साळगावात तब्बल २७ पंचायतींचा कचरा!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

बार्देस तालुक्यात साळगाव येथील डोंगरपठारावर कार्यरत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात प्रतिदिन तब्बल २७ पंचायत क्षेत्रांतील सुमारे १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.

म्हापसा : बार्देस तालुक्यात साळगाव येथील डोंगरपठारावर कार्यरत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात प्रतिदिन तब्बल २७ पंचायत क्षेत्रांतील सुमारे १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. बार्देश तालुक्यातील कचऱ्याची समस्या या प्रकल्पामुळे बऱ्याच अंशी दूर होण्यास मदत झाली असली तरी साळगाव परिसरातील कित्येक लोकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. गावाबाहेरचा कचरा येथे आणू नये, एवढेच त्यांचे म्हणणे आहे.

हा प्रकल्प म्हणजे साळगाववासीयांवर राज्य सरकारने लादलेला ‘शनी’च आहे, अशी उपहासात्मक टीका स्थानिक नागरिक करीत आहेत. त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या विस्तारीकरणालाही तेथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. विद्यमान स्थितीत साळगाव प्रकल्पातील कचऱ्याचे यथायोग्य व्यवस्थापन होत नाही, असा दावा स्थानिकांनी केला आहे.
प्रकल्पात येणाऱ्या कचरावाहू ट्रकांमधील घाणपाणी रस्त्यावर सांडत असल्याने व त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा या स्थितीमुळे अधून-मधून स्थानिकांकडून कचरावाहू ट्रक अडविण्याचे प्रयत्नही केले जातात. अजूनही काही कचरावाहू ट्रक ‘लिकेज टँक ’ बसवून न घेता या ठिकाणी येतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतु, विरोधकांकडून केला जाणारा हा दावा प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे. राज्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो हेसुद्धा या प्रकल्पाचे नेहमीच समर्थन करीत आले आहेत.

वर्ष २०१६ मध्ये लोकार्पण केलेला अत्याधुनिक कचरा प्रकल्प आज पूर्ण क्षमतेनुसार काम करीत असला तरी आजही या प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या मनात धगधग कायम आहे. त्यासंदर्भात पर्यावरणीय कारणे पुढे केली जात आहेत. राज्य सरकारने हेतुपुरस्सर हा प्रकल्प आणून साळगाववासीयांच्या माथ्यावर लादल्याची संतप्त भावना स्थानिक सुरुवातीपासून ते आजपर्यंत व्यक्त करीत आहेत, घटक राज्य दिनानिमित्त ३० मे २०१६ रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. गेल्या सुमारे तीन ते साडेतीन वर्षांत या प्रकल्पात किमान दीड हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया झाली आहे. सध्या दोन टप्प्यांत कचऱ्यावर प्रक्रियेचे काम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रकल्पाच्या देखभालीवर भर दिला जातो. या प्रकल्पात तालुक्यातील २५ पंचायती, किनारपट्टीतील कचरा तसेच रस्त्यालगत गोळा केलेला ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. सध्या प्रतिदिन १२५ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. असे असले तरी प्रतिदिन सुमारे १७५ टन कचरा या प्रकल्पात प्रक्रियासाठी पाठवला जातो.

हा कचरा प्रक्रिया प्रकल्प केवळ साळगाव व कळंगूट मतदारसंघातील कचऱ्यापुरतीच मर्यादित असेल, असे प्रारंभीच्या काळात सत्ताधारी भाजपा पक्षातील आमदारांकडून तसेच विशेषत्वाने कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडून सातत्याने स्पष्ट केले जात होते. असे असले तरी हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरच्या काळात या मतदारसंघांच्या बाहेरील किनारी भागांतील कित्येक पंचायत क्षेत्रांतील कचरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. त्यामध्ये शिवोली विधानसभा मतदारसंघातील कचऱ्याचाही समावेश असतो. कचरा गोळा करण्यासाठी शिवोली मतदारसंघात आमदार मायकल लोबो यांचे नाव ठळकपणे लिहिलेले एक वाहन नियमितपणे फिरत असते.

प्रत्येक संबंधित पंचायतींनी स्वत:च्या गावातील कचऱ्याची जबाबदारी स्वीकारावी, असे साळगाववासीयांचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून साळगाव प्रकल्यात पणजी मतदारसंघातील कचरा येत असल्याने साळगाववासीयांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली 
आहे.

संबंधित बातम्या