महाराष्ट्र सरकारच्या एसओपीमुळे गोवा पर्यटनावर परिणामाची शक्यता

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

विमानमार्गे येणाऱ्या लोकांसाठी हा नवीन नियम केला असला तरी अनेक लोकांना हा नियम माहित नसल्याने अनेक पर्यटक आपली सुट्टी न संपवताच परत जात असलेले पहायला मिळत आहेत.

पणजी: महाराष्ट्र शासनाने गोव्याहून येणाऱ्या लोकांसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. विमानमार्गे येणाऱ्या लोकांसाठी हा नवीन नियम केला असला तरी अनेक लोकांना हा नियम माहित नसल्याने अनेक पर्यटक आपली सुट्टी न संपवताच परत जात असलेले पहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसात हा नियम रस्तामार्गे येणाऱ्या लोकांसाठी करतील म्हणून अनेक लोक गोव्याला जाण्याचे प्लॅन रद्द करीत आहेत. 

दरम्यान या सगळ्याचा परिणाम पर्यटनावर पुन्हा होणार असल्याचे आता निदर्शनास येऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसातच राज्याच्या रस्त्यांवर दिसणारी गर्दी चांगलीच मावळली आहे. विमानमार्गे आलेल्या लोकांना पर्याय नसल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये पैसे खर्च करून कोरोना पडताळणी चाचण्या करून घेतल्या. 

मात्र येत्या काही दिवसात जे लोक विमानमार्गे फिरण्यासाठी येणार होते, त्यांनी हा जादाचा खर्च टाळण्यासाठी गोव्याला येणे रद्द करून तिकिटे रद्द केली आहेत. तशा पोस्ट आणि मिम सोशल मिडिआवर व्हायरल झाल्या आहेत. पर्यटकांना ७२ तासांच्या आतील प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याने अवघ्या दोन दिवसात गोवा फिरण्यासाठी जाणे लोक पुढे ढकलत आहेत. 
अवघ्या एका दिवसात एसओपी बदलल्यामुळे पर्यटकांची तारांबळ उडाल्याची कल्पना इतराना आहे. त्यामुळे अशी आपली फजिती होऊ नये, यासाठी लोक गोव्याला येणे टाळत आहेत. गोव्याला पर्याय म्हणून आता रत्नगिरी, मालवण आणि महाराष्ट्रात असणाऱ्या इतर कोंकणी भागातील जागांचा विचार केला जात आहे.

संबंधित बातम्या