...तर कदाचित अरिफ वाचला असता!

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

नानोडा येथील घटना : असुरक्षित चिरेखाणीमुळेच बालक बुडाला

डिचोली:  डिचोली तालुक्‍यातील नानोडा येथील ''त्या'' चिरेखाणीजवळ सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीच उपाययोजना नसल्यानेच बालकाचा दुर्दैवी अंत होण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. तशी प्रतिक्रियाही त्या परिसरात व्यक्‍त होत आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नानोडा येथील एका फार्मपासून काही अंतरावर असलेल्या आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या चिरेखाणीत पडल्याने कळंगूट येथील अरिफ पंचम्हालदार हे दहा वर्षीय बालक बुडण्याची घटना सोमवारी घडली आहे. 

या दुर्घटनेनंतर चिरेखाणींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्या चिरेखाणीत दुर्दैवी घटना घडली, ती नानोड्यातील चिरेखाण स्थानिकांच्या विरोधामुळे मागील काही वर्षांपासून बंद असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या चिरेखाणी सभोवताली फोन्सिंग वा अन्य आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या असत्या, तर कदाचित अरिफ या बालकाचे प्राण वाचले असते. असे मत स्थानिक व्यक्‍त करीत आहेत. 
 
अन्य भागाप्रमाणेच डिचोली तालुक्‍यात बेकायदा चिरेखाणींचे प्रस्थ वाढले असून, या चिरेखाणींवर प्रशासनाचे कडक नियंत्रण नसल्याचे आढळून येत आहे. तालुक्‍यातील बहुतेक चिरेखाणीं बेकायदेशीर असल्याची माहिती मिळाली असून, काही चिरेखाणी तर पावसाळ्यात असुक्षित तेवढ्याच धोकादायक बनत आहेत. तालुक्‍यातील म्हावळिंगे-कुडचिरे, आमठाणे, उसप, लाटंबार्से,  कारापूर आदी काही ठराविक भागात चिरेखाणींचा व्यवसाय जोरात चालत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भागात मिळून ३० च्या आसपास चिरेखाणी आहेत. बांधकामांसाठी चिरे अत्यावश्‍यक असल्याने चिरेखाणींना सुगीचे दिवस आले असले, तरी या चिरेखाणींवर कोणतेच निर्बंध नसल्याचे जाणवत आहे. खाण आणि भूगर्भ खाते किंवा स्थानिक पंचायतींचे लक्ष नसल्याने व्यावसायिकांचे आयतेच फावत आहे. दुसऱ्या बाजूने काही भागात तर मागील काही वर्षांपासून चिरेखाणी बंद आहेत. पावसाळ्यात चिरेखाणी बंद असतात. जोरदार पावसावेळी सगळ्या चिरेखाणी पाण्याने तुडुंब भरतात. सध्याही बहुतेक चिरेखाणी पाण्याने भरलेल्या आहेत. पावसाळ्यात  सुरक्षेच्यादृष्टीने संबंधितांकडून चिरेखाणी सभोवताली कुंपण वा अन्य कोणतीच उपाययोजना करण्यात येत नाही. परिणामी या चिरेखाणी म्हणजे मृत्यूचे सापळे बनत आहेत.

‘फेन्सिंग’ करण्याकडे दुर्लक्ष
मागील वर्षी तुये-पेडणे येथे एका चिरेखाणीत शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. चिरेखाणींची पाहणी करून सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यासंबंधी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश येताच, मागील वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत मामलेदारांनी डिचोलीतील बहुतेक चिरेखाणींची पाहणी केली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बहुतेक चिरेखाणींजवळ सूचना फलक लावण्यात आले. चिरेखाणी सभोवताली तारांचे  "फेन्सिंग" करण्याचे निर्देशही  देण्यात आले. मात्र, नानोड्यातील या बंदावस्थेतील चिरेखाणीवर आवश्‍यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे आढळून आले आहे. त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या