रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘सुपर फूड’ योजना

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

कृषी विभागाने सुपर फूड मानल्या जाणाऱ्या पिकांची नोंदणी केली केली असून या सुपर फूडमध्ये नाचणी, शेवगा, माडी, गोमंतकीय काटेकणगी, फणस, आवळा, सुरण आणि कोरगुट भाताचा समावेश केला आहे.

सासष्टी: कोरोना विषाणूमुळे आलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत रोग प्रतिकारक शक्ती महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावत आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पिकांची शेतकऱ्यांनी लागवड करावी, यासाठी सुपर फूड ही योजना सुरू केली आहे. 

कृषी विभागाने सुपर फूड मानल्या जाणाऱ्या पिकांची नोंदणी केली केली असून या सुपर फूडमध्ये नाचणी, शेवगा, माडी, गोमंतकीय काटेकणगी, फणस, आवळा, सुरण आणि कोरगुट भाताचा समावेश केला आहे. शेतकरी, सेल्फ हेल्प ग्रुप व अन्य नागरिकांनी या पिकांची लागवड करून त्यापासून पदार्थ बनवून विक्री करावे, यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

कोरोना महामारीपासून आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेली पोषकद्रव्ये गोमंतकीय नागरिकांना खाद्यपदार्थातून मिळावी, तसेच गोव्यातील जमीन मोठ्या प्रमाणात सुपर फूड मानल्या जाणाऱ्या या पिकांच्या लागवडीखाली आणण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कृषी विभागाने कार्यदल समिती स्थापन केली असून यात कृषी विभाग, उत्तर व दक्षिण गोवा कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा), उत्तर व दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) आणि फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती दक्षिण गोवा केव्हिकेच्या गृह विज्ञान विषय तज्‍ज्ञ गीता वेलिंगकर यांनी दिली. 

का झाला समावेश ?
सुपर फूड म्हणून नोंदणी केलेली नाचणी, शेवगा, माडी, गोमंतकीय काटेकणगी, फणस, आवळा, सुरण आणि कोरगुट भात आदी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असून यातून भरपूर पोषकद्रव्येही मिळतात. आवळा हा मधुमेह व हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असून यात प्रथिने, आयर्न, फायबर, व्हिटॅमिन सी व अन्य पोषकद्रव्याचा समावेश असतो. माडी ही पचनक्रियेसाठी चांगली असून यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी व अन्य पोषकद्रव्याचा समावेश असतो. शेवगा रक्तातील साखरेची पातळी नियमित करते व रक्त शुद्ध करण्यात मदत करते. यात यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, इ, बी१, बी२ आणि अन्य पोषकद्रव्यांचा समावेश असतो. फणस कर्क रोगापासून लढण्यास तसेच हाड मजबूत करण्यास उपयुक्त असून यात फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए व अन्य पोषकद्रव्याचा समावेश असतो. नाचणी वजन कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रणास ठेवत असून यात फायबर, कॅल्शियम, प्रथिने व अन्य पोषकद्रव्याचा समावेश असतो. सुरण कर्क रोगाला दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत असून यात यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए व अन्य पोषकद्रव्याचा समावेश असतो. काटेकणगी आणि कोरगुट भातात प्रथिने, फायबर, कॅल्शियम आदी पोषकद्रव्ये असतात तर हे रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी चांगले आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या