‘अटल ग्राम’चा उपक्रम मंजूर

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

आमदार प्रसाद गावकर यांनी जाणून घेतली कारभाराची माहिती

सांगे:  नेत्रावळी अटल आदर्श ग्राम समितीची बैठक आमदार प्रसाद गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अटल ग्राम एजन्सीचे प्रमुख सुभाष वेळीप, प्रकल्प अधिकारी विजय सक्सेना, सरपंच अर्चना गावकर व इतर सदस्यांच्या उपस्थित नेत्रावळी येथे होऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच खर्चाला मंजुरी देऊन पुढील काळात काही राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मंजुरी देण्यात आली. 

आमदार प्रसाद गावकर यांची ही अटल आदर्श ग्रामची पहिलीच बैठक होती. या बैठकीत त्यांनी आतापर्यंत चाललेल्या एकूण कारभाराची माहिती जाणून घेतली व नेत्रावळी हा कृषीसंपन्न भाग असल्याने या भागात चार दूध संस्था आहेत व एकूण तीनशेपेक्षा अधिक शेतकरी दूध व्यवसाय करतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांच्या व्यवसायात उत्साह येण्यासाठी पाचपेक्षा अधिक गायी असणाऱ्या  प्रत्येक शेतकऱ्याला पक्क्या स्वरूपात गाईगुरांचा गोठा बांधून देणे, सोबत मलमूत्र विसर्जनासाठी स्वतंत्र  योजना व प्रत्येकाला एक बायोगॅस बांधून देणे किंवा असल्यास त्याची दुरुस्ती करून देणे व दूध काढण्यासाठी यंत्र पुरविणे हा प्रस्ताव आजच्या पहिल्याच बैठकीत आपण सादर केला असल्याची माहिती आमदार गावकर यांनी दिली. 

नेत्रावळीत दूध हा  प्रमुख व्यवसाय असल्याने त्याला अधिक बळकटी देण्यासाठी अटल ग्रामने यापूर्वीच ही योजना शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवी होती, पण ती केली नाही. या एजन्सीकडे साडेतीन कोटी रुपये आहे, त्याचा वापर समाजाच्या उत्कर्षासाठी आणि खास करून प्रमुख व्यवसायवृद्धीसाठी होणे आवश्यक असल्याने आपण हा प्रस्ताव आजच्या बैठकीत  मांडला आहे. दुध व्यवसाय करताना शेजाऱ्यांना मलमूत्राचा त्रास होतो. त्यातून तंटे, आजार उद्भवल्यास सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. शिवाय प्रत्येकाला एक बायोगॅस बांधून दिल्यास त्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. महागडा गॅस वापरण्यापेक्षा मलमूत्राची विल्हेवाट आणि घरगुती वापरासाठी गॅस वापरता येईल या हेतूने आपण प्रस्ताव सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्व. मनोहरभाई पर्रीकर असताना अटल आदर्श ग्रामविषयी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली होती, पण त्यापैकी एकही गोष्ट अद्याप झाली नसल्याचेही आमदार म्हणाले. तरीही शेतकऱ्यांच्या हितासाठी एजन्सी काम करायला तयार असल्यास आपले सर्व ते सहकार्य अटल ग्राम एजन्सीला असल्याचे आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितले. 

प्रकल्प अधिकारी विजय सक्सेना यांना एकूण अटल आदर्श ग्रामसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी विचारले असता ते म्हणाले, की काही प्रसारमाध्यमांनी नेत्रावळी अटल ग्राम म्हणजे स्टॉबेरी आणि माटोळी बाजार असेच चित्र निर्माण केले आहे ते चुकीचे असून एजन्सी गावात विविध लोकोपयोगी कामांना चालना देत आहे. यापुढेही लोकांना काय हवे त्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अटल ग्रामला खऱ्या अर्थाने तीन वर्षे झाली असल्याचे सांगून नेत्रावळीत केलेल्या कामांची माहिती दिली. 

एजन्सीचे अध्यक्ष सुभाष वेळीप म्हणाले, की स्टॉबेरी लागवड करण्यासाठी जो खर्च येतो तो सर्व खर्च एजन्सीने केला आहे. त्यातून होणारा फायदा हा बचत गटासाठी उपयोगी येतो. त्याचबरोबर मिरची लागवड व इतर लागवडीसाठी लागणारी बियाणे, बालवाडी, हायस्कूल, प्राथमिक शाळांना लागणारे आवश्यक साहित्य पुरविणे, बालवाडी बांधून देणे अशाप्रकारची कामे केल्याची माहिती दिली. या बैठकीला सरपंच अर्चना गावकर, सतीश गावकर, दुर्गाप्रसाद व इतर उपस्थित होते. goa

संबंधित बातम्या