राज्‍य सौर ऊर्जा निर्मितीकडे

Dainik Gomantak
गुरुवार, 23 जानेवारी 2020

राज्याच्या सौर ऊर्जा धोरणानुसार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम सरकार अनुदानाच्या रुपाने देते. व्यावसायिक पद्धतीने सौर ऊर्जा निर्मिती करायची असल्यास त्यासाठी खर्चाच्या २० टक्के अनुदान दिले जाते.

अवित बगळे
पणजी

संयुक्त वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात वर्षभरात ७० मेगावॅट सौर उर्जेची निर्मिती झालीच पाहिजे. त्यादिशेने पावले टाकताना आज बोर्डा - मडगाव येथील सरकारी महाविद्यालयाच्या छतावर बसवलेले सौर पॅनल ग्रीडला जोडण्यात आले. गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या माध्यमातून सरकारने हे काम हाती घेतले आहे. राज्याच्या सौर ऊर्जा धोरणानुसार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम सरकार अनुदानाच्या रुपाने देते. व्यावसायिक पद्धतीने सौर ऊर्जा निर्मिती करायची असल्यास त्यासाठी खर्चाच्या २० टक्के अनुदान दिले जाते. सौर पॅनलपासून वीज निर्मिती सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी अनुदान मिळते. सध्‍या राज्‍य वीज पूर्णपणे केंद्रीय ग्रीडमधून घेते. सौर ऊर्जा निर्मिती त्‍याचमुळे उर्जेच्‍या बाबतीत आत्‍मनिर्भरतेच्‍या दिशेने टाकलेले दमदार पाऊल ठरत आहे.

वीजनिर्मितीला सुरवात
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या साळगाव येथील इमारतीच्या छतावर ४५ किलोवॅट वीज निर्मिती करणारे सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. ‘रेनबो सोलर पावर सोल्युशन’ने हे काम केले आहे. येत्या आठवड्याभरात ही वीज ग्रीडला जोडली जाणार आहे. मडगावच्या महाविद्यालयाच्या छतावर ३० किलोवॅट वीज निर्मिती आजपासून सुरू झाली आहे.

निर्मिती करणाऱ्यास लाभ
गोवा विद्यापीठाच्या विविध इमारतींच्या छतावर ६०० किलोवॅट वीज निर्मिती करणारे सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. ४ फेब्रुवारीपर्यंत ती वीज ग्रीडला जोडली जाणार आहे. ज्या ग्राहकाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती होते, त्या ग्राहकाने वापरलेली वीज वजा करून त्याने निर्माण केलेली वीज या पद्धतीने वीज बिल आकारले जाणार आहे. सरकारी योजनेचा लाभ हवा असेल, तर गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून हे सौर पॅनल बसवून घ्यावे लागते. गृहनिर्माण सोसायट्यांही घरगुती ग्राहकांसाठी लागू असलेले अनुदान मिळवू शकतात.

सौर ऊर्जा निर्मितीचे पूर्ण झालेले प्रकल्प
कोलवाळचा तुरुंग १०० किलोवॅट
अंटार्क्टिका केंद्र १८५ किलोवॅट
कामुर्ली पंचायत २० किलोवॅट
वीज उपकेंद्र ४१०किलोवॅट
मडगाव महाविद्यालय ३० किलोवॅट

काम सुरू असलेले प्रकल्प
गोवा विद्यापीठ ६०० किलोवॅट
प्रदूषण नियंत्रण मंडळ ४५ किलोवॅट
अग्‍निशमन केंद्र ४ किलोवॅट
न्यायमूर्तींचे निवास्थान ५ किलोवॅट
टपाल खाते इमारत २० किलोवॅट

१३ ठिकाणांहून ५० किलोवॅट ऊर्जा निर्मिती
गोवा ऊर्जा विकास यंत्रणेकडे सध्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी १३ अर्ज वित्तीय मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. या अर्जदारांना साडेबारा लाख रुपये अनुदान द्यायचे आहे. या १३ ठिकाणी ५० किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे.

खर्च, जागा किती लागणार?
घरावर एका किलोवॅटचे पॅनल बसवण्यासाठी सर्वसाधारणपणे ५५ हजार रुपये खर्च येतो. १० ते १२ चौरस मीटरात एक किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती करणारे पॅनल बसवता येतात. १० किलोवॅटपेक्षा जास्त पॅनल बसवल्यास प्रतिकिलोवॅट खर्च कमी होतो. यासाठी पंजाब नॅशनल बॅंक सध्या कर्जरुपाने अर्थसहाय्‍य करते.

काय करावे लागेल?
घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी नजीकच्या वीज उपविभागीय कार्यालयात अलीकडेच भरलेल्या वीज बिलासह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. येत्या महिन्याभरात आशियायी विकास बॅंकेने पुरस्कृत केलेले सॉफ्टवेअर वापरात आणले जाणार आहे. त्यामुळे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. साधारणतः महिनाभरात अर्जावर प्रक्रिया केली जाते. आजवर गोवा ऊर्जा विकास यंत्रणेने २२७ अर्ज मंजूर केले आहेत. त्यातून १५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. आजवर ४ मेगावॅट सौर ऊर्जा वीज खात्याच्या ग्रीडला जोडण्यात आली आहे.

संबंधित बातम्या