‘नवचेतना युवक संघाचे कार्य उल्लेखनीय’: दीपक कळंगुटकर

प्रतिनिधी
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

नवचेतना युवक संघ पेडणे ही संस्था टाळेबंदीपासून सातत्याने आजपर्यंत पेडणे तालुक्यात अग्रेसर आहे व त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी काढले.

पेडणे:  प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत आहे. जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो की आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो. गरज आहे ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची. नवचेतना युवक संघ पेडणे या संस्थेने पेडणे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा करून एक स्तुत्य उपक्रम सामाजिक अंतर ठेवून आयोजित केला. नवचेतना युवक संघ पेडणे ही संस्था टाळेबंदीपासून सातत्याने आजपर्यंत पेडणे तालुक्यात अग्रेसर आहे व त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी काढले.

नवचेतना युवक संघातर्फे आयोजित केलेल्या पेडणे तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात कळंगुटकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य तामी अल्वारिस, अॅड. जितेंद्र गावकर, समाज कार्यकर्ते मनोहर तळवणेकर, संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर उपस्थित होते.

प्रेरणा नाईक, नेहा निगळये, विठोबा पिरणकर, प्राप्ती काळसेकर, सलोनी राऊळ, शौनक किनळेकर, स्वप्नील सावंत, माधवी सावळ देसाई, कृतिका रेडकर, रश्मी गडेकर, लक्ष्‍मण परब, निकिता आरोलकर, मिताली नाईक आरोंदेकर, प्रतिक नाईक, सायली शेट्ये, सेजल गोडकर, बारावीच्या परीक्षेत पेडणे तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेली सेजल शेट्ये आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डमध्ये ९० टक्के मिळवलेली व गणित विषयात ९७ टक्के गुण प्राप्त केलेली सृष्टी शशिकांत पुनाजी या गौरवमूर्तींचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. सिंथिया गावकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

संबंधित बातम्या