‘नीट, जीईई परीक्षा पुढे ढकलाव्यात’

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

नीट आणि जेईई परीक्षा घेणारच असे केंद्र सरकार ठाम राहिले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना असो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो त्यांनी या परीक्षा सध्या घेऊ नयेत त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे.

पणजी: नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्‍ट्रन्स टेस्ट (नीट) आणि जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) या परीक्षा घेण्याविषयी सध्या देशभर राजकीय वातावरण धुमसू लागले आहे. गोव्यातही आता काँग्रसेच्या भारतीय विद्यार्थी संघटनेने पुढील महिन्यात होणाऱ्या या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. 

नीट आणि जेईई परीक्षा घेणारच असे केंद्र सरकार ठाम राहिले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना असो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो त्यांनी या परीक्षा सध्या घेऊ नयेत त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे.

कोरोनाचा देशभर संसर्ग वाढत आहे आणि दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नीट आणि जेईई परीक्षा सध्या घेणे उचित नाही, यासाठी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी त्यास विरोध केला आहे. 

गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे आणि केंद्राने जाहीर केल्यानुसार गोव्यातही ही परीक्षा होईल, अशी चिन्हे आहेत. परंतु आता काँग्रेसच्या गोव्यातील भारतीय विद्यार्थी संघटनेने ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या