बॉक्सिंगमध्ये गोव्याला दोन पदके

Dainik Gomantak
सोमवार, 20 जानेवारी 2020

किशोर पेटकर

पणजी

किशोर पेटकर

पणजी

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला सोमवारी आणखी दोन पदके मिळाली. बॉक्सिंगमध्ये पुष्पेंद्र सिंग व सुमन यादव यांनी ब्राँझपदकाची कमाई केली. फुटबॉलमध्ये गोव्याचे आव्हान उपांत्य फेरीतच आटोपले. त्यांना आता ब्राँझपदकाच्या लढतीत खेळावे लागेल.
पुष्पेंद्र याने २१ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरी गाठली, पण ९० किलो वजनगटात त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही. उत्तराखंडच्या कपिल पोखरिया याने त्याच्यावर ५-० असा सहज विजय मिळविला. त्यापूर्वी उपांत्यपूर्व लढतीत पुष्पेंद्रने उत्तराखंडच्याच राहुल सिंग यांला ५-० फरकाने हरविले होते.
मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात सुमन उपांत्य फेरीत हरली. कर्नाटकच्या अंजू हिने तिला ४-१ फरकाने हरवावे लागले, त्यामुळे गोव्याला ब्राँझपदक मिळाले.

फुटबॉलमध्ये पंजाबकडून हार
२१ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत गोव्याला सोमवारी अंतिम फेरी गाठण्यास अपयश आले. पंजाबने धडाकेबाज खेळ करताना त्यांनी गोव्यावर ३-१ फरकाने विजय प्राप्त केला. पंजाबच्या संघाने २३व्या मिनिटास आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी ६५व्या मिनिटास आघाडी वाढविली. ६९व्या मिनिटास जॉस्टन कार्दोझ याने गोव्याची पिछाडी १-२ अशी कमी केली. मात्र ८२व्या मिनिटास गोल करून पंजाबने विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या उपांत्य लढतीत यजमान आसामने महाराष्ट्राला ३-० फरकाने नमवून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकासाठी आता २२ जानेवारी रोजी गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात सामना होईल.

गोव्याची कामगिरी
- एकूण पदके ः ८
- रौप्यपदके ः ३, ब्राँझपदके ५
- जलतरणात ३ रौप्य, २ ब्राँझपदके
- बॉक्सिंगमध्ये २ ब्राँझपदके
- ज्युडोत १ ब्राँझपदक

संबंधित बातम्या