‘विद्याभारती गोवा’चा शिशु शिक्षणात कृतिआधारीत शिक्षणावर भर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

शिशुवाटिका ही शिशु विकासाची एक भारतीय पद्धत आहे. हे एक फक्त शैक्षणिक केंद्र नसून सामाजिक, कौटुंबिक केंद्र आहे. समाजाच्या एकत्रीकरणाचे, प्रबोधनाचे व संवर्धनाचे केंद्र आहे. सध्याची शिशुशिक्षणाची जी अनैसर्गिक पद्धत प्रचलित आहे, ती बदलण्याची एक नैसर्गिक पद्धत म्हणचे शिशुवाटिका.
- ॲड. रोशन रवींद्र सामंत (शिशुवाटिका प्रमुख, विद्याभारती गोवा)

म्हापसा: गोव्यातील शिशु शिक्षणात यापुढेही गुणात्मकता आणण्याचा प्रयत्न ‘विद्याभारती गोवा’च्या माध्यमातून करण्यात येईल, असे या संस्थेच्या राज्यस्तरीय शिशुवाटिका प्रमुख ॲड. रोशन सामंत यांची स्पष्ट केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, की येऊ घातलेले शैक्षणिक धोरण तीन ते आठ वर्षांच्या शिशूंच्या दृष्टीने योग्यच आहे. आम्ही मातृ‍भाषेतून शिक्षण तसेच कृतिआधारीत शिक्षणावर भर दिला आहे. सरकारने हे शैक्षणिक धोरण अमलात आणल्यास शिशु शिक्षणास त्याचा फायदाच होईल. शिशु शिक्षणाचा पाया भक्कम केल्यास प्रत्येक बालक पुढील वाटचालीसाठी, भारत आत्मनिर्भर करण्यासाठी व राष्ट्र समृद्धीसाठी नक्कीच तयार होईल.

विद्याभारती एक अखिल भारतीय शैक्षणिक संस्था असून भारतातील सर्वांत मोठी तसेच संपूर्ण भारतातील कोनाकोपऱ्यात पसरलेली एक शैक्षणिक संस्था असा तिचा लौकिक आहे. शिशुवाटिका ते उच्च शिक्षणाची व्यवस्था असलेली ही संस्था, परंतु विद्याभारतीचा पाया आहे तो शिशु शिक्षण अर्थात ‘शिशुवाटिका’.

शिशुवाटीकेत फक्त शिशु शिक्षण अपेक्षित नसून नवदाम्पत्य प्रशिक्षण, गर्भवती मातांसाठी प्रशिक्षण, जन्मापासून एक वर्षाच्या बालकांच्या मातांचे प्रशिक्षण, एक ते तीन वर्षांच्या बालकांच्या मातांचे प्रशिक्षण व तीन ते पाच वर्षांच्या बालकांच्या मातांचे प्रशिक्षण, समाजप्रबोधन इत्यादी उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात.

यासंदर्भात माहिती देताना ॲड. सामंत पुढे म्हणाल्या, शिशूंचा विचार करता तीन ते पाच वयोगटातील मुलांचे शिक्षण हे अनुभवाधारित, प्रकटीकरणासाठी व क्षमतांच्या विकासासाठी असले पाहिजे. अक्षरओळख, अंकओळख यापेक्षाही क्षमतांचा विकास, अनुभव आवश्यक आहे. म्हणूनच शिशुवाटिकेचा अभ्यासक्रम हा शिशूचा समग्र विकास लक्षात घेऊन तयार केला आहे. शिशूचा शारीरिक विकास, मानसिक-भावनिक विकास, भाषिक विकास, सामाजिक तसेच आत्मिक विकास साध्य करणे म्हणजेच समग्र विकास करणे. असा विकास झालेले बालकच राष्ट्रोद्धाराचे कार्य करू शकते. गोव्यात ज्या पन्नास शिशुवाटिका चालतात त्यात याच बाबींवर भर दिला जातो. त्यासाठी प्रशिक्षित अशा कुशाग्र-कुशल १२० आचार्य (दीदी) कार्यरत आहेत.

गोव्यात नवीन आचार्यांसाठी दरवर्षी प्रशिक्षणवर्ग घेतला जातो. असा व्यापक प्रशिक्षणवर्ग गोव्यात इतर कोणतीही संस्था घेत नाही. आचार्यांना सातत्याने प्रशिक्षण, पालकसभा, पालक कार्यशाळा अशा वेगवेगळ्या स्तरांवर विद्याभारतीचे काम चालते. गोव्यातील सर्व शिशुवाटिका मातृभाषेतूनच चालतात.

समृद्ध भारतासाठी तसेच समृद्ध गोव्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करताना शिशुवाटिका आचार्य प्रशिक्षण असे कार्यक्रम सरकारने हाती घ्यावेत. या प्रत्येक कार्यक्रमासाठी विद्याभारती गोवा विभागाकडे अनुभवी शिक्षणतज्ज्ञ, कुशल आचार्य उपलब्ध आहेत. अशा राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात विद्याभारतीने आपले योगदान वेळोवेळी दिलेले आहे आणि पुढेही देत राहीलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या