गावडोंगरी, खोतीगावातील पाणी समस्या मिटणार

Dainik gomantak
गुरुवार, 25 जून 2020

येथील गावडोंगरी, खोतीगाव या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवण्यासाठी नऊ कूपनलिका खोदण्यात येणार आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा खात्याचे अभियंत्यांनी दिली. ‘जल जीवन मिशन कार्यक्रम’ अंतर्गत 
खोतीगावात पाच व गावडोंगरीत चार कूपनलिका खोदण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

काणकोण

येथील गावडोंगरी, खोतीगाव या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवण्यासाठी नऊ कूपनलिका खोदण्यात येणार आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा खात्याचे अभियंत्यांनी दिली. ‘जल जीवन मिशन कार्यक्रम’ अंतर्गत 
खोतीगावात पाच व गावडोंगरीत चार कूपनलिका खोदण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 
काणकोण तालुक्यातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी अभियंते व सर्व सरपंच, पंच यांची संयुक्त बैठक आज (बुधवारी) श्रीस्थळ येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात घेण्यात आली. या बैठकीला अभियंता अनिल रिंगळे, अधीक्षक अभियंता वळवईकर, सहाय्यक अभियंता लेस्टर फर्नांडिस, कनिष्ठ अभियंता दीपराज मडकईकर, प्रदिप पागी, नगराध्यक्षा नितू समीर देसाई, उपनगराध्यक्ष गुरू कोमरपंत, नगरसेवक शामसुंदर नाईक देसाई, हेमंत नाईक गावकर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे खास सचिव उपस्थित होते. 
पंचायत क्षेत्रात मध्यरात्री पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. बुस्टर पंप, मोटार पंप नादुरूस्त झाले आहेत. काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यांना वारंवार गळती लागत आहे. आगोंद, लोलये, वैजावाडा, खोतीगावात ओव्हर हेड जलकुंभाचा वापर करण्यात येत नसल्याची तक्रार येथील सरपंचांनी केली. प्रत्येक पंचायत कार्यालयात कामावर नेमलेल्या वाल्व ऑपरेटर्सचा ड्युटी चार्ट ठेवण्याची मागणी सरपंचांनी केली. काही वेळा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास १० ते १५ दिवसांचा दिर्घ कालावधी घेण्यात येत आहे. त्यामुळे रहिवाशांचे पाण्याविना हाल होत असल्याचे सरपंचांनी सांगितले. 
मुख्य अभियंता रिंगळे यांनी सांगितले, केंद सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पासाठी पंचायत पातळीवर सरपंच,पंच व कनिष्ठ अभियंता याचा समावेश असलेली एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून पेयजलाच्या तातडीच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. काणकोण तालुक्यातील पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी २० कोटी रूपये खर्चून जलवाहिन्या, जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत ते काम पूर्ण होऊन जानेवारी पासून त्या कार्यान्वित करण्यात येतील, असेही अभियंत्यांनी सांगितले. 

दोन अतिरिक्त कनिष्ठ अभियंत्यांची उपसभापतींकडून मागणी 
काणकोणात तीन कनिष्ठ अभियंता आहेत. मात्र, तालुका मोठा असल्याने तालुक्यात अतिरिक्त दोन कनिष्ठ अभियंत्यांची गरज जलपुरवठा विभागाला आहे, अशी मागणी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी केली. अभियंत्यांनी आपले मोबाईल बंद ठेऊन नयेत त्यामुळे नागरिकांचा गैरसमज होतो. त्याचप्रमाणे वॉल्व ऑपरेटरबरोबर किमान महिन्यातून एकदा पंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा संदर्भात भेट द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या