गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सर्वोत्तम ठरेल

Dainik Gomantak
शनिवार, 18 जानेवारी 2020

गोव्यातील ही स्पर्धा विविध कारणास्तव लांबली. काही बाबींवर चर्चा झाली नाही, पण आता नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे.

किशोर पेटकर
पणजी

गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे संयोजन सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजिजू यांनी शनिवारी व्यक्त केला.
गोव्यातील ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा साधन सुविधा प्रकल्प उद्‌घाटनानिमित्त रिजिजू गोव्यात आले आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी फिट इंडिया सायक्लॉथॉन मोहिमेस हिरवा बावटा दाखविला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
गोव्यातील नियोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी केंद्रीयमंत्री रिजिजू म्हणाले, की गोव्यातील ही स्पर्धा विविध कारणास्तव लांबली. काही बाबींवर चर्चा झाली नाही, पण आता नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. तयारीने वेग घेतला आहे. मी कामाचा आढावा घेणार आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा देशातील सर्वोत्तम ठरेल, याचा पूर्ण विश्वास वाटतो. गोवा हे तंदुरुस्त आणि क्रीडामय राज्य बनविण्यासाठी, राष्ट्रीय स्पर्धा व्यावसायिक दृष्टिकोनातून सफल करण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत, त्यामुळे स्पर्धा यशस्वी ठरण्याबाबत दुमत नाही.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा सरकारला आणखी आर्थिक निधीची आवश्यकता भासल्यास ती पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तत्पर असेल, त्याविषयी तोडगा काढला जाईल, असे रिजिजू यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले, की केंद्र सरकारतर्फे स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी आर्थिक साह्य करण्यात येत आहे.. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला केंद्राच्या वित्त खात्याची मदत लाभत आहे. आणखी आर्थिक गरज भासल्यास ती पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.
२०१६पासून सातत्याने लांबलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यावर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) गोव्याला शेवटची मुदतवाढ दिली होती. सध्या विविध ठिकाणच्या कामांनी वेग पकडला आहे. काही ठिकाणी नियोजित वेळ पाळण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रिय क्रीडा व युवा व्यवहारमंत्री किरेन रिजीजू यांच्यासमवेत क्रीडा व युवा व्यवहार ख्यात्याचे संचालक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीचा अढावा घेतला. गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुरेशा क्रीडा साधनसुविधा उपलब्ध करण्यावर व इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यात राहण्याची सोय, वाहतूक, समारंभाची व्यवस्था, स्वयंसेवक, वैद्यकीय सुविधा, अधिस्वीकृती व्यवस्था यांचा समावेश आहे.
सरकारतर्फे राष्ट्रीय स्पर्धांसाठी बांबोळी येथील डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम आणि ॲथलेटिक ट्रॅक, काकोडा येथील मल्टीपर्पज सभागृह, नावेली क्रीडा प्रकल्प, फोंडा येथील इनडोअर स्टेडियम, पेडणेतील सावळवाडा, पेडेतील हॉकी फिल्ड, फातोर्डा येथील टेनिस सुविधा, कांपाल येथील जलतरण तलाव आणि चिखली येथील स्क्वॅश सुविधा अशा ठिकाणांची यादी बैठकीत सादर करण्यात आली.
पोलिस उपमहानिरीक्षक राजेशकुमार, आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, उपअधीक्षक (सुरक्षा) राजू राऊत देसाई, माहिती तंत्रज्ञान संचालक अंकिता आनंद गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतेजा आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी दीपक नार्वेकर आणि खात्यांतील प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
रिजीजू यांनी राष्ट्रीय स्पर्धा या देशातील विविध राज्यांमध्ये खेळल्या गेल्या तरी आपण एकाच देशातील आहोत आणि हा कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. राज्यांनी २ किंवा ३ पदकांवर समाधान न मानता अधिक पदके मिळविण्याचा उद्देश साधण्यासाठी दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात क्रीडा संस्कृती बिंबविण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गोव्यात सुमारे ३७ स्पर्धा खेळविल्या जातील. क्रीडा स्पर्धांना सरकार एकटे प्रोत्साहन देऊ शकत नाही तर त्यासाठी खासगी क्षेत्राचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सरकार आणि संबंधितांच्या सहकार्याने हा राष्ट्रीय स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी सर्व
ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या