दक्षिण आफ्रिकेतील बोटस्वानात गणरायाचा जयजयकार

दक्षिण आफ्रिकेतील बोटस्वानात गणरायाचा जयजयकार
दक्षिण आफ्रिकेतील बोटस्वानात गणरायाचा जयजयकार

दक्षिण आफ्रिकेतील बोटस्वाना देशात मराठी माणसं फार कमी असली, तरी गणेशोत्सव साजरा करण्यात मात्र ती अजिबात कमी पडत नाहीत. यंदाच्या उत्सवात या मंडळींबरोबरच इतर प्रांतातील भारतीयांनीही, ‘कोरोनाचं विघ्न लवकरात दूर कर रे देवा,’ अशी कळकळीची प्रार्थना गणरायाला केली. तेथील रहिवासी शैलजा महादेव यांनी ही माहिती दिली.

शैलजाताई म्हणाल्या, ‘‘येथे राहणाऱ्या दहा ते बारा मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन ‘बोटस्वाना मराठी मंडळ’ स्थापन केलं. या मंडळाकडून चार वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला आहे. भारतातून मातीची गणेशमूर्ती मागवली जाते. तिची स्थापना गॅबॉरोन शहरातील हिंदू मंदिरात केली जाते. येथे मराठी कुटुंबं मोजकीच आहेत. तीच पुढाकार घेऊन दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची व्यवस्था बघतात. गुजराती, पंजाबी व दक्षिण भारतीय आदींच्या प्रचंड प्रतिसादामुळे गणपती बाप्पाच्या उत्सवाची मोठीच धामधूम असते, पण यंदा मात्र गर्दी टाळून, साधेपणाने उत्सव साजरा केला जात आहे.’’

शैलजाताईंनी असंही सांगितलं की, सकाळ - संध्याकाळ पूजा व आरती तसंच संध्याकाळी महाप्रसाद असतो. यासाठी दीडशे ते दोनशे लोक उपस्थित असतात. यात स्थानिक नागरिकही कुतूहलाने सहभागी होतात. मिरवणुकीत नाचतात व ‘गणपती बाप्पा मोरया,’ असा जोरदार जयघोष करतात. दहा दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. यातून अनेकांमधील कौशल्यं वाखाणली जातात. विसर्जन मिरवणुकीत मराठी कुटुंबांतील महिला नऊवारी साडी नेसून, नाकात झोकदार नथ घालून येतात. पुरुषांच्या डोक्‍यावर गांधी टोपी किंवा फेटा  असतो. 

गुलाल उधळत, लेझीम खेळत ते गणपतीचा नामघोष करतात. यातून स्थानिकांना मराठी संस्कृतीची झलक बघायला मिळते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com