‘को-वॅक्सिन ट्रायल’चा कोणताच त्रास नाही

Sudesh Arlekar
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

‘कोविड १९’वरील को-वॅक्सिन ट्रायलच्या लसीचा कोणताच त्रास जाणवला नाही, असा दावा म्हापसा येथील एक गृहिणी मयूरा केणी यांनी केला आहे. याबाबत मयूरा केणी यांनी स्वयंसेवक या नात्याने अलीकडेच पेडण्यातील रेडकर हॉस्पिटलमध्ये दुसरा तथा शेवटचा डोस घेतला आहे.

म्हापसा
पहिला डोस २७ जुलैला झाला होता, तर १४ दिवसांनंतर दुसरा डोस १९ ऑगस्ट रोजी देण्यात आला. ही वॅक्सिन ‘भारत बायोटेक इंरनॅशनल’ या कंपनीने विकसित केली आहे व त्यासंदर्भात ‘क्रोम क्लिनिकल रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे गोव्यात अलीकडेच जी चाचणी घेण्यात आली त्यात मयूरा यांचा समावेश होता. पेडणे येथील रेडकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. धनंजय लाड हे त्या कंपनीचे एक संचालक तथा त्या प्रकल्पाचे प्रमुख आहेत.
यासंदर्भात स्वत:च्या भावना व्यक्त करताना मयूरा केणी म्हणाल्या, ‘‘प्रायोगिक तत्त्वावर सध्या कोविडच्या लसीची चाचणी सुरू असून त्या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात माझा सहभाग होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ही लस पूर्वी कधीच माणसांना दिली गेली नव्हती म्हणून याबाबत सर्वजण जरा साशंकच होते. ही काही जादूची कांडी नाही, हे विज्ञान आहे. म्हणजेच प्रयोग, प्रोटोकॉल्स, फेसीस (टप्पे) आणि डेटा (माहिती) गोळा करणे हे सर्व त्यात आलेच. ‘ट्रायल ॲण्ड एरर्स’चासुद्धा त्यात समावेश होतो.’’
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मी ४३ वर्षीय सर्वसाधारण गृहिणी असून इतरांसारखे एक साधे-सोपे जीवन जगते. जेव्हा मला या व्हॅक्सिन ट्रायलबद्दल समजले, तेव्हा मनात कुठेतरी वाटले की आपणसुद्धा या चाचणीचा एक भाग असावे. निर्धार करून त्याच दिशी रेडकर हॉस्पिटल गाठले. पहिल्या टप्प्यासाठी अठरा ते पंचावन्न वयोगटातील केवळ पन्नास निरोगी व्यक्तींची गरज होती. वरकरणी तरी माझी तब्येत ठीकठाक होती, परंतु सर्व काही रक्त, मूत्र आणि कोविडच्या चाचणीवर अवलंबून होते. माझे सगळे वैद्यकीय अहवाल नॉर्मल असून माझी निवड झाल्याचे सात दिवसांनंतर मला सांगण्यात आले.’’

ही लस एक सामान्य इंजेक्शन सारखीच असते. देताना दुखत वगैरे काही नाही. दोन दिवस जरासा हात जड झाल्यासारखे झाले, परंतु मला ताप, अंगदुखी काही जाणवली नाही. हॉस्पिटलच्यावतीने एक थर्मोमीटर आणि एक डायरी देण्यात आली आहे. तब्येतीत काही फरक जाणवला तर डायरीत नोंद करायचे आहे आणि जास्त त्रास झाला, तर डॉक्‍टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु माझी तब्येत एकदम ठीकठाक आहे आणि मला कोणताही त्रास जाणवत नाही.
- मयूरा केणी, म्हापसा

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या