गोमंतकीय खाज्‍याला ‘जीआय’ मानांकन

Avit bagale
शुक्रवार, 31 जुलै 2020

गोव्यातील खाजे, हरमलची मिरची आणि मयंडोळी केळी यांना केंद्र सरकारने भौगोलिक ओळख (जिऑग्राफीकल आयडेंटीफिकेशन) मानांकन दिले आहे. यासाठी सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने मुंबईत गेल्या फेब्रुवारीमध्ये सादरीकरण केले होते.

अवित बगळे
पणजी :

गोव्यातील खाजे, हरमलची मिरची आणि मयंडोळी केळी यांना केंद्र सरकारने भौगोलिक ओळख (जिऑग्राफीकल आयडेंटीफिकेशन) मानांकन दिले आहे. यासाठी सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने मुंबईत गेल्या फेब्रुवारीमध्ये सादरीकरण केले होते.
देशभरात त्यावेळी स्वातंत्र्याचे व स्वदेशीचे वारे जोरात होते. गोवा पोर्तुगीज अंमलाखाली होता तरीही फातर्फा येथील जत्रेत ‘गांधी खाजे’ म्हणून खाजे विकले जात होते. स्वदेशीच्या विचाराने भारलेले देशाभिमानी ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत होते. हे साल होते १९२४. ही कागदपत्रांतील नोंदच खाज्याला भौगोलिक ओळख (जिऑग्राफीकल आयडेंटीफिकेशन) मानांकन मिळवून महत्त्वाची भूमिका बजावून गेली आहे.
खाजे, मयंडोळी केळी, हरमलची मिरची आणि कोकोनट व्हिनेगर यांना हे मानांकन मिळावे यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे संचालक लेविनसन मार्टिन्स यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी खाजे, मिरची व खाज्याला मानांकन मिळाले आहे. मानांकनाचे राज्यस्तरीय समन्वय अधिकारी दीपक परब, प्रकल्प वैज्ञानिक माधुरी शेटये यांनी मुंबईत मानांकन मिळण्यासाठी सादरीकरण केले. यासाठी डिचोलीतील खाजे उत्पादक राजाराम चणेकर केपे येथील खाजे उत्पादक आनंद काणेकर, हरमलमधील मिरची उत्पादक लवू ठाकूर, दत्ताराम ठाकूर, केळी उत्पादक शेतकरी साईनाथ गावस (इब्रामपूर) आणि प्रकाश मळीक (हसापूर) हेही मुंबई येथे गेले होते. मयंडोळी केळीत साखरेची मात्रा इतर केळ्यांच्या तुलनेत जास्त असते हा मुद्दा तेथे मांडण्यात आला होता.

 

- महेश तांडेल

संबंधित बातम्या