गोव्यातील सरकारी कार्यालये २१ पासून खुली

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

अ व ब वर्गीय अधिकाऱ्यांनी कामावर हजर होणे आवश्यक करण्यात आले आहे. क वर्गीय कर्मचारी व इतरांतील मिळून ३३ टक्के जण कामावर एकावेळी उपस्थित असावेत.

पणजी

गोव्यात २१ एप्रिलनंतर पोलिस, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा, अग्नीशमन व आपत्तकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह आणि पालिका सेवा ही खाती पुर्णतः सुरु होणार आहेत. त्याशिवाय सर्व खात्यांतील अ व ब वर्गीय अधिकारी कामावर रुजू होणार असून इतर कर्मचाऱ्यांपैकी ३३ टक्के कर्मचारी एका दिवशी कामावर हजर होतील. यातील एक तृतीयांश कर्मचारी एकावेळी कामावर येतील असेही नियोजन सरकारने केले आहे. राज्याच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने आज तसा आदेश जारी केला आहे.
सरकारची इतर खाती मर्यादीत कर्मचाऱ्यांसह सुरु असतील. अ व ब वर्गीय अधिकाऱ्यांनी कामावर हजर होणे आवश्यक करण्यात आले आहे. क वर्गीय कर्मचारी व इतरांतील मिळून ३३ टक्के जण कामावर एकावेळी उपस्थित असावेत. समाज अंतर पाळून त्यांनी काम करावे. सार्वजनिक सेवा या कार्यालयांतून सुरु केली जावी मात्र सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जावे. जिल्हा प्रशासन व कोषागार खाती सुरु राहतील आणि त्यातून सार्वजनिक सेवा दिली जाईल. त्यासाठी कर्मचारी नेमले जातील. वन खात्याची प्राणीसंग्रहालये, बगिचे अभयारण्यातील गस्त, वनांतील गस्त ही कामे सुरु राहतील असे या आदेशात नमूद केले आहे.
प्रत्येक खाते प्रमुखाने कोणत्‍या दिवशी कोणत्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जाईल याचे वेळापत्रक तयार केले पाहिजे. एकूण कर्मचारी संख्येच्या ३३ टक्के कर्मचारी एकावेळी कामावर असतील याची काळजी घेण्यात यावी. त्या ३३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर सकाळी ९ ते दुपारी ४, सकाळी ९.३० ते सायंकाळी पाच आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.३० अशा तीन वेगवेगळ्या पाळ्यांत कामावर बोलवावे असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. एका पाळीत एक तृतीयांश कर्मचारी कामावर येणार आहेत.
घरातून काम करणारे कर्मचारी दूरध्वनीवर उपलब्ध हवेत आणि बोलावल्यास कामावर येण्याच्या तयारीत असावेत असे नमूद करून आदेशात म्हटले आहे, की कार्यालयांत बैठका आयोजित करू नयेत. आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घ्यावा. कार्यालयात मुखावरण (मास्क) वापरावे. खाते प्रमुखाने आणि स्वायत्त संस्था प्रमुखांनी तसे आदेश आपल्या इतर कार्यालयांना जारी करावेत. कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात थेटपणे सहभागी कर्मचारी पुढील आदेशापर्यंत त्याच कामात असतील. हा आदेश ३ मे २०२० पर्यंत लागू असेल असे स्पष्टीकरण आदेशातच देण्यात आले आहे.  

 

 

संबंधित बातम्या