सत्तरीतील 10 गाव डेंग्‍यूग्रस्‍त! चिंता वाढली

Dengue in Goa : वाळपई आरोग्य केंद्र सक्रीय; घेतली तातडीची बैठक
सत्तरीतील 10 गाव डेंग्‍यूग्रस्‍त! चिंता वाढली
Dengue in GoaDainik Gomantak

वाळपई : सत्तरी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्‍या डेंग्यूच्या रुग्णांमुळे आरोग्य खात्याची यंत्रणा सक्रिय झालेली आहे. पावसाळ्‍यात या रुग्णांच्‍या संख्‍येत आणखी वाढ होणार नाही याची विशेष दखल घेऊन शक्य तेवढ्या लवकर उपाययोजना करण्‍यासाठी वाळपई सरकारी सामजिक आरोग्य केंद्रात नुकतीच बैठक झाली. सत्तरीत जवळपास दहा गावांमध्ये डेंग्‍यूचे रुग्‍ण आढळले आहेत. त्‍यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाळ्यात रुग्‍णांची संख्‍या आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. याची विशेष दखल आरोग्य खात्याने घेतलेली आहे. यासंदर्भात एक महत्वाची बैठक जवळपास वीस दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. त्या बैठकीचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक पार पडली.

Dengue in Goa
मडगावात विक्रेत्यांकडून पदपथावर अतिक्रमण

प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना महात्मे बैठकीचा सविस्तरपणे आढावा घेतला व विविध खात्यांच्या कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच पावसाळ्यात डेंग्‍यूवर नियंत्रण ठेवण्‍याच्‍या दृष्टिकोनातून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या त्‍याची माहिती दिली.

जलसंपदा खात्याचे कनिष्ठ अभियंता शहा यांनी सांगितले की, विविध ठिकाणी पाण्याचे वाटप करण्यासाठी बांधण्यात आलेल्या चेंबरमध्ये पाण्याचा साठा सातत्याने होत असतो. मात्र यामध्ये डासांची पैदास होणार नाही याची विशेष दखल जलसंपदा खाते घेणार आहे.

सध्यातरी अशा चेंबरमध्ये डासांची पैदास रोखण्यासाठी तेल टाकण्यात आलेले आहे. पावसाळ्‍यात यावर सातत्याने लक्ष ठेवण्‍यात येईल. तर, नगरगाव सरपंच प्रशांत मराठे व म्हाऊसच्या सरपंच वंदना गावस यांनी पंचायत क्षेत्रात विविध ठिकाणी औषधांची फवारणी करण्यात आल्‍याचे स्‍पष्‍ट करून लोकांमध्ये जागृती करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले.

आरोग्य निरीक्षक गजानन पार्सेकर, नोडल अधिकारी डॉ. संकेत फडते, वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयाचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, प्रमुख वैद्यकीय अधिकारीडॉ. अभिजीत वाडकर यांनी डेंग्यू व इतर रोगांवर कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल, याबाबत माहिती दिली.

नगराध्यक्ष शेहझीन शेख, नगरसेवक विनोद हळदणकर, एस. शेख, नगरसेविका प्रसन्ना गावस, मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे, नगरगावचे सरपंच प्रशांत मराठे, म्हाऊसच्या सरपंच वंदना गावस, जलसंपदा खात्याचे कनिष्ठ अभियंता अझिझ शहा आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

कृषी खात्‍यानेही कसली कंबर

बागायतींत पाण्याचा साठा होणार नाही याची विशेष दखल घेण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घराच्‍या सभोवताली पाणी साचू न देणे यासाठी काळजी घेण्‍याचे आवाहन लोकांना करण्‍यात आले आहे. कृषी खात्याचे अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रामुख्याने भेट देत असून यासंदर्भाची माहिती शेतकऱ्यांना देत असल्याचे कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले.

एकाच ठिकाणी पाणी साचून राहिले तर त्‍यात डासांची पैदास होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी रोगांच्‍या रुग्‍णांमध्‍ये वाढ होते, असेही ते म्‍हणाले. येणाऱ्या काळात कृषी खात्याच्या माध्यमातून डेंग्‍यू रोगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्‍वाही गावस यांनी दिली.

पावसाळ्‍यात डेंग्‍यूच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन उपाययोजना आखण्‍यात आल्‍या आहेत. खास करून कोठेही आणि कशाही प्रकारे पाणी साचणार नाही याबाबत खबरदारी घेण्‍याचे आवाहन लोकांना करण्‍यात आले आहे. लोकांनी काळजी घ्‍यावी, घाबरून जाऊ नये.

- डॉ. कल्पना महात्मे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com