प्रदर्शन संपले, पण प्राणी मैदानातच राहिले!

Dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020
टाळेबंदीमुळे खांडोळ्यात या पुतळ्यांकडे आयोजकांचे दुर्लक्ष

खांडोळा ः प्रदर्शन संपल्यानंतरही टाळेबंदीनंतर मैदानावर उभे असलेले प्राण्यांचे पुतळे. (घुग्रेटकर)

खांडोळा
टाळेबंदीपूर्वी खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयासमोरील मैदानावर मार्च महिन्यात प्रदर्शन भरले होते. प्रदर्शनाला प्रचंड गर्दी होती. प्रदर्शनाबरोबरच तेथे रेल्वे, बोटींगसाठी पाण्याचा तलाव व विविध प्राण्याचे पुतळे उभे करण्यात आले होते. प्रदर्शन २२ मार्च रोजी संपले, त्यानंतर रेल्वे, बोटी, मंडप काढण्यात आला. परंतु प्राणी मात्र तेथेच राहिले. कारण टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर त्यांना हटविणे कठीण झाले. त्यामुळे गेला दीड महिना हे प्राणी मैदानावर दिमाखात उभे आहे. दूरवरून पाहताना खरेच प्राणी येथे आलेत का? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे.
टाळेबंदीमुळे दीड महिना त्या ठिकाणी आयोजक, ग्रामस्थ, मुले यापैकी कोणीच फिरकलेच नाही. कारण घरातून कोणालाच बाहेर पडायची बंदी होती, सगळीकडे पोलिस तैनात होते. त्यामुळे बाजारातसुद्धा कोणी येत नव्हते. तेथे मुले कशी बाहेर पडणार? त्यामुळे त्या ठिकाणी पुतळेच दिवसरात्र उभे आहेत. परंतु गेल्या चार दिवसात काही प्रमाणात टाळेबंदीत शिथिलता आल्याने संध्याकाळच्या वेळी काही मुले या मैदानावर खेळत आहेत. कधी कधी चार चार मुले हत्ती, सिंहावर स्वार होण्याचा प्रयत्न करीत आहेत. परवा दिवशी तर एक धाडशी मुलगा जिराफवर चढण्याचा प्रयत्न करीत होता. तेथे कोणीच नाही, हे पाहून आता मुले घराबाहेर पडू लागली आहेत. कदाचित त्या प्राण्यांवर चढताना पडण्याची शक्यता आहे. संबंधितांनी त्वरित हे प्राणी तेथून हटविण्याची संदर्भात हालचाल करण्याची गरज आहे, असे मत पालकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात साठलेला कचरा जाळण्याचे कामही या दिवसात या ठिकाणी केले जाते. चुकून प्राण्याच्या ठिकाणी कचरा जाळल्यास त्यांना धोका आहे. आयोजकांचे मोठे नुकसानही होण्याचा धोका आहे. तसेच पावसाची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. वादळवारा, पावसामुळेही नुकसान शक्य आहे, तेव्हा आयोजकांनीही त्वरित या प्राण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पंचायतीने लक्ष द्यावे
राज्यात काही प्रमाणात टाळेबंदीत सवलती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हे पुतळे तेथून हटविणे शक्य आहे. पुढील धोका पत्करण्यापेक्षा पंचायत पातळीवर आयोजकांना ते प्राणी हटविण्यासंदर्भात सूचना करणे गरजेचे आहे. कारण मुले आता बाहेर पडू लागली आहेत. त्यांना आवरणे कठीण आहे. त्यासाठी तेथे पोलिस यंत्रणा ठेवणेही चुकीचे आहे. कारण अनावश्यक ताण पोलिसावर का द्यावा. पंचायतीने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या