी राजकारणी आज मुख्य प्रवाहांत आहेत? उल्हास नाईक यांचा धांदोळा चेष्टेच्या स्वरूपात रवी नाईक या एकमेव नावाभोवती येऊन स्थिरावला, रवी नाईक आजमितीस तरी कॉंग्रेसमध्ये आहेत आणि त्यांचे दोन्ही पुत्र भाजपांत.

it will have to prove that Gomantakiy voters are not for sale in upcoming Goa Assembly elections
Goa Election: अँटी-इन्कंबंसीचा धाक; युतीला चाप!

इथे गोवा फॉरवर्डची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. या पक्षाचे जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर हे दोन्ही भंडारी आमदार पक्ष सोडण्याच्या विचारांत आहेत. दोघानाही मंत्रीपदाची लॉटरी लागली होती पण स्वपक्षात राहून पुन्हा जिंकून येण्याची खात्री राहिलेली नाही. साळगावकर भाजपा आणि कॉंग्रेस अशा दोन्ही डगरींवर पांय ठेवून आहेत तर पालयेकरांचेही पलायनाचे यत्न सुरू आहेत. पालयेकरांच्या शिवोली मतदारसंघात भंडारी मतदाराचे प्राबल्य आहे. मंदिरे, समाजसंघटना अशा माध्यमातून समाजबांधवांतली राजकीय जाणीव सजग ठेवण्याचा यत्न तेथे होतो. मात्र शेजारच्या कळंगुट मतदारसंघातले मंत्री मायकल लोबो दावा करतात की गेल्या काही महिन्यांत शिवोली मतदारसंघातील बहुतेक मंदिर समित्यांनी आपल्याला आवर्जून निमंत्रण देत आपला सत्कार केला! याच मायकल याना आपण राजकारणात आणल्याचा माजी मंत्री आणि शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांच्या ताज्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मायकलला भंडारी समाजबांधवांकडून मिळणारा सहानुभूती तपासल्यावर प्रश्न पडतो की भंडारी समाजाला लोबोंच्या नेतृत्वाविषयी अधिक विश्वास आहे की मांद्रेकरांच्या? मनोहर पर्रीकरांच्या मंत्रिमंडळांत मांद्रेकरांप्रमाणेच आणखीनही काही भंडारी समाजबांधव मंत्री म्हणून कार्यरत होते. विधानसभेत विरोधकांकडून त्याना घेरण्याचा यत्न झाला की पर्रीकर या मंत्र्याना खाली बसायला सांगायचे आणि त्याना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणच द्यायचे. भंडारी समाजाचे राजकीय प्रतिनिधी म्हणून स्वतःला पुढे करणाऱ्यांची क्षमता ही अशी आहे. त्यामुळेच भंडारी समाजाची मते कोणत्या पक्षाकडे जावीत, हे अशोक नाईक यांच्यासारख्या व्यक्तीने ठरवणे म्हणजे विनोदच ठरतो. आज या समाजाकडे असलेले सक्षम राजकीय नेतृत्व म्हणजे एकटे रवी नाईक, पण ते वयोमानामुळे हतबल झालेय आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्दही काही लक्ष्यवेधी नव्हती; उलट एसजीपीडीएतील भ्रष्टाचाराचा डाग या कारकीर्दीला लागला होता. एकदा भंडारी समाजसंघटनेची नवी कार्यकारिणी निवडली गेल्यानंतर काही नेत्यांचे शिष्टमंडळ मला भेटायला आले. त्यावेळी मी त्याना समाजाच्या राजकीय नेतृत्वाविषयी प्रश्न केला. समाजाकडे सर्वमान्य असे राजकीय नेतृत्वच नाही, ही बाब त्यावेळी मला जाणवली आणि मी म्हटले की मनोहर पर्रीकर हेच तुमचे नेते, कारण तुमच्या समाजाचे राजकीय हित सध्या तेच पाहाताहेत! भाजपाचे विरोधकांना फोडण्याचे तंत्र, 'आप'चे गोंधळी राजकारण आणि आरजीची घाई यांच्याबरोबरच गोवा फॉरवर्ड या पक्षाच्या धडपडीची दखल घ्यावी लागेल. ही धडपड दिवसागणिक दिशाहीन होत चालली आहे. तिन्ही आमदार मंत्रिपदी स्थापन करूनही या पक्षाने गेल्या पांच वर्षांत कोणती राजकीय मजल मारली? पक्षाची राजकीय कमाई काय, हे नेत्यानी अवश्य सांगावे. उलट पक्षाच्या आमदारानाच फुटून जायची घाई झालीय. साळगांवकराना कॉंग्रेससोबत युती तर हवीच, पण आपल्याला हाताचे चिन्ह मिळावे, असाही यत्न त्यानी चालवलाय. आणि, हे जे पोरखेळ चालले आहेत, त्यात मतदार कुठे आहे? तो गाढवाप्रमाणे आपल्या मागे फरपटत येईल, याची खात्री सर्वच राजकीय विदुषकाना का वाटते आहे? त्याची पूर्वपीठिकाच तशी आहे म्हणून? की गोमंतकीय मतदार विकाऊ आहे, त्याच्यापाशी विचारशक्तीचा अभाव आहे, याविषयी झाडून सगळ्याच राजकीय पक्षांचे एकमत, आहे म्हणून? आपण गाढव नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता आपल्यावरच आलेली आहे. निवडणुकीने तशी संधीही आपल्याला दिलेली आहे. या संधीचा यथायोग्य वापर आपल्याकडून झाला नाही तर मात्र गाढवाचे जिणे आपल्याला जगावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com