गोवा मानवाधिकार आयोगाचा कारोभार यांच्या हाती

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

माजी न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे मानवाधिकार आयोग अध्यक्ष

सुनावणीसाठी ३२६ तक्रारी प्रलंबित

गेल्या वर्षी जुलै २०१९ रोजी ए. डी. साळकर हे आयोगाच्या सदस्य पदावरून निवृत्त झाले होते. त्यापूर्वी गेली चार वर्षे आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींवरील सुनावणी ठप्प झाली होती.

पणजी : गेल्या चार वर्षापासून रिक्त असलेल्या गोवा मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती उत्कर्ष व्ही. बाक्रे यांची सरकारने आज नियुक्ती केली. गेल्या महिन्यात या आयोगाच्या सदस्यपदी निवृत्त जिल्हा न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता यांची वर्णी लावली होती. गेल्या सात महिन्यापासून आयोगाचे काम ठप्प झाले होते.

त्यामुळे सध्या या आयोगाकडे सुमारे ३२६ तक्रारी प्रलंबित आहेत. या आयोगाचे दुसरे सदस्य निवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रमोद कामत आहेत. अध्यक्ष व सदस्यांचे निवृत्ती वय ७० वर्षे आहे.

या आयोगाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल मिश्रा यांची मुदत ३ मार्च २०१६ मध्ये संपली होती. त्यांच्या निवृत्तीनंतर सदस्य असलेले ए. डी. साळकर यांची कार्यवाहू अध्यक्ष म्हणून सरकारने काही काळासाठी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची ही नियुक्ती मागे घेण्यात आली. आयोगाचे दुसरे सदस्य जे. ए. केणी यांच्या सप्टेंबर २०१८ मध्ये निधन झाल्याने आयोगाकडे एकमेव सदस्य उरला होता. एकमेव आयोग सदस्य असलेले ए. डी. साळकर हे २७ जुलै २०१९ रोजी निवृत्त झाले होते. त्यामुळे या आयोगाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. नव्या तक्रारी फक्त दाखल करून घेण्यात येत होत्या मात्र त्यावरील सुनावणी अध्यक्ष व सदस्य नसल्याने घेतली जात नव्हती. आता आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तसेच दोन सदस्यांची वर्णी लागल्याने प्रलंबित असलेल्या ३२६ तक्रारींवर आता सुनावणी सुरू होणार आहे.

दरम्यान, हल्लीच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ब्रिक्स परिषद अन्न घोटाळा प्रकरण कंत्राटदाराची बाजू ऐकून घेण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे पाठविले आहे. मुख्य सचिव, पोलिस व कंत्राटदार यांना सुनावणीसाठी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिली आहेत त्यामुळे निद्रिस्त असलेल्या सरकारला आयोगाच्या अध्यक्षपदी घाईघाईने निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची वर्णी लावावी लागली आहे.

संबंधित बातम्या