राज्‍यात प्रतिदिन १०३.७१ टन कचरा प्रक्रियेविना

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

दररोज २३५ टन कचऱ्याची उचल, तर साडेआठ टन कचरा राहतो पडून

अवित बगळे
पणजी

राज्यात घरोघरी कचरा संकलन होत असले, तरी सर्वच कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. राज्यात तब्बल १०३.७१ टन कचरा दररोज प्रक्रियेविना राहत आहे. सरकारच्या पंचायत संचालनालय आणि नगरपालिका प्रशासन खात्याने संकलित केलेल्या आकडेवारीवरून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राज्यात दररोज २३५.३४ टन कचरा तयार होतो. त्यापैकी २२६.७९ टन कचऱ्याचे संकलन होते. याचा अर्थ दररोज साडेआठ टन कचरा राज्यात कुठेतरी पडून राहत आहे.
या आकडेवारीनुसार राज्याच्या शहरी भागात कचरा संकलन १०० टक्के होते. मात्र, त्यापैकी केवळ ८६ टक्के कचऱ्याचेच वर्गीकरण करणे शक्य होते. त्यामुळे त्याच्या प्रक्रियेची टक्केवारीही घटते, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. मुरगाव, फोंडा, वाळपई, म्हापसा, कुंकळ्ळी, डिचोली, साखळी आणि मडगाव येथील कचरा संकलन केंद्रे अद्ययावत करण्याचे गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने ठरवले असून हे काम येत्या मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्‍य ठेवण्यात आले आहे.
शहरांलगत असलेल्या ६४ पंचायतींपैकी ३७ पंचायती घरोघर कचरा गोळा करतात. २८ पंचायती कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कचरा साळगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रात पाठवतात. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ९ पंचायतींनी केंद्रे सुरू केली आहेत. आणखी १५ पंचायतींकडे अशी केंद्रे सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. सहा महिन्यांत अशी सोय उपलब्ध करण्याचे प्रयत्न या पंचायत क्षेत्रात करण्यात येत आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी १२ पंचायती सध्या जागा निश्चित करत आहेत.१२७ पंचायत क्षेत्रात केवळ घरे असल्याने कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया केली जात आहे, अशी माहिती पंचायत संचालनालयाने दिली आहे

संबंधित बातम्या